इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील यांना उत्कृष्ट अधिकारी म्हणून सन्मानित.
इंदापूर प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचा कणा मानल्या जाणाऱ्या महसूल विभागात नेत्रदिपक कामगिरी बजावणाऱ्या व कायदा सुव्यवस्था, नैसर्गिक आपत्ती, मदत व पुनर्वसन, महसूल वसूली, निवडणुका तसेच प्रशासन इत्यादी जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत क्षेत्रामध्ये निस्पृहवृत्तीने काम करून शासनाची जनसामान्यांतील प्रतिमा उंचावणारे इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांना “महसूल दिना" चे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.
सोमवार दि. ०१ आँगस्ट २०२२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे बहुउद्देशिय हॉल ५ या ठिकाणी हा सन्मान सोहळा पार पडला.
जसे १ एप्रिल ते ३१ मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते तसेच १ ऑगस्ट ते ३१ जुलै हे महसूल वर्ष मानले जाते यानुसार १ ऑगस्ट हा महसूल वर्षाचा पहिला दिवस आहे. राज्य शासनाने ११ जुलै २००२ रोजी महसूल दिनाच्या आयोजना संदर्भात पहिले परिपत्रक काढले होते यानंतर दरवर्षी १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो. १ ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून आपल्या कामाचे परिक्षण करण्याचा दिवस आहे. शासनाच्या मध्यवर्ती विभाग म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे . जमीन महसुल वसुली, कायदा व सुव्यवस्था राखणे, गौणखनिज स्वामीत्वधन वसुली, अनधिकृत गौण खनिज उत्पन्नावर कारवाही, विविध खात्याची थकीत वसुली, पाणी वापर परवानगी, रस्ता देणे, अडविलेले रस्ते खुले करणे, पाण्याच्या पाईपलाईनसाठी परवानगी देणे, सर्व प्रकारच्या निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, आधारकार्ड, विविध सामाजिक योजना, रोजगार हमी आदी योजना महसूल खात्यामार्फत राबविल्या जातत.
लोकांना विकासात्मक प्रशासन द्यायची जबाबदारी महसूल विभागाची आहे. त्यामुळे लोकांच्या महसूल प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात.या अपेक्षेला पात्र राहिल असे कामकाज इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील करत आहेत. म्हणून आजच्या महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन उत्कृष्ट अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.

