*विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा - प्रा.कुणाल काळे*
इंदापूर प्रतिनिधी:रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज इंदापूर येथे नुकतेच शाळा पातळीवर विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यानिकेतन अकॅडमीचे कुणाल काळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी प्रत्येक गोष्ट मोबाईलवर किंवा इंटरनेटच्या माध्यमातून न शोधता चिकित्सपने त्या विषयाच्या मुळापर्यंत जाऊन निरीक्षणाने शोधावे. तर्कसंगत विचार करावा. तरच संशोधक वृत्ती वाढीस लागेल असे काळे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, चिकित्सकृती, निरीक्षण क्षमता व नवनिर्मिती वाढावी यासाठी विद्यालयाचे प्राचार्य भास्कर वाबळे यांच्या मार्गर्शनाखाली दरवर्षी विद्यालयामध्ये विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. यामध्ये यावर्षी एकूण साठ उपकरणे विद्यार्थ्यांनी तयार करून मांडली. हवेचा दाब, सौर ऊर्जा, नैसर्गिक खते,बायोगॅस, गणितीय प्रतिकृती, मॅजिक ट्रिक्स इत्यादी विषयावर तयार करण्यात आलेली उपकरणे कशी वापरावीत याचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले. विद्यालयाच्या पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी प्रत्येक घटनेमागे विज्ञान आहे हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विषय प्रमुख अश्विनी भिसे यांनी केले. सूत्रसंचालन प्रिया भोंग यांनी तर अर्चना अनारसे यांनी आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विज्ञान v गणित विषय शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.

