shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परिस्थितीला गुलाम बनवत श्रीलंका बनला आशियाई क्रिकेटचा सम्राट..!


             श्रीलंकेतील आर्थिक व राजकीय परिस्थितीने टोकाची परिसिमा गाठल्यानंतर तेथील प्रत्येक घटकावर मोठा प्रभाव पडला होता. त्याला श्रीलंकेचे क्रिकेट व क्रिकेटपटूही अपवाद नव्हते. एवढया बिकट परिस्थिती नंतर श्रीलंकेत होणारी आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिरातमध्ये हलविण्यात आली. तेथे पोहोचण्यासही इतर संघांच्या तुलनेत  श्रीलंका संघाला उशीर झाला होता. त्याचा परिणाम उदघाटनाच्या सामन्यात नवख्या अफगाणिस्तानकडून त्यांना एक लाजिरवाणा पराभव स्विकारावा लागला. त्यावेळी श्रीलंकेचे उर्वरीत आशिया चषकात काही एक चालणार नाही असेच तज्ञांचे मत बनले होते. मात्र त्यानंतर जे काही घडलं तो एक इतिहास बनला.
           सर्वप्रथम गट साखळीत लंकेने त्यांचा कट्टर प्रतिस्पर्धी बांगलादेशचे मोठे आव्हान लिलया पार करून सुपर फोर मध्ये प्रवेश केला. सुपर फोरमध्ये त्यांनी अफगाणिस्तान, भारत व पाकिस्तान यांंना धडाक्याात हरवून अंतिम फेरीत मानाने स्थान मिळविले. या दरम्यान त्यांनी जिंकेलेल्या प्रत्येक सामन्यात नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करत मोठमोठे लक्ष साध्य केले होते. त्यामुळे त्यांना चेस मास्टर म्हणून काहीसे हेटाळले जाऊ लागले.

           नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात केवळ १०४ धावात अफगाणच्या वेगवान माऱ्या समोर भंबेरी उडाली होती. अगदी तशीच गत त्यांची दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रविवारी रात्री अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या जलदगती गोलंदाजीसमोर झाली होती. अवघ्या ५५ धावात अर्धा संघ डग आऊट मध्ये गेला तेंव्हा पुन्हा एकदा लंका किरकोळीत सर्व बाद होईल आणि पाकिस्तान आरामात सामन्यासह आशिया चषक पटकाविल असेच दिसत होते.
            परंतु जिगरबाज श्रीलंकन हार मानणारे नव्हते. भानुका राजपक्षे ( ४५ चेंडूत नाबाद ७१ ), वानेंदू हसरंगा ( ३६ धावा ) यांनी तडाखेबाज धोरण अवलंबून डोक्यावर चढलेल्या पाक गोलंदाजांना अक्षरशः उचलून आदळवले. त्याचा परिणाम लंकेच्या खात्यावर वीस षटकाअखेर आणखी केवळ एक गडी गमावून १७० धावा फलकावर लावल्या.
             प्रत्युत्तरात पाकिस्तानने जोरदार कर्णधार बाबर आझम व फखर झमानच्या लागोपाठच्या पतनानंतरही सामन्यावर चांगलीच पकड मिळविली होती. मात्र गोलंदाजी करताना जशी त्यांची गोलंदाजी अंतिम षटकात भरकटली अगदी तशीच अवस्था फलंदाजीत शेवटच्या टप्प्यात घडली. १० षटकात दोन बाद ९३ वरून १९ षटकात सर्वबाद १४७ अशी त्यांची गाळण उडाली व आशिया चषकाचा विजेतेपदाचा षटकार श्रीलंकेने लगावला.
         श्रीलंकेने फलंदाजी करताना शेवटच्या टप्प्यात पाकिस्तानी गोलंदाजीवर जसा दबाब वाढविला अगदी तसाच दबाव गोलंदाजी करताना पाकिस्तानच्या फलंदाजांवर ठेवल्याने पाकच्या कागदी घोड्यांना उधळण्याची संधीच मिळाली नाही. मोहम्मद रिझवान व काही प्रमाणात इफ्तिखारचा अपवाद वगळला तर पाकच्या फलंदाजांसमोर आपला दुसराच टि२० सामना खेळणाऱ्या प्रमोद मधुशेन ( ३४ धावात ४ बळी ) व वानेंदू हसूरंगाने सतराव्या षटकात पहिल्या, तिसऱ्या व पाचव्या चेंडूवर घेतलेल्या तीन बळींमुळे पाकिस्तानचे मनसुबे अक्षरशः महापूरात वाहून गेल्या सारखी परिस्थिती दुबईच्या वाळवंटात दिसली.
            श्रीलंकेची सांघिक शिस्त, जिंकण्याची विजिगुषी वृत्ती, क्षेत्ररक्षणातील एकजिनसीपणा, संकट समयी फलंदाजांची समयसूचकता, नवोदित वेगवान गोलंदाजांची भरीव कामगिरी, हसरंगाची सातत्यपूर्ण फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यांच्यातील शब्दशः अष्टपैलू कामगिरी यशासाठी पुरक ठरली.
           तर पाकची वेगवान गोलंदाजी सुरुवातीला जो धाक दाखवायची ती शेवटपर्यंत टिकवू शकली नाही. तर अनुभवी व फॉर्मात असलेला फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाझला केवळ एकच षटक गोलंदाजी देणं व त्याचा दुष्परिणाम नवाझच्या फलंदाजीवर होण्यात झाला. आपल्याला आठवतच असेल याच नवाझने भारताच्या तोंडातला विजयाचा घास पळविला होता.
            पाकची फलंदाजी केवळ रिझवान व बाबर भोवती फिरत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.  या स्पर्धेत बाबर अपयशी ठरल्याने रिझवानचे एकटयाचे प्रयत्न तोकडे पडले. इतर फलंदाज म्हणजे पाकिस्तानसाठी असून अडचण व नसून खोळंबाच ठरले. त्यातच बाबर आझमचे नेतृत्व दर्जाहिन झाल्याने पाकचे पितळ उघडे पडले.
             अगदी त्या उलट श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका विजयाचा नायक ठरला. संघाची मोट जुळविण्यात तो कमालीचा यशस्वी ठरल्याने प्रतिकूल परिस्थितीलाही लंकेने गुलाम बनविले. याचा फायदा असा झाला की, श्रीलंका आशियाई क्रिकेटचा सम्राट बनला. परंतु मागच्या काही दिवसात आयसीसीने ठरवून दिलेल्या कालखंडात श्रीलंकेचा संघ आयसीसी रँकींग मध्ये पहिल्या आठ संघात नसल्याने त्यांना आगामी विश्वचषकासाठी पात्रता फेरी खेळावी लागेल. अशी आहे क्रिकेटच्या अफलातून चमत्काराची अजब गाथा !
            श्रीलंकेच्या या विजेतेपदामुळे श्रीलंकन जनतेच्या दुःखावर एक मलमपट्टी नक्कीच लागेल, शिवाय तेथील क्रिकेटला नवीन चालना मिळेल. ही बाब खास करून जागतिक क्रिकेटसाठी नक्कीच फायद्याची असेल.

डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close