shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आशिया चषकासाठी निवडलेला भारतीय संघ विजेतेपद मिळविण्याच्या पात्रतेचा आहे..?


         येत्या २७ ऑगष्ट ते ११ सप्टेंबर २०२२ दरम्यान होणाऱ्या आशिया चषकासाठी टिम इंडियाची घोषणा बीसीसीआयच्या निवड समितीने केली आहे. संघावर एक नजर टाकली तर काही दुखापतग्रस्त, दुखापतीतून सावरून व कुठलेच स्पर्धात्मक क्रिकेट न खेळताच थेट संघात खेळाडू निवडले असून त्यात सातत्याने खराब फॉर्मात असलेल्या खेळाडूंचाही समावेश आहे. मोहम्मद शमी सारख्या अनुभवी गोलंदाजास डावलून आशिया चषक जिंकण्यासाठी संघ निवडला आहे.   

          सहा संघांचा सहभाग असलेल्या आशिया चषक स्पर्धेसाठी तीन तीन देशांचे दोन गट करण्यात आले असून गट-अ मध्ये भारत, पाकिस्तान व पात्रता फेरीतून आलेला एक संघ व ब- गटात श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तानचा संघ असेल. एकूण तेरा सामने या स्पर्धेत होणार असून सदर स्पर्धा खरे तर श्रीलंकेत होणार होती. मात्र तेथील अस्थीर परिस्थितीमुळे ती युएईमध्ये हलविण्यात आली आहे.  या स्पर्धेच्या इतिहासावर एक नजर टाकली तर सन १९८४ मध्ये ही स्पर्धा सुरू झाली. सन २०१४ पर्यंत ५० षटकांची खेळविली गेली. मात्र सन २०१६ मध्ये नेमकी ती टि२० विश्वचषकाच्या ऐन तोंडावर आल्याने टि२० स्वरूपात खेळविली गेली. तर सन २०१८ मध्ये ती पुन्हा ५० षटकांची खेळविण्यात आली. आता टि२० चा विश्वकप दोन महिन्यांवर आलेला असून या वेळी परत एकदा ती टि२० स्वरूपातच खेळविण्यात येणार आहे. आतापर्यंत आशिया चषकाच्या तेरा स्पर्धात भारताने भाग घेतला असून सर्वाधिक तब्बल ७ वेळा हा करंडक जिंकला असून तीन वेळा ते उपविजेते ठरले आहेत. तर श्रीलंका पाच वेळा विजेता तर सहा वेळा उपविजेते राहिले आहेत. पाकिस्तान प्रत्येकी दोनदा विजेते व उपविजेते ठरले आहेत. पुढच्या वर्षी वनडेचा विश्वचषक होणार असल्याने परत एकदा ती वनडेमध्ये परावर्तित होणार आहे.
          रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार असून कर्णधार म्हणून त्याची छाप चांगली पडते. मात्र मुख्य मुद्दा त्याच्या तंदुरूस्तीचा असतो. हॅमस्ट्रिंगचा त्याला नेहमी त्रास होतो. नुकताच विंडीजविरूध्द तिसऱ्या सामन्यात फलंदाजी करताना त्याला पाठदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्याला मैदान सोडावे लागले. सुदैवाने त्याच्या बाहेर जाण्याने संघाच्या कामगिरीवर परिणाम झाला नाही. कधी तंदुरूस्ती तर कधी फलंदाजीत असातत्य हे त्याचे कमकुवत दुवे आहेत.
            केएल राहुलला मागचे ६-७ महिने दुखापतीने सतावले असून या काळात तो संघाबाहेरच होता. दोन महिन्यापूर्वीच ग्रोईन इंज्युरी साठी त्याने जर्मनीत ऑपरेशन करून घेतले व त्यानंतर कोरोनाने त्याला घेरले. एवढे मोठे आजार व कुठलेही स्पर्धात्मक क्रिकेट न खेळता त्याला थेट आशिया चषकासाठी संघात घेणे म्हणजे मोठा जुगारच म्हणावा लागेल.
            आता सगळ्यात मोठा जुगार विराट कोहलीला संघात निवडून खेळण्यात आला आहे. तीन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय शतक होत नव्हते. आता धावाही त्याच्यावर रुसल्या आहेत, शिवाय सातत्याने आराम घेवून स्पर्धात्मक क्रिकेट न खेळताच जुन्या पुण्याईवर कोहली संघात आला आहे. परंतु त्याचा फॉर्म व मानसिकता याविषयी कोणीही छातीठोकपणे काहीही सांगू शकत नसल्याने त्याला संघात घेऊन श्रेयस अय्यर, संजू सॅमसन सारखे फॉर्मात असलेले खेळाडू संघाबाहेर बसणार आहेत.
             भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रित बुमराहा दुखापत ग्रस्त असल्याने आशिया चषकासाठी संघात नसेल.  संघासाठी तो मोठा हादरा बसला असताना नवोदित गोलंदाज हर्षल पटेलची दुखापतही बळावल्याने तोही उपलब्ध नाही. अशा वेळी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी संघात असणे गरजेचे होते परंतु त्याला डावलून विंडीज दौऱ्यात सडकून मार खाल्लेल्या आवेश खानला निवडून निवड समितीने फार मोठा डाव खेळला आहे.
              अक्षर पटेलने इंग्लंड व विंडीजमध्ये मोठी छाप सोडली असूनही तो मुख्य संघात नाही. त्याच्या ऐवजी रविंद्र जडेजाला अग्रक्रम मिळाला आहे. परंतु जडेजाही तंदुरूस्तीसाठी झुंजत आहे. विंडीज दौऱ्यासाठी तो उपकर्णधार म्हणून निवडला होता, परंतु दुखापतीमुळे तो पूर्ण दौऱ्यालाच मुकला होता. तरीही त्याला निवडून आणखी एक जुगार खेळण्यात आला.
          दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये जे सातत्य व चमक दाखविली ती धमक त्याला नंतर आंतरराष्ट्रीय सामन्यात दाखवता न आल्याने त्याच्या कामगिरीविषयी शंकाच वाटते. त्याच्या ऐवजी ईशान किशन फायदेशीर ठरला असता शिवाय तो तरूण असून भविष्यात हा अनुभव त्याला कामी आला असता. कार्तिक ३७ वर्षांचा असून तो लंबे रेस का घोडा नाही तरीही त्याच्यावर मोठा डाव खेळण्यात आला आहे.
            हार्दिक पांडया नंतर प्रभावी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या शार्दूल ठाकूरचा विचारही केला गेला नाही.
परंतु दिपक हुड्डा व हार्दिकच्या रूपाने अष्टपैलू खेळाडू असल्याने शार्दूलची उणीव जाणवार नाही. परंतु आवेश ऐवजी शार्दूल असता तर त्याची बॅटींग, बॉलींग व अनुभव कामी आला असता.  भुवनेश्वर व नवोदित अर्शदिप सिंग वर भारताच्या वेगवान गोलंदाजीची मदार आहे. परंतु या महत्वाच्या स्पर्धेत भुवनेश्वर तंदुरूस्ती व फॉर्म टिकवेल ? अर्शदिपचा अनुभव कमी तर पडणार नाही ? अशा शंका यायला लागल्या आहेत.
            फिरकी गोलंदाजीचा प्रांत आश्वीन, चहल, बिश्नोई व हुड्डामुळे समृध्द दिसतो. तसे बघाल तर युएईतील खेळपट्टया मंद असल्याने फिरकीस पोषक असल्यानेच निवड समितीने वेगवान गोलंदाजीवर जास्त भर दिलेला दिसत नाही. तरीही आवेश ऐवजी शमी नाही तर शार्दूल हवाच होता. आता मात्र आवेशवर प्रत्यक्ष सामन्यात  संधी मिळाल्यास टिकाकारांना सडेतोड उत्तर देण्याची अवघड कामगिरी असणार आहे. यामध्ये त्याला यश मिळून भारत विजेते व्हावेच अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे. चला तर घोडा मैदान जवळच आहे.
           भारताची पहिली लढत पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी २८ ऑगष्टला  होणार असून कमीत कमी आणखी एक झुंज या दोन संघात या स्पर्धेत होऊ शकते.

      आशिया चषक स्पर्धेसाठी निवडलेला भारतीय संघ असा आहे - रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उप-कप्तान), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), दिपक हुड्डा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, व आवेश खान.
राखीव खेळाडू :- श्रेयस अय्यर, दिपक चाहर व अक्षर पटेल.   
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close