shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टि ट्वेंटीत ऑस्ट्रेलियन भूमी टिम इंडियाला धार्जिण !



         रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टिम इंडिया टि-२० विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियात दाखल झाली असून संघाने पर्थ येथील वाका मैदानावर सराव करण्यास सुरू केली आहे. क्वॉलिफिकेशन राऊंड १६ ऑक्टोबर पासून सुरू होत असून मुख्य स्पर्धेतील  भारतीय संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबर रोजी एक लाख प्रेक्षक क्षमता असलेल्या मेलबोर्नच्या एमसीजी स्टेडियमवर पारंपारीक प्रतिस्पर्धी पाकिस्तान सोबत होणार आहे.

          कसोटी व वनडेच्या तुलनेत भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात टि२० सामने खेळताना सुलभता जाणवते व यशाची लज्जतही जास्त प्रमाणात चाखायला मिळते. टि२० या क्रिकेटच्या छोट्या प्रकारात भारताची ऑस्ट्रेलियात असलेली सरस कामगिरी आगामी विश्वचषक स्पर्धेत खेळताना टिम इंडियाचा आत्मविश्वास वाढविण्यास बुस्टर डोसचे काम करू शकते. भारताने सन २००७- ०८ पासून ऑस्ट्रेलियात टि२० सामने खेळण्यास सुरुवात केली. तेंव्हापासून भारत तेथील पाच विविध मैदानावर बारा टि२० सामने खेळले आहेत. त्यातील चार सामने भारताच्या झोळीत पडले. चार सामन्यात भारताच्या हाती निराशा लागली तर एक सामना पर्जण्य राजाने धुवून टाकला.
          भारताने ऑस्ट्रेलियात जिंकलेले सर्व सामने यजमान ऑस्ट्रेलियाविरूध्द द्विपक्षीय मालिकेत खेळले आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे दोन किंवा अधिक सामने असलेल्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियात एकही मालिका गमावली नाही. सन २०१५-१६ मध्ये तीन सामन्यांची मालिका ३-० तर सन २०२०-२१ मध्ये २-१ ने भारताने आपल्या खिशात घातल्या होत्या. यजमान संघाला मायदेशात भारताविरूध्द एकही टि-२० सामन्यांची मालिका अद्याप जिंकता आलेली नाही.
         भारताने ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्ये ४ सामने खेळले, त्यापैकी तीन जिंकले तर एक गमावला. मेलबोर्न येथे ४ खेळले, त्यातील २ जिंकले, एक हारला तर एक पावसाच्या स्वाधीन झाला. एडिलेडला खेळलेला एकमेव सामना भारताने जिंकला. कॅनबेरा येथील एका सामन्याचा निकालही भारताच्या बाजूने लागला. तर ब्रिस्बेनला झालेला एक सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला. वरील पाचपैकी केवळ ब्रिस्बेन येथील पूर्व इतिहास भारताच्या विरोधात आहे.
            विश्वचषक स्पर्धेत सुपर -१२ मध्ये भारताला पाच सामने खेळायचे आहेत. त्यातील दोन एमसीजीवर, तर प्रत्येकी एक सामना सिडनी, पर्थ व एडिलेडला खेळायचा असून भारतासाठी टि२० मध्ये अनलकी ठरलेल्या ब्रिस्बेनच्या मैदानावर एकही एकही सामना होणार नाही.
            भारताचा संघ सध्या वेगळ्याच संक्रमणातून जात असून संघातील काही प्रमुख खेळाडू दुखापतींमुळे संघाबाहेर गेले आहेत तर गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये मुरदाड होऊन जाते. कोणताही गोलंदाज असो त्या षटकांमध्ये हमखास मार खाणार व जिंकलेला सामना भारत गमावणार असे जणू समिकरणच बनले आहे.
             पाकिस्तानसारखा संघ भारताविरूध्द वर्ल्डकपमध्ये खेळताना घाबरायचा, आता तर तो भारतावर वरचढ ठरत आहे. ज्या मैदानांवर भारत कधी हारत नव्हता तिथेही हारायला लागला आहे. एखाद्या संघाने प्रथम फलंदाजी करताना दोनशेच्या वर धावा केल्या तर त्यांचा विजय निश्चित मानला जातो. मात्र भारत मागील तीनपैकी दोन सामने हारला आहे. तर जो एक सामना जिंकला तोही गॅसवर गेला होता. भारतीय क्षेत्ररक्षण तर आता थट्टेचाच विषय बनला आहे. सोपे सोपे झेल सोडले जात आहेत. विशेष म्हणजे अशी चुक झालेले खेळाडू चक्क दाताड काढताना दिसतात. तेंव्हा त्यांची किळस येते. कोट्यावधी रुपये मानधन घेणारे हे खेळाडू जे झेल सोडतात तेच झेल मैदानाबाहेर उभे असलेले बॉल बॉईज तेच झेल लिलया पकडतात. तेंव्हा या खेळाडूंविषयी प्रत्येक क्रिकेटप्रेमीचा रागाचा पार वरचढतो.
             आता तर बुमराहा, जडेजा नसल्याने संघापुढील चिंता वाढली आहे. तरी सकारात्मक धोरण, समोरच्याला कमी न लेखण्याची चुक, स्वतःविषयी फाजिल आत्मविश्वास या बाबींवर नियंत्रण ठेवले तर कितीही प्रतिकूल परिस्थिती असेल तर यश दूर जाणार नाही. शिवाय ऑस्ट्रेलियातील मैदानांचा इतिहास भारताच्या बाजूने असल्याने पंधरा वर्षानंतर भारत विजेतेपदाचा ऐतिहासीक चमत्कार करू शकतो.

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close