shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आजमितीला रोहीत शर्माच भारतातील सर्वोत्तम कर्णधार असल्याचं सिद्ध झालं !


          इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारताचा कसोटी संघ दोन दिवसांपूर्वीच नियमित कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जवळ जवळ जिंकलेला सामना हारला. त्यानंतर तीन टि- ट्वेंटी सामन्यांसाठी तो तंदुरुस्त होऊन संघात परतातच नवोदितांनी भरलेल्या भारतीय संघाने चमत्कारीक कामगिरी करुन सफेद चेंडूच्या खेळातील दादा संघ असलेल्या इंग्लंडला त्यांच्याच धर्तीवर चित करून कसोटीतील पराभवावर छोटीसी का होईना मलमपट्टी करत देशवासीयांचा राग शांत केला.

           या गोष्टीला पहिले कारण ठरला नियमित कर्णधार रोहित शर्मा. रोहितने संघात आलेली मरगळ झटकून नाणेफेक जिंकत भारताची कमजोरी असलेली धावांचा बचाव करण्याची बाजू मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या रचून प्रतिपक्षाला दबावात आणण्याची चाल यशस्वी करून दाखविली. 
             त्यासाठी रोहितने शब्दशः स्वतः आघाडीवर राहून इतर संघ सहकाऱ्यांपुढे आदर्श ठेवला. रोहितने भले धावा चोवीसच केल्या परंतु त्यामध्ये जी तडफ होती त्यामुळे इतर खेळाडू प्रेरित झाले व संघाला दोनशेच्या घरात नेऊन ठेवले. सन २०२१ च्या टि२० विश्वचषकानंतर भारताचा नियमित कर्णधार बनलेला रोहित अर्ध्याहून अधिक काळ दुखापतींमुळे संघाबाहेर राहिला. त्या दरम्यान केएल राहुल, विराट कोहली, रिषभ पंत, हार्दिक पांड्या व जसप्रितु बुमराहाने भारतीय संघाचं नेतृत्व केले. दुबळ्या आयर्लंडविरूध्द हार्दिक पांङ्याने २-० असा विजय मिळविला असला तरी त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष महत्व दिले जात नाही. हार्दिकचा हा अपवाद सोडल्यास इतर कर्णधार संघाला मालिका जिंकून देऊ शकले नाहीत.
         त्या उलट रोहितने नियमित कर्णधार बनल्यानंतर पंधरा सामन्यात संघाची धुरा वाहिली त्यातील सर्वच्या सर्व सामने भारताने जिंकले. सलग तेरा टि२० सामने जिंकण्याचा आगळा वेगळा विक्रमही कर्णधार म्हणून रोहितच्या नावे लागला. यावरून रोहितचा अनुभव, संघ निवड, खेळाडूंना हाताळण्याची कला लक्षात येते. रोहितच्या पुनरागमनामुळे संघात एकाएकी चैतन्य पसरले असून आगामी टि-२० विश्वचषकाच्या दृष्टीने ती एक अतिशय महत्वपूर्ण बाब म्हणावी लागेल.
         गुरूवारी रात्री खेळलेल्या पहिल्या टि२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करून १९८ केल्या, त्यांनंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला १४८ धावात गुंडाळून पन्नास धावांचा मोठा विजय साकारला. भारताकडून ईशान किशन सोडल्यास प्रत्येकाने बिनधास्त फटकेबाजी केली. भारताकडून हार्दिक पांड्याने अर्धशतक व ४ बळी अशी अष्टपैलू कामगिरी केली. भारताच्या सर्वच फलंदाजांनी चांगल्या सुरुवातीनंतर फटकेबाजीच्या नादात आपले बळी गमावले. त्यामुळे २५० च्या आसपास जाणारी भारताची धावसंख्या १९८ पर्यंत मर्यादित राहिली. शिवाय क्षेत्ररक्षणात पाच झेल सोडून आपल्या मर्यादा स्पष्ट झाल्या. मात्र या चुका लवकरात लवकर दुरूस्त कराव्या लागणार आहेत.
          इंग्लंडला विश्वविजेते बनविणाऱ्या संघाचा नायक ओएन मॉर्गन निवृत्त झाल्यानंतर जोश बटलरला कर्णधारपद मिळाले. मात्र आपल्या नेतृत्वाच्या पहिल्याच सामन्यात त्याला पराभवाचा कडवा घोट पचवावा लागलाच, शिवाय सामन्याच्या दुसऱ्याच चेंडूवर भुवनेश्वरने त्याच्या दांडया गुल करताना शुन्यातून बाहेर येण्याची संधी त्याला दिली नाही.
          या सामन्याला निर्णायक वळण देणाऱ्या काही ठळक घटनांचा थोडक्यात आढावा घेऊया.
          मैदानावर आतापर्यंत प्रथम फलंदाजी करणारे संघच जिंकत आल्याचा इतिहास असल्याने नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूने लागण्यात विजयाचे बीज रोवले होते. रोहित, सुर्यकुमार, हार्दिक, हुड्डा, कार्तिक यांची तडाखेबाज पण छोटेखानी खेळी भारतीय डावाला आकार देण्यात महत्वपूर्ण ठरली. भुवनेश्वरने जोश बटरलचा शुन्यावर काटा काढून भारताचा विजयाचा मार्ग सुकर केला. इंग्लंडच्या डावात पाचव्या षटकात हार्दिकने दोन बळी घेऊन भारताला ड्रायव्हींग सीटवर बसवले. इंग्लंडचे ३७ धावात चार गडी प्रमुख फलंदाज बाद होणे त्यांच्यासाठी मोठा आघात ठरले. तर इंग्लंडचा कोसळलेला डाव सावरणाऱ्या हॅरी ब्रुक व मोईन अलीला यजुवेंद्र चहलने एकाच षटकात बाद करून सामना संपूर्णतः भारताच्याच झोळीत टाकला.
          दोन्ही कर्णधारांच्या कामगिरीवर एक नजर टाकली तर रोहित शर्माने आदर्शवत कामगिरी करत सहकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास भरला. तर बटलर नेतृत्वाचं ओझं पेलण्यात कमी पडला. भारताचे फलंदाज उधळले असताना त्यांना रोखताना बटलरच्या नाकी नऊ आले होते.
        पदार्पणवीर डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदिपसिंगची आश्वासक गोलंदाजी, भुवनेश्वर, चहलची गोलंदाजी, हार्दिकची अष्टपैलू खेळी भारतासाठी या सामन्यात सकारात्मक बाबी ठरल्या. तर सुर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक चांगल्या सुरूवातीनंतरही आपल्या विकेटचे महत्व न समजताच बाद होणे, अक्षर पटेलची निष्प्रभ गोलंदाजी, ईशान किशनची कुर्मगती भारतासाठी नकारात्कम घटकात गणली जाईल.
          इंग्लंडच्या दृष्टीने सकारात्मक बाबी तशा कमी घडल्या. परंतु त्यातही ख्रिस जॉर्डन व टोपलीची धारदार गोलंदाजी भारतीय फलंदाजांना दोनशेच्यावर जाण्यापासून रोखण्यास महत्वाची ठरली. हॅरी ब्रुकची आक्रमकता, मोईन अलीची अष्टपैलू कामगिरी इंग्लंडला पराभवातही दिलासा देणाऱ्या ठरल्या. तर बटलर, जेसन राय व लियाम लिव्हींगस्टोनचे अपयश इंग्लंडला घातक ठरले.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close