shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गीताराम नरवडे लिखित 'होरपळ ' उपेक्षितांचे अंतरंग उघड करणारी प्रांजळ कादंबरी

    अहमदनगर जिल्ह्यातील टाकळी खातगावसारख्या खेड्यात वास्तव्य करणारे गीताराम पर्वती नरवडे हे अनुभवशील साहित्यिक आहेत. १९७८ पासून आम्ही काही साहित्यिक गावोगावी 'स्व'शिदोरी हाती घेऊन साहित्य संमेलने घेत असू,त्या साहित्याच्या वाटेवर भेटलेले साहित्यिक वारकरी म्हणजेच गीताराम नरवडे होय.खिशात दमडी नाही पण मनात उत्कट साहित्यभक्ती असल्याने आम्ही आमच्या पायपीट करीत अथवा मिळेल त्या वाहनाने प्रवास करीत साहित्य पंढरीत पोचत असू, त्यातील एक प्रांजळ कवी, लेखक म्हणजे जुने -जाणते सहप्रवाशी आहेत. त्यांची 'होरपळ 'ही ग्रामीण बोलीभाषेतील कादंबरी वाचून मनस्वी समाधान वाटले.प्रापंचिक वादळ, वाऱ्यात ही साहित्यज्योत त्यांनी जपली आहे, हा सर्वात मोठा आनंद आहे.भौतिक लखलखाटी वातावरणात अशी प्रांजळ मित्रमंडळी लिहितात, समाजाला प्रबोधित करतात ही तपस्वी वाटचाल अधोरेखित करण्यासारखी आहे.याच ग्रामीण जीवनाचा तळवेधी वेध घेणारी 'होरपळ 'मनाला समाजवास्तवाचे चटके देते आणि 'माणसा माणसा अजूनही कधी होशील माणूस 'ही आक्रोश आरोळी ऐकू येते. राजकारण, समाजकारण, अर्थकारण,धर्मकारण आणि सहकारधारण या पाचामुखी परमेश्वराचे अस्तित्व कोठे हरवले आहे,अशी आरोळी देणारी ही कादंबरी किती वाचकांना कळेल हा प्रश्नच आहे.पुस्तकांना वाचणे ही संस्कृती आम्ही विसरलो आहोत.सद्गुणी समाजनिर्मिती आणि राष्ट्रभक्ती संवेदनशीलता आम्ही गुंडाळून ठेवली आहे, असे हे गावगावीचे होरपळणे म्हणजे ही कादंबरी आहे. 

  'होरपळ'चे आशयसूत्र ग्रामीण जीवनाला अधोरेखित करते. लेखक लिहितात, कुटुंबाचा प्रमुख असणारी व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी,आपल्या भावासाठी जीवाचे रान करते. भावाच्या उत्कर्षासाठी आपलं सर्वस्व पणाला लावते. त्याला यशाच्या शिखरावर नेऊन पोहचवते. पण --ज्याप्रमाणे उंच शिखराची इमारत उभी राहिल्यानंतर उंचावरच्या शिखराला पायाच्या दगडाचा विसर पडतो, तसं रेवजी करतो. आपला भाऊ शिदबा  आणि वहिनी सिंधू, आपली आई यमुनाबाई यांना विसरतो. पत्नी   मनकर्णाच्या पूर्ण आहारी जातो. सासुरवाडीकडच्यांचं सांगण्याप्रमाणे वागतो. आपल्यासाठी ज्यांनी हालअपेष्ठा सहन केल्या त्यांनाच विसरतो. यात शिदबाच्या आयुष्याची 'होरपळ'होते, हा विषय यात चितारला गेला. "
   आजकालच्या कुटुंब व्यवस्थेची ही परवड गावोगावी दिसते. कृतज्ञता ही भावना आम्ही पायदळी तुडविली आहे. आईबाप,नातेसंबंधी आणि आदर्श परिवाराला आम्ही तिलांजली दिली आहे. शिक्षण आले, पण मती जागी झाली नाही गती आली पण नीती हरवली आहे,इतके अनर्थ एका अविद्येने केले होते पण विद्या येऊनही कृतज्ञता विसरलो आहोत. शिक्षण म्हणजे नीतिमान समाजनिर्मिती होय पण आम्ही महात्मा फुले यांच्या स्वप्नानाही दुर्लक्षित केले आहे.लोकशाही म्हणजे लोकांचे कल्याणकारी सुराज्य, एकमेकांविषयी आदरभाव, मुखी अमृतवाणी असेल तर पुढची पिढी ते घेईल पण आमची कुटुंबस्थिती आणि राजकारणनीती बिघडवूत ठेवत आहोत.पैसा आणि सत्ता हेच महत्वाचे झाल्यामुळे सेवाभाव विसरलेली समाजस्थिती कशी झाली, यासंदर्भाचे विदारक भाष्य करणारी ही कादंबरी वाचकाला अंतर्मुख करते.भाषिक कौशल्य आणि निवेदनातील चापल्य दर्शविणारी ही कादंबरी मैलाचा दगड ठरणारी आहे, फक्त तसा वाचक तिला लाभणे हे युगाचे आवाहन आहे. एक हृदयस्पर्शी भावचित्र समोर साकार होते. इतिहास संशोधक भा. ल. ठाणगे यांनी लिहिलेली प्रस्तावना वाड्मयीन गुणांचे दिशादर्शन करते. श्रीकृष्ण ढोरे यांचे अर्थपूर्ण मुखपृष्ठ बोलके आहे. लक्ष्मण प्रकाशन हे प्रकाशक व निर्मितीकार आहेत. ०४ जानेवारी २०२३ ची ही पहिली आवृत्ती  १९२ पृष्ठांची आहे. २६० रुपये किमतीची ही कादंबरी मातोश्री भागुबाई पर्वती नरवडे यांना अर्पण केली आहे.आजच्या कुटुंब व्यवस्थेची ही 'होरपळ 'उगवत्या पिढीला जीवनसंदेश देणारी आहे. एक संस्कृतीशील कादंबरी लिहिल्याबद्दल गीताराम नरवडे यांचे अभिनंदन आहे. 

 डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर - 413709
भ्रमणभाष - 9270087640

साहित्य वृत्तसंकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर
close