shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हळवा प्रीतफुलोरा मनाचीए गुंती


मुंबई:- कवयित्री सौ.सुरेखा विवेक कुरकुरे यांचा 'मनाचीए गुंती' काव्याविष्कार प्राध्यापक, कवी ,गीतकार अशोक बागवे यांच्या प्रस्तावनेने, शुभेच्छापत्राने साजिऱ्या शब्दांनी सजला आहे तर चित्रकार सतीश भवसार यांनी आतील कवितांच्या डोहात शिरून मुखपृष्ठ सजावले आहे हे काव्यसंग्रह वाचताना जाणवते. म्हणजेच 'बोलक्या चित्ररूपी मुखपृष्ठाचा' आणि 'शब्दरूपी शुभेच्छांच्या सोनियाचा साज' कवयित्रीच्या कलाविष्काराला लाभला आहे हे कवितासंग्रहाच्या प्रथमदर्शनी समजते. 

             'मनाचीए गुंती' मधील कविता प्रितबावऱ्या निरपेक्ष प्रीत असणाऱ्या मृदू कोमल अशा नि:स्वार्थी प्रेमिकेच्या भावना आहेत हे जाणवते. या प्रेमिकेची एकच माफक अपेक्षा आहे ती म्हणजे तिच्या प्रियाचा सहवास. ही प्रेमिका मृदू, कोमल असली तरी तिची प्रीत कणखर आहे. तिच्या प्रियाच्या सोबत असण्याने, त्याच्या नुसत्या दर्शनाने ती भरभरून जगणारी आहे. तिचा प्रिया सुजाण आहे, तिच्या प्रियाच्या अंतरीच्या गंधाने,त्याच्या नजरेने त्याच्या प्रेमाच्या गारव्याने तिचा श्वास खुलतो अशी ती प्रेमरसात रमणारी आहे.
       ' विचार विश्वचि माझे मन
         आकाशी झेपावते  तन '
               कवयित्रीची कल्पनाशक्ती अफाट आहे. आकाशी झेप घेणारे तन ,आनंदाचे झोके शब्दमुके ,जलधारेच्या लेखणीने ,लेखणीच्या स्पर्शाने अंग अंग शहारणे हा कल्पनांचा आविष्कार विलक्षण आहे. 'रे मना...' या कवितेत संपूर्ण कविता मनाची अवस्था सांगते पण शेवटची ओळ वळण घेते नि म्हणते 'ऋतूमग्न राहते तन' अशा या कविता एकमेकांशी संलग्न असणाऱ्या तनाच्या आणि मनाच्या भावनांचा ,कल्पनांचा आविष्कार करणाऱ्या आहेत .रोज नव्याने प्रेम करणारी ही प्रीतबावरी आहे.
           कवितेच्या ओळींमधून प्रीतबावरीच्या भावना जाणवतातच परंतु तिच्या प्रियाचेही अंतरंग उभे राहते तो अजाण नाही ,त्याचे शब्द, त्याचा स्पर्श मोहवून टाकणारा आहे हे कवितांच्या  शब्दाशब्दांतून जाणवते.
          कवितासंग्रह साजिरा ,गोजिरा असला तरी एका कवितेत मात्र तुझ्यावर जीव टाकणाऱ्या, तुझ्यासाठी जगणाऱ्या एकनिष्ठ अशा तिच्यासाठी वेळ काढला का तुम्ही असा सवाल ती करते म्हणजेच प्रत्येक प्रेम करणाऱ्या 'स्त्री'ची माफक अपेक्षा हीच असते की आपण आपलं अस्तित्व जपून ज्याला जीवन बहाल करतोय त्यांनी आपल्याला वेळ द्यावा ही प्रत्येक 'स्त्री'च्या मनातील भावना कवयित्रिने 'तिच्यासाठी...: या कवितेत व्यक्त केली आहे.
         कवयित्रीची लेखणी सहज आहे कवयित्री निसर्गप्रेमी असणं स्वाभाविक आहे. पाऊसधारा कवितेत कवयित्रीने शब्दांनी निसर्ग रंगवला आहे.
         , अक्षरमाऊली शांताबाई शेळके म्हणतात कविता ही दिवाळीतील पणत्यांच्या प्रकाशासारखी असते. रांगेत लावलेल्या पणत्यांचा प्रकाश एकमेकांवर पडत असतो तशा कवितेच्या ओळी एकमेकांवर प्रकाश टाकतात तर हा प्रकाश एक आस्वादक म्हणून मला नक्कीच या कवितांमध्ये जाणवला.
            कवितासंग्रहाचं शीर्षक 'मनाचीए गुंती' असं असलं तरी कवितांमध्ये गुंतागुंत नाही, भावना सहज आहेत, रसाळ आहेत ,प्रेमळ आहेत आणि त्यांच्या नावाप्रमाणे रेखीव आहेत हा कवितासंग्रह नाजूक प्रीतफुलोरा म्हटलं तर वावगं ठरू नये.काव्याविष्काराला अनेक शुभेच्छा. प्रेमात 'पडलेल्या' प्रीतबावरीच्या या भावना असल्या तरी प्रेम जीवनात उभे राहायला शिकवते हे कवयित्री सांगून जाते.

कवितासंग्रह: मनाचीए गुंती
कवयित्री: सौ.सुरेखा विवेक कुरकुरे
आस्वादकपूर्ण रसास्वाद: कु.श्रृती रसाळ - मुंबई

संकलन: शौकतभाई शेख - श्रीरामपूर

close