पी.बी.पायमोडे । टाकळी ढोकेश्वर :-
पारनेर तालुक्यातील निसर्गरम्य परिसर म्हणून नावारुपाला येत असलेल्या मांडओहळ धरण रस्त्यावर भरदिवसा बेछुट गोळीबार झाल्याची घटना नुकतीच घडली. या कल्याण हायवेपासून कर्जुुलेहर्या ते मांडओहळ धरण रस्त्यावर ही घटना घडली. म्हसोबा झाप येथील स्वप्नील आग्रे हे त्यांच्या चार चाकी वाहनातून जात असताना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघांनी त्याच्या वाहनावर गोळीबार केला. त्यात स्वप्नील आग्रे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे.
शक्ती नारायण राय, नितीश गुड्डूु (दोघेही परप्रांतीय, हल्ली राहणार राजूरी, जि. पुणे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून अन्य दोघे जण पसार झाले आहेत.
पाठलाग करून गोळीबार करणार्या चौघांनी स्वप्नील आग्रे यांच्या चार चाकी वाहनाचा ताबा घेतला आणि जखमी आग्रे यास तेथेच टाकून पळ काढला.दरम्यान,सदर घटनेची माहिती मिळताच परिसरातील तरुणांनी पोखरीकडे जाणार्या रस्त्यावरील गावांमधील तरुणांना गाडीची व घटनेची माहिती दिली. यानंतर तरुणांनी सदर गाडी पोखरी परिसरात रोखली. गाडीतील तरुणांच्या हातात दोन गावठी कट्टे होते. या तरुणांना स्थानिक तरुण व ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.
दरम्यान, सदरचे तरुण हे गवंडी काम करणारे परप्रांतीय असल्याचे समजते. हल्लेखोर तरुण हे स्वप्नील आग्रे याच्याकडे गवंडी काम करत होते आणि त्यांना आज स्वप्नील आग्रे याला मोठे पेमेंट मिळणार असल्याची माहिती मिळाली होती. ही रोकड लुटण्याच्या इराद्यानेच त्यांनी स्वप्नील याच्यावर गोळीबार केला असावा असा अंदाज आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पारनेरचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप व सहकार्यांनी घटनास्थळ गाठले. हल्लेखारांकडून अधिकची माहिती घेतली जात आहे. दरम्यान या घटनेने मांडओहळ धरण परिसरासह संपूर्ण पारनेर तालुका हादरुन गेला आहे.

