माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी इंदापूर येथील शहा परिवाराच्या खिलार गोशाळेला दिली भेट
मोहिते पाटील यांनी केले शहा परिवाराचे कौतुक
फोटो: इंदापूर येथील शहा परिवाराच्या खिल्लार गाईच्या गोशाळेत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,मुकुंद शहा,अंगद शहा व मान्यवर.
इंदापूर(प्रतिनिधी): राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांनी इंदापूर शहरातील शहा परिवाराच्या शेतात असलेल्या खिलार गाईच्या गोशाळेला(शुक्रवार ता.६)रोजी भेट दिली तसेच जिरेनियम शेतीची पाहणी करत,शेतीतील नवे प्रयोग राबवणारे,इंदापूर तालुका शिक्षक प्रसारक मंडळाचे मुख्य सचिव मुकुंद शहा,कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा व युवा शेतकरी अंगद शहा या शहा परिवाराचे कौतुक मोहिते पाटील यांनी केले.
यावेळी माहिती देताना मुकुंद शहा म्हणाले की,शहा परिवाराच्या तीन पिढ्यापासून, खिलार गाईंचा गोठा चालवला जात आहे. नारायणदास रामदास चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून,ही खिलार गाईंची गोशाळा अखंड चालत आलेली असून,अवघ्या चार ते पाच खिलार गाईपासून आता तब्बल दीडशे खिलार गाई निर्माण झाल्या आहेत.दिवसाला 80 लिटरच्या आसपास या खिलार गाईंपासून दूध मिळते व शहरातील जन्मलेल्या लहान बालकांसाठी हे दूध अत्यंत पोषक असल्याने, या खिलार गाईंच्या दुधाला पसंती मिळते आहे.
खिलार गाईच्या माध्यमातून मिळणारे शेन,गोमूत्र हे चांगली शेती करण्यासाठी शेतकरी वापरतात.या खिलार गाईंचे गोमूत्र या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने पकडले जात असून, साधारणपणे शेतकरी शंभर रुपये लिटर प्रमाणे हे गोमूत्र विकत घेतात.डाळिंब व भाजीपाला पेरू या पिकांवर या गोमूत्राची आम्ही फवारणी करत असल्यामुळे शेतीमधून मिळणारे उत्पन्न उत्पादन अधिकचे मिळते.या खिल्लार गाई ज्या कालवडींना जन्म देतात त्यांना कधीही विकले जात नाही.जो आज गोट्यातील खिल्लार गाई दिसत आहेत ती इथे जन्मलेले आहेत.अशी माहिती मुकुंद शहा यांनी दिली.
शहा परिवाराच्यावतीने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा,युवा शेतकरी अंगद शहा,मुकुंद कन्हैयालाल शहा,
डॉ.एस.टी.शहा,पत्रकार संघाचे अध्यक्ष नीलकंठ मोहिते,जावेद शेख,हमीद अत्तार,प्रमोद राऊत,बंडा चव्हाण,अक्षय सूर्यवंशी,गोशाळा चालवणारे मुकादम लोणकर,यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

