अहमदनगर । प्रतिनिधी :- प्रेम करणार्यांना आता खरे प्रेमच राहिले नाही..! नकली आणि आंधळ्या प्रेमाच्या हव्यासापोटी पवित्र नात्यांचीही जाणीव राहिली नाही. अशीच हृदय हेलावून टाकणारी घटना नगर जिल्ह्यातील कोकमठाण येथे घडली.
प्रेम प्रकारणाबद्दल घरच्यांना माहिती दिली या रागातून सख्या मोठ्या बहिणीने लहान बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. पोलिसांनी आरोपी बहिणीला बेड्या ठोकल्या आहेत.कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात ३० सप्टेंबर रोजी १६ वर्षीय हर्षदा बानकर या तरुणीचा मृतदेह तिच्याच घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे भासत होते. मात्र हर्षदा हिची आत्महत्या नसून हत्या झाल्याचे आणि ही हत्या तिच्याच सख्या मोठ्या बहिणीने केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात समोर आला आहे. मयत हर्षदाची १९ वर्षीय मोठी बहीण सृष्टी बानकर हिचे श्रीरामपुर तालुक्यातील आकाश कांगुणे नामक तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याबद्दल हर्षदा हिने घरच्यांना सांगितल्यानंतर घरच्यांनी सृष्टीला समज दिली होती तसेच काही दिवस कॉलेजला जाऊ नकोस अशी सक्त ताकीद दिली होती.
त्यामुळे सृष्टीच्या मनात हर्षदाबद्दल रागाची भावना निर्माण झाली होती. त्यानंतर सृष्टी ही प्रियकरासोबत पळून जाण्याच्या तयारीत असल्याने हर्षदा हिने तीला तसे कृत्य करण्यास विरोध केला. प्रेमात आंधळी झालेल्या सृष्टीने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ओढणीच्या सहाय्याने गळा आवळून हर्षदाची हत्या केली. हत्येनंतर आरोपी सृष्टी हि प्रियकरासोबत ठरल्याप्रमाणे पळून गेली. कोपरगाव पोलिसांनी घटनेचा सखोल तपास करत आरोपी बहीण सृष्टी आणि तिचा प्रियकर आकाश कांगुणे यांना श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथून ताब्यात घेतले. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त होताच मयताच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी सृष्टी बानकर हिच्यावर कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मात्र आंधळ्या प्रेमापोटी मोठ्या बहिणीने सख्ख्या लहान्या बहिणीची हत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या हत्या प्रकरणात सृष्टीचा प्रियकर तसेच अन्य कोणी सहभागी आहेत का याबाबतचा अधिक तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहे.

