रमजानुलमुबारक - २
*रमजान - निश्चयाचा काळ*
*सलीमखान पठाण*
. श्रीरामपूर
*9226408082.*
रमजान महिन्यामध्ये प्रत्येक कार्य अल्लाहच्या मर्जीसाठी केले जाते. तहान लागलेली असताना पाण्याला शिवण्याची सुद्धा इच्छा होत नाही. यामध्ये अल्लाहचा आदेश मोडेल ही भीती मनात असते.म्हणूनच आपण सर्वजण अल्लाहची मर्जी संपादन करण्यासाठी सर्व सहन करतो.हे सर्व सहन करण्याची ताकद कुठून मिळते ? तर मनाचा निश्चय आपल्याला ती मिळवून देतो. सूर्यास्तानंतरच आपल्याला जेवायचे आहे किंवा पाणी प्यायचे आहे,ही श्रद्धा मनामध्ये निश्चय निर्माण करते आणि आपण करीत असलेल्या या वर्तनाने अल्लाह प्रसन्न होईल ही भावना त्यामागे असते. म्हणूनच अतिशय भक्तिभावाने आपण रमजानचे पालन करीत असतो .
या वर्षी उन्हाळा तीव्र असल्याने निश्चित त्याचा परिणाम होणार आहे. परंतु वृध्द माणसे, आजारी रुग्ण, लहान मुले आदींना या मध्ये सूट दिलेली आहे. खूपच जास्त उष्णता असल्यास रमजानचे रोजे तहकूब करता येतात.
निसर्ग हा अल्लाहच्या आदेशानुसार कार्यरत असतो.गेले काही दिवस राज्याच्या विविध भागांमध्ये पाऊस येतोय. त्यामुळे वातावरणामध्ये थोडेसे वेगळेपण जाणवत आहे.निसर्गात होणारा बदल रोखणे हे आपल्या हातात नाही.आपण वाहत्या पाण्याला बांध घालू शकतो, पावसाला नाही.हवेला रोखणे आपल्या हातात नाही.एसी लावून आपण गारवा निर्माण करू शकतो, पण उष्णता रोखणे आपल्या हातात नाही. ज्या गोष्टी आपल्या ताब्यात नाही त्या करण्याचा प्रयत्न करू नये. निसर्ग हा ईश्वर निर्मित आहे. आपण जर निसर्गात बदल करायला लागलो तर त्याचे परिणाम सुद्धा आपल्यालाच भोगावे लागतील.तेव्हा अल्लाह ने ज्या गोष्टी निर्माण केल्या, त्यांचा सुयोग्य वापर करून आपण मानवतेसाठी त्यांचा सदुपयोग केला पाहिजे. रमजान महिन्यामध्ये केले जाणारे सर्व सोपस्कार हे मानवाच्या भल्यासाठी निर्मिले गेले आहेत .
अल्लाहतआला सर्वांना रमजान महिन्याचे पूर्ण पालन करण्याची शक्ती देवो.आमीन.(क्रमश:)
**********************

