लोणार (विजय गोलेछा):- उल्कापाती सरोवराच्या काठावर असणाऱ्या गोमुखातून हजारो वर्षापासून अखंड वाहणार्या धारेला गंगेचे महत्व आहे या गंगा भोगावती तीर्थावर मुख्य धारेवर असणाऱ्या महादेवाचे मंदिर व ब्रह्मकुंडामधील मंदिर जीर्ण अवस्थेत झाल्यामुळे पर्यटकांसह भाविकांमध्ये तीव्र नाराजीचा सुर उमटत असून पुरातत्व विभागाने ही मंदिरे तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सरोवर काठावर असणाऱ्या पर्यटकांना विशेष आकर्षण ठरणाऱ्या विरजधारातीर्थ मधील गोमुखातून गंगेचे पाणी येत असल्याची आख्यायीका सर्वश्रुत असून श्रीराम प्रभू चंद्राच्या पदस्पर्शाने ही धार धन्य झाल्याची आख्यायिका आहे. यामुळे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांसोबत भाविक भक्तांमध्ये आंघोळ करून स्वतःला धन्य मानण्याची प्रथा आहे या ठिकाणी भेट देणारे अनेक पर्यटक भाविक भक्त गंगाजल म्हणून पाणी आदराने भरून पूजेसाठी नेत असतात. या ठिकाणी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , हायकोर्ट न्यायाधीश सर्व संघटनांचे पदाधिकारी अशा अनेक राजकीय पदाधिकारी सह विविध वरिष्ठ अधिकारी पदाधिकाऱ्यांनी दौरा करून प्रत्यक्ष भेट दिली आहे. या गंगाभोगावती तीर्थाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन वेळोवेळी राजकीय पदाधिकाऱ्याकडून दिले जाते तर ऐतिहासिक, पौराणिक महत्त्व असलेल्या या वास्तूचे जतन व संवर्धन करण्याची जबाबदारी पुरातत्व विभाग नागपूर यांच्याकडे आहे. सर्व पौराणिक वास्तूचे जतन व संवर्धन करण्यासाठी स्वतःचे कार्यालय सुद्धा उपलब्ध आहे.
या परिसरातील अनेक पौराणिक मंदिरे जीर्ण अवस्स्थेत झाल्यामुळे भविष्यामध्ये ही मंदिरे पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे पौराणिक वास्तुचे जतन व संवर्धन करण्यासाठी या परिसरातील मंदिरांची पुरातत्व विभागाने त्वरित दखल घेऊन दुरुस्ती करण्याची मागणी भाविक भक्तांकडून,लोणारकरांकडून केली जात आहे.

