shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*रहने को ईस दहर मे आता नही कोई !तुम जैसे गये ऐसे भी जाता नही कोई..!!

अजात शत्रू व्यक्तिमत्व - ॲड.विजय पा.बनकर

श्रीरामपूर - मंगळवारी सकाळी शाळेमध्ये शालेय कामकाज करीत बसलो असतांना अकरा वाजता अमोल कदम यांचा फोन आला.भाई,पाटील गेले.शब्दांवर विश्वासच बसला नाही.दोनदा विचारून खात्री केली. तो म्हटला खरंय. त्यानंतर थोड्याच वेळामध्ये बादशाह इनामदार, सत्यनाथ शेळके,अंजुमभाई, अयाज तांबोळी आदि मित्रांचे फोन आले. विजू पाटलांच्या जवळचा मित्र म्हणून सगळे मला विचारीत होते. 

कुणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता.परंतु नियतीपुढे कोणाचे काही चालत नाही. आमचे सर्वांचे मित्र एडवोकेट विजयराव पाटील बनकर आम्हाला सोडून गेले होते.

आम्ही त्यांना पाटील म्हणायचो. कुणी त्यांना विजू बनकरच म्हणायचे.सुसंस्कृत विचाराचं अतिशय शालीन असे हे व्यक्तिमत्व.तीस वर्षांपूर्वी त्यांची माझी ओळख झाली आणि पुढे या ओळखीचे रूपांतर दृढ मैत्रीत झाले.
१९९५ - ९६ चा तो काळ होता. विजू पाटील जिल्हा परिषदेचे सदस्य होते. त्यांचे जिवलग मित्र अरुण पाटील कडू हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते तर श्रीरामपूर पंचायत समितीला नानासाहेब पवार सभापती होते.

जिल्ह्यातील उर्दू शाळांची त्या काळामध्ये खूपच दुरावस्था होती. शिक्षक संख्या कमी होती.शाळांना इमारती नव्हत्या.मी नुकतीच उर्दू बचाव समिती स्थापन केली होती.त्या समितीमार्फत आम्ही विजू पाटलांची कुंदे चेंबरला भेट घेतली. त्यांच्यापुढे उर्दू शाळांच्या समस्यांचा पाढा वाचला. पाटलांनी ते सर्व ऐकलं. त्यांच्या डायरीमध्ये नोंदी घेतल्या आणि एका मंगळवारी आम्हाला जिल्हा परिषदेत बोलावले.अरुण पाटील कडू यांच्या चेंबर मध्ये बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी यांना बोलावून उर्दू शाळांच्या समस्यांबाबत त्यांनी चर्चा घडवून आणली. स्थायी समितीच्या मीटिंगमध्ये तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांना या प्रश्नावर अर्धा तास उभे ठेवून सर्व प्रश्न मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करण्यास त्यांनी भाग पाडले. त्यांच्या या सहकार्यामुळे विजू पाटील आमच्या गळ्यातील ताईत बनले.

 २००० साली आम्ही मुशायरा कमिटीची स्थापना केली. श्रीरामपूर चे सर्वधर्मीय वातावरण हृढ होण्यासाठी सर्व धर्मीय मित्रांचा मुशायरा कमिटी मध्ये समावेश केला.विजू पाटील बनकर, संजय जोशी, डॉक्टर रवींद्र कुटे, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, शांतीलाल पोरवाल असे अनेक मित्र मुन्नाभाई पठाण, अशोक उपाध्ये, संजय छल्लारे यांच्या सहकार्याने आम्ही जोडले. विजू पाटलांना उपाध्यक्ष केले.पुढे सरकारचा नियम आला रात्री १० नंतर ध्वनिक्षेपक बंद करायचा आणि त्या कार्यक्रमावर विरजण पडले. दरवर्षी आम्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या भेटी घ्यायचो. दहा ऐवजी आम्हाला अकरा वाजेपर्यंत वेळ मिळावा अशी विनंती त्यांना करायचो. या कामी विजू पाटील यांची भूमिका महत्त्वाची असायची. एक रसिक व्यक्तिमत्व म्हणून ते आम्हाला अनुभवावयास मिळाले.याबाबत नेमका शासन आदेश काय आहे याचा अभ्यास त्यांनी केला.

 जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत त्या काळात आम्ही भेटी घेतल्या. त्यामध्ये विजू पाटलांचे योगदान महत्वपूर्ण होते.मुशायरा कमिटी मध्ये उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, स्वागताध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली.

श्रीरामपूर शहराची जडणघडण योग्य दिशेने व्हावी यासाठी शहरातील प्रश्नांसाठी आमचे ज्येष्ठ मित्र कै. सुमनभाई शहा यांचे पुढाकाराने जागृती व्यासपीठ या बिगर राजकीय संघटनेची स्थापना आम्ही केली. त्यामध्ये देखील विजयराव पाटील बनकर यांचा अतिशय सिंहाचा वाटा होता. नारायणराव डावखर, ॲडवोकेट भागचंदजी चुडीवाल, नाना सुरडकर, एडवोकेट आहेर साहेब,बारहाते सर अशी शहरातील दिग्गज मंडळी त्यामध्ये होती. रामनवमीचा उत्सव योग्य प्रकारे झाला पाहिजे, शहरातील अनेक प्रश्न सुटले पाहिजे या संदर्भात तत्कालीन आमदार जयंतराव ससाणे यांचे मार्फत नगरपालिकेचे प्रश्न असो, प्रांत आणि तहसीलचे प्रश्न असो, ते सोडविण्याचा प्रयत्न आम्ही त्या काळात केला. गुजरातमध्ये झालेल्या भूकंपग्रस्तांना मदत म्हणून जागृती व्यासपीठामार्फत निधी जमा केला आणि विजू पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही तत्कालीन जिल्हाधिकारी उमाकांत दांगट साहेब यांच्याकडे तो सुपूर्त केला. जागृती व्यासपीठा मार्फत सुमन भाईंच्या संकल्पनेतून गुजराती मंगल कार्यालयामध्ये झालेला ईद व दिपावली मिलन कार्यक्रम, कार्यक्रमास तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख विश्वासराव नांगरे व ॲड. रावसाहेब शिंदे यांची लाभलेली उपस्थिती संस्मरणीय ठरली.

रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य म्हणून विजू पाटलांनी अतिशय मोलाची कामगिरी केली. शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना प्रवेश मिळविण्याकरिता आम्हाला नेहमी त्यांचे सहकार्य मिळायचे. दरवर्षी दोन, पाच, दहा प्रवेश त्यांच्या शिफारशीने व्हायचे. कुणाच्या फी भरण्याच्या समस्या असायच्या, कुणाचे गुण कमी असायचे. परंतु अशा सर्व घटकांना विजू पाटलांमुळे मोठा आधार मिळायचा. जोडीला सुमनभाई शहा यांची साथ त्यांना लाभली. एडवोकेट रावसाहेब शिंदे यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी रयत मध्ये अतिशय सुंदर काम केले.

शासकीय अधिकाऱ्यांमध्ये विजयराव पाटलांची एक स्वतःची वेगळी ओळख होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार,वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्याशी त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे अनेक लोकांची कामे ते मार्गी लावत होते.सदर कामे करताना आपला, परका, लांबचा, जवळचा असा भेदभाव त्यांनी कधी केला नाही.
श्रीरामपूर वकील संघाचे सहा वर्षे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले. श्रीरामपूरला जिल्हा न्यायालय झाले पाहिजे. त्याचबरोबर श्रीरामपूरला जिल्हा न्यायालयाची इमारत झाली पाहिजे यासाठी त्यांनी अतिशय खडतर परिश्रम घेतले. अनेक वेळा शिष्टमंडळ मंत्रालयात नेऊन त्यांनी श्रीरामपूरचे न्याय मंदिराच्या इमारतीसाठी मोठा निधी उपलब्ध करून घेतला. श्रीरामपुरात सहकार न्यायालय सुरू करण्यामध्ये देखील त्यांचा सिंहाचा वाटा आहे.श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द संस्मरणीय ठरली.

एडवोकेट रावसाहेब शिंदे यांच्या सहवासात असल्याने आनंदवन च्या आमटे कुटुंबीयांशी देखील त्यांचा जवळचा संबंध आला. बाबा आमटे आणि त्यांच्या चळवळीला श्रीरामपूरातून त्यांनी मोठे सहकार्य केले.
अशा अनेक क्षेत्रांमध्ये विजयराव पाटील बनकर यांचे मोलाचे योगदान राहिलेले आहे. अनेक प्रसंग,अनेक आठवणी त्यांच्या सांगता येतील.स्वर्गीय गोविंदरावजी आदिक, खासदार बापूसाहेब तनपुरे, नामदार बाळासाहेब थोरात, आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांचे सह अनेक राजकीय व्यक्तींशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. स्वतः विजयराव बनकर यांचे साडू आणि मेहुणी राज्यामध्ये खासदार आणि आमदार असताना त्यांनी या आपल्या राजकीय नातेसंबंधांचा स्वतःसाठी कधी वापर करून घेतला नाही. एकदा महसूल मंत्री म्हणून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे श्रीरामपूरच्या प्रांत कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्या वेळी आम्ही मित्र परिवाराने विजयराव पाटील बनकर यांना न विचारता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी अशी मागणी निलंगेकर साहेबांकडे केली. परंतु ही मागणी ऐकल्यानंतर त्यांनी स्पष्ट नकार दिला.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना त्यांनी अनेक पदे भूषवली. मात्र त्या पदाचा कधी गैरवापर केला नाही. तर त्या पदाला न्याय द्यायचा आणि त्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आज त्यांच्या आठवणीने मन भरभरून येते. अशा व्यक्ती फार क्वचित होतात.अतिशय समर्पित जीवन ते जगले आणि अचानकपणे आपल्यातून निघून गेले. शेवटी त्यांच्यासाठी एवढेच म्हणावेसे वाटते कि -

*रहने को ईस दहर मे आता नही कोई*
*तुम जैसे गये ऐसे भी जाता नही कोई*


*सलीमखान पठाण*
माजी चेअरमन,शिक्षक बँक,
जिल्हाध्यक्ष,अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषद.
मोबा: 9226408082.
*वृत्तसंकलन : समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर






close