ग्रामपंचायतीने महिलांना शेळी पालन व्यवसायाचे दिलेले प्रशिक्षण भविष्यात त्यांना स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी उपयोगी पडेल - हनुमंत बंडगर.
इंदापूर - भिगवन प्रतिनिधी:
(दि १० )महिलांनी शेळी पालन व्यवसायातून आर्थिक स्थैर्य मिळविण्याची गरज आहे. शेतीला गरीबाची गाय म्हणणात, यामुळे शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय म्हणून शेळी पालन व्यवसायाकडे पाहिले जाते. यामुळे ग्रामपंचायतीने महिलांना शेळी पालन व्यवसायाचे दिलेले प्रशिक्षण भविष्यात त्यांना स्थैर्य प्राप्त करुन देण्यासाठी उपयोगी पडेल असे मत पुुणे जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी व्यक्त केले.
डाळज क्र. २ (ता. इंदापूर) येथे आझादी का अमृतमहोत्सव कार्यक्रमातंर्गत ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगातून महिलांसाठी शेळीपालन व्यवसायाचे तीन दिवशीय प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते.
यामध्ये गावातील सुमारे ७० महिलांनी सहभाग घेतला होता. या प्रशिक्षणादरम्यान सहभागी महिलांना शेळीच्या जाती, त्यांचे आजार, संगोपन, गोटा व्यवस्थापन, शासकीय अनुदान योजनांबद्दल माहिती व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रशिक्षणाच्या सांगता कार्यक्रमावेळी सहभागी महिलांना बंडगर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी सरपंच अॅड. प्रदीप जगताप, ग्रामसेवक दादासाहेब गावडे, शशीकांत सवाणे, रणजित मिंड यांसह स्वर्गीय शंकरराव नारायण सोट पाटील बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सरपंच अॅड प्रदीप जगताप म्हणाले, महिलांच्या शेळीपालन व्यवसायाच्या प्रशिक्षणानंतर त्यांना राहुरी कृषी विद्यापिठात शेती प्रशिक्षण सहलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या सहलीच्या माध्यमातून महिलांना शेती संबंधित आधुनिक तंत्रज्ञान, पिक पद्धती याबाबत माहिती दिली जाणार आहे. बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या महिलांना पुढील काळात व्यावसायिक बाबींसाठी आवश्यक मदत करण्याचे प्रयत्न असतील.
यावेळी ग्रामसेवक दादासाहेब गावडे यांनी हर घर तिरंगा अभियानातंर्गत महिलांना तिरगा ध्वज वाटप केले. याशिवाय ध्वज संहिता नियमाची व माझी वसुंधरा अभियानाची उपस्थित महिलांना माहिती दिली.
…..

