shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारत आणि द.आफ्रिकेचे खेळाडू आयपीएल मधील दोस्तीला तिलांजली देणार ?



          दोन महिने चाललेली आयपीएल स्पर्धा संंपली आणि असली आंतरराष्ट्रीय क्रिकेट येत्या नऊ जून पासून भारत व द. आफ्रिका यांच्यात खेळले जाणार आहे. द. आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यात पाच टि- ट्वेंटी सामने खेळणार असून त्यांच्या सोळा खेळाडूंच्या संघातील नऊ खेळाडू आयपीएलच्या विविध संघाकडून खेळले आहेत. आठ दिवसांपूर्वी याच द.आफ्रिकन संघातील खेळाडू एका जीवलग जोडीदारासारखे भारतीय खेळांडूच्या हातात हात घालून आपापल्या फ्रँचाईचीजसाठी जीव तोडून खेळत होते. आता मात्र त्यांची भूमिका बदलली असून ते आपल्या देशाचे सच्चे शिलेदार म्हणून किल्ला लढविणार आहेत. त्याचबरोबर दोन महिन्यांचे वय असलेल्या दोस्तीला तिलांजलीही देणार आहेत.

           ज्या हार्दिक पांङ्याच्या नेतृत्वात खेळताना डेव्हीड मिलरने गुजरात टायटन्सला आयपीएलचे विजेते बनविले आता हेच दोन 'जानी यार ' या मालिकेत एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून आमने सामने उभे ठाकणार आहेत. तर या मालिकेत भारताचे कर्णधारपद भूषवित असलेला के एल राहुल व द.आफ्रिकेच्या क्विंटन डिकॉकने मिळून लखनौ सुपर जायंट्ससाठी तब्बल ११२४ धावा जमविल्या आहेत. परंतु या मालिकेत दोघेही एकमेकांना लवकरात लवकर बाद करण्याचे जीव तोडून प्रयत्न करतील. इतकेच नाही तर या मालिकेकरिता भारताचा उपकर्णधार म्हणून नियुक्त झालेला व आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व भूषविलेल्या रिषभ पंतला आपले प्रमुख हत्यार असलेल्या ऍनरीच नॉर्कियाच्या वेगवान चेंडूचा सामना करावा लागणार आहे.
           गुरूवार, ९ जूनपासून या मालिकेचा शुभारंभ नवी दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडीयमवर होणाऱ्याा पहिल्या सामन्यापासून होणार आहे. तेंव्हा सर्वप्रथम दोन्ही संघाच्या नजरा असतील त्या लखनौ सुपर जायंटसचे सलामीवीर केे एल राहुल व क्विंटन डिकॉक यांच्यावर ! केकेआर विरूध्द परतीच्या सामन्यात २१० धावांची विक्रमी नाबाद सलामी देणारी ही जोडी आयपीएल नंतर प्रथमच वेगळी खेळताना दिसेल. याच सामन्यात डिकॉकने या सत्रातील सर्वोच्च १४० धावांची नाबाद खेळी साकारली होती. तसेच राहुलने तीन शतके या सत्रात ठोकून स्पर्धेत ५१.३३ च्या सरासरीने ६१६ या दुसऱ्या क्रमांकाच्या तर डिकॉकने ३६.२९ च्या सरासरीने तिसऱ्या क्रमांकाच्या धावा फटकविल्या आहेत. आता हेच दोघे या मालिकेत आपापल्या संघांचे प्रमुख फलंदाज असणार असून आयपीएलमध्ये एकत्र खेळताना दुर्लक्ष केलेल्या एकमेकांच्या कमकुवत दुव्यांवर दोघांचेही लक्ष असेल आणि हेच त्यांचे बलस्थान देखील होऊ शकते.
          अशीच परिस्थिती गुजरात जायंटसला करंडक पटकावून देणाऱ्या दोन धडाकेबाज फलंदाज डेव्हीड मिलर व हार्दीक पांड्याच्या बाबत असेल.
या दोघांनी मिळून ९६८ धावा ठोकल्या असून पांड्याने ४८७ तर मिलरने ४८१ धावांचे त्यात योगदान दिले आहे. या आयपीएलनंतर मिलरच्या बळीची किंमत हार्दिकला चांगलीच समजली असेल व तो मिलरला बाद करताना येथे कंबर कसून मेहनत करताना दिसेल.
          दिल्ली कॅपिटल्सचे प्रमुख खेळाडू असलेल्या रिषभ पंत व एनरिच नॉर्किया यांना हे आयपीएल सत्र विशेष रास आले नाही. पंतने एकूण ३४० धावा काढल्या तर नॉर्कियाला सहा सामन्यात मात्र नऊ बळी मिळाले. आयपीएलमध्ये ताशी दिडशे किलोमिटर वेगाने चेंडू फेकणारा नॉर्किया या मालिकेत पंतला जेरबंद करण्याचे प्रयत्न करताना दिसेल तर रिषभ त्यांच्या गोलंदाजीवर धावा ठोकण्याचा प्रयत्न करेल.
          आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद कडून खेळताना उमरान मलिकने खेळलेल्या प्रत्येक सामन्यात सामन्यातला वेगवान चेंडू टाकला असून प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला घाम फोडताना स्पर्धेत १४ सामन्यात तिसऱ्या क्रमांकाने बावीस बळी घेतले. याचे फळ त्याला प्रथमच टिम इंडियात संधी मिळून भेटले. परंतु हैद्राबाद संघात त्याचा सहकारी राहीलेल्या एडन मार्करमने नेट्समध्ये मलिकाचा बारकाईने अभ्यास करून सामना केल्याने तो उमरानवर भारी ठरू शकतो. शिवाय मार्करमने आयपीएलमध्ये ४८.६३ च्या सरासरीने ३८१ धावा ठोकल्या असल्याने या मालिकेत तो मोठ्या आत्मविश्वासाने उमरानचा सामना करू शकतो. शिवाय द. आफ्रिकन कर्णधार टेंबा बवुमाने स्पष्ट केले की, मायदेशात त्यांचे फलंदाज उमरान सारख्या गोलंदाजांचा रोजच सामना करत असल्याने त्याचा विशेष प्रभाव द. आफ्रिकन फलंदाजांवर पडणार नाही. आता उमरानला प्रत्यक्ष सामन्यात संधी मिळते का ? यावरच पुढील गणित अवलंबून असेल.
          सन २००७ मध्ये भारताने टि- ट्वेंची पहिली स्पर्धा जिंकल्यानंतर सन २००८ मध्ये आयपीएलला सुरूवात झाली. मात्र त्यानंतर भारताला एकदाही विश्वचषक जिंकता आला नाही. आयपीएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू दोन महिने भारतीय खेळाडूंसह मोठया गुण्यागोविंदाने राहातात. त्यांच्याशी मैत्री करतात. भारतीयांचे कमजोर दुवे हेरून आपापल्या देशांच्या संघांना माहिती पुरवितात व प्रत्यक्ष द्विपक्षीय मालिकेत व विश्वचषकात भारतावर कुरघोडी करतात. भारतीय खेळाडू मात्र त्यांच्याशी सर्वच बाबी प्रामाणिक मैत्री केल्यागत शेअर करतात. ह्याच बाबी भारताच्या विश्वचषक न जिंकण्याच्या प्रमुख कारणांपैकी आहेत. तेंव्हा भारताच्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये हातचे राखूनच त्यांच्याशी मैत्री करावी. यावरच भारताचे खास करून विश्वचषकात भवितव्य अवलंबून आहे.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close