प्रतिनिधी : संजय वायकर
सोलापूर : १० / "शिक्षण म्हणजे वळण, दळण नव्हे. शिक्षक हा ज्ञानाचा झरा असतो. विद्यार्थ्यांचे भवितव्य वर्गातच घडते. गुणवंतांचा सत्कार म्हणजे त्यांच्यातील कृतिशीलतेचा, ज्ञानाचा, कर्तृत्वाचा सन्मान असतो.टू-जी,थ्री-जी,फोर-जी इ. कुठल्याही *जी* पेक्षा *गुरु* जी सर्वात महत्त्वाचा असतो".. असे मत डाॅ.श्रीकांत येळेगावकर यांनी व्यक्त केले. सोलापूर जिल्हा वृत्तपत्र लेखक मंच तर्फे गुणवंत शिक्षकांच्या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.
वृत्तपत्र लेखकांना मार्गदर्शन करताना येळेगावकर म्हणाले की, वाचकांची पत्रे हे सदर वृत्तपत्रांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असते.अशी पत्रे संपादकांना मार्गदर्शन करतात. वृत्तपत्र लेखक लोक शिक्षकच असतात. त्यांनी वाचक पत्रे लिहिण्याची सवय पुढेही सुरु ठेवावी. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दै. पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे, कथामालेचे कार्यवाह अशोक खानापुरे, मंचचे अध्यक्ष प्रेमचंद मेने,कार्यवाह शोभना सागर,
कार्याध्यक्ष फैयाज शेख व्यासपीठावर उपस्थित होते .
सर्वधर्मीय प्रार्थना गायनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंचचे अध्यक्ष प्रेमचंद मेने यांनी प्रास्ताविक केले. शोभना सागर आणि अशोक म्हमाणे यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांची ओळख करुन दिली. पाहुण्यांच्या हस्ते उमा बागलकोटी,संध्या सरवदे-बनसोडे,जयश्री पवार, शीतल जालीमिंचे, शहाजी ठोंबरे यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात मंच मधील कार्यकारी मंडळ सदस्यांचाही सन्मान करण्यात आला.हा कार्यक्रम निवृत्ती गायकवाड (स्वकुल साळी) यांनी प्रायोजित केला होता.
यावेळी बोलताना भरतकुमार मोरे म्हणाले की, वर्तमानपत्रे लोकशाहीचा चौथा खांब आहे. वाचक पत्रांमधूनच लेखक, स्तंभलेखक तयार होतात. वाचक पत्रे समाज मनाचा आरसा असतात.वृत्तपत्र लेखकांनी वाचकांनी पत्रे लिहिण्याचा छंद,या पुढेही जोपासावा .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहकार्यवाह अरुणकुमार धुमाळ यांनी केले तर सदस्य रामचंद्र धर्मसाले यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी गणेश लेंगरे, अभिषेक चंद्रबन्सी सह सर्वसदस्यांनी परिश्रम घेतले.

