लेखक : चंद्रकांत शहासने
मोबाईल : ९८८१३७३५८५
घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासूनच घरात चैतन्य संचारले होते. प्रत्येकजण आपापली कामे उरकून घटाच्या स्थापनेसाठी आपला काहीतरी हातभार लागला पाहिजे या हेतूने कार्यरत होता. मी शांतचित्ताने सर्व न्याहाळीत होतो. वेळेनुसार मुहूर्तावर घटस्थापना पार पडली. आरती नैवेद्य पार पडले. पूजाविधी पार पडल्यानंतर मी उपस्थितांना म्हटलं "चला आपण एक माळ मंत्रजाप करु या !".
मी मांडी घालून ध्यान लावले आणि ॐ ऐ रीम क्लींम चामुंडाये विच्छे असा मंत्र चालू केला. उपस्थितांपैकी काहीजण मंत्रोच्चारात सहभागी झाले. काहीजण आरतीनंतरच्या उरकण्याच्या कामात लागले. मंत्रजाप करणारे काहीजण मधूनच उठले नि अखेरपर्यंत फक्त एकजण माझ्या बरोबर राहीला. आमचे मंत्रोच्चार चालू असताना बाकीचे गप्पा मारत होते. त्यांना देवीच्या या मंत्राशी काहीच सोयरसुतक नव्हते. १०८मंत्रजाप झाल्यावर मी देखील उठलो नि मुलांनो म्हटलं अरे साधं जपाला बसण्याइतपत तरी धीर धरायचा होता. आज आपण आपल्या घरात आदीमाया आदीशक्तीच्या नावाने घट बसविलेला आहे म्हणजे आदीमायेचं चैतन्य या आपल्या घरात स्थिर व्हावं नि स्थिरतेतून आपला विकास व्हावा ही घटस्थानेच्या मागील भावना असते.
घट म्हणजे विश्र्व ! विश्र्व म्हणजे अनंत कोटी ब्रम्हांड ! हे जसं आहे तसं प्रत्येक व्यक्ती हे एक विश्र्व आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा एक घट आहे. आपण अभंग ऐकतो की नाही "घटा घटाचे रूप आगळे! प्रत्येकाचे दैव वेगळे !!
प्रत्येक व्यक्ती ही समाजाचा एक घटक आहे असे आपण सहज बोलतो तेव्हा घटक या शब्दाचा अर्थ समजून घेतो काय? तर घटक या शब्दाची उत्पत्ती घट या शब्दापासून झालीय. आहे की नाही गंमत!
मुलं अवाक होऊन माझं म्हणणं ऐकायला लागली. घट आणि घटक हे शब्द त्यांच्या डोक्यात घुसले याचा फायदा उठवत मी म्हणालो
की घट स्थापन केला म्हणजे काय केले ?
तर माती भरलेल्या परडीमध्ये एक मातीचा घडा पाणी भरून ठेवला. त्याच्या सभोवती पाच पानं लावून त्याला शोभा आणली नि त्यावर नारळाचे फळ ठेवले. परडीतल्या मातीत नऊ प्रकारची धान्ये पेरली नि घट स्थीर केला, ठेवला, स्थापन केला. आता घट स्थिर आहे नि तुम्ही चंचल आहात. साधा नामजप करायला तुम्ही एकाजागी स्थिर राहू शकत नाही तर कसं व्हायचं तुमचं!
आता मुलं अधिकच मन लावून ऐकायला लागली. मी म्हटलं की मुलांनो हे सणवार ही रूपकं असतात. आता तुम्ही एकाच जागी बसून एकाच विषयाचे चिंतन करावे नि तुमच्यातला चंचल स्वभाव कमी व्हावा यासाठी हे नामजपाचे तंत्रज्ञान आहे. पुढील आयुष्यात तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर खंबिरपणे स्थिर रहायला शिकायला हवे की नको ? जेव्हा तुम्ही बालवयापासून मांडी घालून एकाच ठिकाणी मंत्र बोलत बसता तेव्हा तुम्हाला एकाच ठिकाणी स्थिर बसायची सवय लागते. जोपर्यंत स्थिर विचार नाहीत तोपर्यंत यश मिळेल काय?
मुले तल्लीन होऊन ऐकत आहेत हे पाहून मी म्हणालो,
पहा! या घटासभोवताली असलेल्या मातीत धान्य पेरले आहे म्हणजे हे विश्र्वाचे कृषी रूप आहे. घटावर नारळ म्हणजे कल्पवृक्ष आहे . म्हणजे सुबत्तेचं प्रतिक आहे. आणि घट म्हणजे आपण स्वत:!
मग आपण डळमळीत राहून जमेल काय? तर त्यासाठीच स्थापना आहे. आता नऊ दिवस अहंकार, मोह, माया, चंचलता, अज्ञान,विकार, वासना यां राक्षसांना मारण्यासाठी उपासना करायची. जप, जाप, मंत्र, आरती, स्तोत्रं हे सारं करताना एक चित्त रहायचं नि यशस्वी व्हायचं !
समजलं काय ?
जमेल ना ?
मुलं एकमतानी म्हणाली ..
आत्तापासूनच आपण ध्यानाला बसू या !
आजपासून आम्ही पूजापाठ चालू असताना गडबड गोंधळ करणार नाही. यशस्वी व्हायचंय तर स्थिर रहायला, ठाम रहायला शिकायलाच हवे !
*ऊदयोस्तू जगदंब!
*आई भवानीचा उदे उदे !!
*लेखक : चंद्रकांत शहासने
*मोबाईल : ९८८१३७३५८५

