शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन ) :-
शिर्डी येथे आषाढी एकादशीला 10 जुलै रोजी सकाळी सहा वाजता श्री खंडोबा मंदिर येथून प्रसिद्ध सिने अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या प्रमुख उपस्थितीत साई दिंडी परिक्रमेचे आयोजन करण्यात आले असून या साई दिंडी परिक्रमेत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी होऊन शिर्डी माझे पंढरपुर म्हणत या जणू पंढरपूरवारीचीच अनुभूती घ्यावी असे आवाहान ग्रीन क्लीन शिर्डी फाउंडेशन व समस्त शिर्डी ग्रामस्थ यांनी केले आहे.
"शिरडी मेरा पंढरपूर, शिरडी पुज्यसमान ! यही विराजे विठ्ठल मेरे, सावरे घनश्याम..!" असे म्हणत ही वारी निघणार आहे. श्री साईबाबांनी हयात असताना साई भक्तांना पांडुरंगाचे साक्षात दर्शन शिर्डीत घडवले होते आणि शिर्डी माझे पंढरपूर असा साक्षात्कार घडविला होता. बाबांचे अनेक भक्त आजही बाबांना विठ्ठल पांडुरंगाच्या रूपातच पाहतात, म्हणून या पांडुरंगरुपी साईंची दिंडी शिर्डीत होवू घालण्याचा मानस आहे.
तरी ज्या भक्तांना श्री क्षेत्र पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जाणे शक्य नाही, त्यांनी शिर्डीत बाबांची परीक्रमारूपी साई दिंडी केली तर त्यांना पंढरपूर वारी केल्याचे पुण्य मिळू शकते.यंदा साई दिंडीचे परिक्रमा चे आयोजन आषाढी एकादशीच्या पवित्र दिनी, रविवार दिनांक 10 जूलै 2022 रोजी सकाळी 06.00 वाजता श्री खंडोबा मंदिर शिर्डी येथून काढण्याचे ठरविले आहे. सदरील साई दिंडीमध्ये नाचे मयुरी फेम प्रसिद्ध अभिनेत्री व प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना सुधा चंद्रन यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री खंडोबा मंदिरात त्यांच्या शुभहस्ते आरती करून साई दिंडी परिक्रमेची सुरुवात होणार आहे.तरी सर्व साई विठ्ठल भक्तांनी मोठया संख्येने या दिंडीत सहभागी होऊन पंढरपूर वारीची अनुभूती घ्यावी. असे आवाहन ग्रीन एन क्लीन शिर्डी फाउंडेशन व समस्त शिरडी ग्रामस्थ यांनी केले आहे.

