शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरुवार दिनांक ०१ जुन २०२३
श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे, लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालया चे प्राचार्य संभाजी पठारे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त..!!
राहुरी : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे, लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहुरीचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे हे नियत वयोमानानुसार दि.३१ मे २०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. सततचा दुष्काळ आणि अवर्षणग्रस्त तालुका म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील 'पारनेर'ची ओळख आहे. याच तालुक्यातील 'वडुले' हे पठारे सरांचे गाव, शिक्षणामध्ये गती असल्याने त्यांचा शिक्षणाचा प्रवास प्राथमिक ते पीएच.डी. पर्यंतचा विविध ठिकाणी झाला. २२ वर्षे 'प्राध्यापक' म्हणून त्यांनी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या विविध महाविद्यालयामध्ये, मा. कुलगुरू, पुणे विद्यापीठ यांचे आदेशानुसार ०६ वर्षे पुणे विद्यापीठाच्या 'विद्यार्थी कल्याण मंडळा'चे 'संचालक' आणि लोकनेते रामदास पाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे 'प्राचार्य' म्हणून १२ वर्षे अविरत सेवा देऊन सेवानिवृत्त होत आहेत. जवळपास ४०-४१वर्षे त्यांनी शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ सेवाकालावधी व्यतीत केला.
दि.२१ एप्रिल, २०११ रोजी प्रभारी प्राचार्य श्री.रामराव देशमुख यांचेकडून डॉ. संभाजी पठारे यांनी 'प्राचार्य' पदाचा कार्यभार स्वीकारला. पहिल्या दोन दिवसांमध्ये शिक्षक, शिक्षेकतर, विद्यार्थी यांच्या बैठका घेऊन अडीअडचणींच्या १५ प्रश्नांची यादी तयार केली आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविला. पिण्याचे पाणी महाविद्यालयाला तत्कालीन नगराध्यक्षांच्या सहकार्याने ४ नळ कनेक्शनने मिळविले. त्याच दिवशी संध्याकाळी ६ वा. महाविद्यालयात पिण्याचे पाणी आले. संस्थेची आर्थिक स्थिती चांगली नव्हती, त्यामुळे आर्थिक प्रश्न होतेच. यावर मार्ग काढण्यासाठी ११ नवीन अभ्यासक्रम सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव तत्कालीन कुलगुरु मा. डॉ. वासुदेव गाडे यांच्या शिफारशीने आणि संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष यांचे मध्यस्थीमुळे ना. राजेश टोपे (तत्कालीन मंत्री, उच्च शिक्षण) यांनी सदर अभ्यासक्रमांना मान्यता दिली. यामुळे डॉ. पठारे सरांच्या दूरदृष्टीमुळे महाविद्यालयाला दरवर्षी ८५ लाख ते १ कोटी प्रवेश शुल्क अतिरिक्त मिळण्याची व्यवस्था झाली.
पठारे सरांनी कल्पकतेच्या जोरावर महाविद्यालय इमारतीचे सुशोभिकरण केले. महाविद्यालयातील विद्यार्थिनीसाठी १९ लाख रुपये खर्चून अद्यावत प्रसाधनगृह बांधले. मुख्य इमारतीचा मागील भाग पेव्हिंग ब्लॉक बसवून आकर्षक केला. यामुळे मुलींची बसण्याची सोय झाली व महाविद्यालयाच्या विविध कार्यक्रमासाठी भव्य पटांगण निर्माण झाले. ग्रंथालयासाठी फर्निचरसह सुसज्ज वाचनकक्ष निर्माण केले. शिक्षकांसाठी वातानुकूलित कक्ष तयार केला. पावसाळ्यात महाविद्यालयामध्ये गळती होत होती. रु.२० लाख खर्च करून 'वॉटर प्रूफिंग' करून घेतले. धुळीपासून मुक्तता होण्यासाठी महाविद्यालय परिसरामध्ये रु.३० लाख खर्चून सिमेंट कॉक्रीटचे रस्ते तयार केले. विविध महाविद्यालयाच्या पुरवठादारांकडून ०४ टी.व्ही. स्क्रीन देणगीरूपात मिळविले. युजीसीकडून महाविद्यालयासाठी क्रीडासंकुल उभारणीसाठी रु.७० लाख अनुदान मिळविले. यासाठी संस्थेकडून ३८०० चौ.फुट. बांधकामाची परवानगी मिळाली होती. पण सरांनी रु.१ कोटीहून अधिक खर्च करून सुमारे १०,००० चौ.फुट आकाराचा हॉल संस्थेच्या परवानगीने तयार केला. विशेष म्हणजे इ.स.२०१३ नंतरच्या सर्व निवडणुकांची प्रशिक्षण व मतमोजणी प्रक्रिया तालुका प्रशासनाने याच हॉलमध्ये घेतली. प्राचार्य पदाची सूत्रे हाती घेतली, तेव्हा मुलीच्या वसतिगृहाचे काम अर्धवट अवस्थेत होते. ते महाविद्यालयाच्या व्यवस्थापन खर्चातून सुमारे २ कोटी रुपये खर्च करून केले. वसतिगृहाची ही दिमाखदार वास्तू आज महाविद्यालय परिसरामध्ये उभी आहे.
महाविद्यालय परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून सर्व हितचिंतक, माजी विद्यार्थी, निवृत्त सेवक व राहुरी तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या मार्फत रु.२,११,०००/- निधी जमा केला. यातून १०४ पाम वृक्षाची लागवड 'कमवा आणि शिका' योजनेतील मुलांच्या मदतीने केली गेली. जागतिक दर्जाचे 'कॅक्टस गार्डन' निर्मितीची संकल्पना हा महाविद्यालयाच्या शिरपेचातील मानाचा तुरा ठरला. कारण ३०० पेक्षा ही जास्त कॅक्टस प्रजातीचे संगोपन या उद्यानात केले आहे. या उद्यानाला अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या, यामध्ये उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती मंजुळा चेल्लूर यांचा ही समावेश होतो. या उद्यानातून रु.३,५५,०००/- रुपयाचे उत्पन्न मिळाले. याची दखल देशपातळीवरील अनेक महाविद्यालयाने घेतली आणि राहुरी महाविद्यालयाच्या व पठारे सरांच्या मार्गदर्शनाखाली त्या महाविद्यालयामध्ये 'कॅक्टस गार्डन' निर्मितीची झाली. या सर्व परिश्रमाचे फलित म्हणून महाविद्यालयास सन २०१७चा, महाराष्ट्र शासनाचा प्रथम क्रमांकाचा रक्कम रु.१ लाखाचा 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार' दि.२१ मार्च, २०१७ रोजी तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शुभहस्ते मिळाला. आजमितीस महाविद्यालय परिसरात विविध प्रकारची सुमारे २६,००० हून अधिक झाडे उभी करण्यात सरांना यश मिळाले. 'राहुरी शहराचे फुफ्फुस' अशी नवी ओळख महाविद्यालयाला देण्यात सर यशस्वी झाले.
सरांच्या कुशल सन २०१३ व २०१६ मध्ये, पुणे विद्यापीठाचा 'उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार' राहुरी महाविद्यालयाला मिळाला. NAAC कडून सर्वोच्च 'A' ग्रेड ही मिळाली. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अर विद्यार्थी संख्या राहून ५३१३ पर्यंत पोहचविण्यात यश मिळाले. पुणे विद्यापीठ परीक्षा मंडळाचे सदस्य म्हणून सरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'ऑनलाईन प्रश्नपत्रिका' आणि 'पदवीग्रहण समारंभ' या योजना अधिक लोकप्रिय झाल्याने देशातील अन्य विद्यापीठांनाही, याचे अनुकरण करण्याचा मोह झाला. सरांच्या काळात परीक्षेच्या कालावधीत महाविद्यालय परिसर 'कॉपीमुक्त' झाला. समाजातील दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना 'मिनरल वॉटर'ची सोय केली. महाविद्यालय शहरापासून ३ कि.मी. दूर असल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. याकरिता श्रीरामपूरच्या आगार व्यवस्थापकांना विनंती करून सायंकाळी ०४ बसेस राहुरी महाविद्यालय ते राहुरी बस स्थानक प्रवासासाठी उपलब्ध करून घेतल्या. सन २०१७ पासून, संगणकीय अभ्यासक्रम सुरु झाल्याने संगणक प्रयोगशाळेची निकड भासली. भारत सरकारच्या, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून सुमारे रु.४० लाख अनुदान मिळवून संगणक प्रयोगशाळा उभारली.
गुहा येथील अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना महाविद्यालयात मोफत सोय केल्याने आज तेथील अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. यामध्ये श्री.महेश बडाख हा विद्यार्थी यु.पी.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. हजारो गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सरांनी मदतीचा हात दिला. 'कमवा आणि शिका'तील विद्यार्थ्यांना 'गुरुवारचा खाऊ', 'माझी आई माझ्या महाविद्यालयात' या सारखे अभिनव उपक्रम राबवले. अनेक विद्यार्थ्यांना सायकल वाटप, गणवेश वाटप, बूट वाटप केले. प्रसंगी पदरमोड ही केली. कायम विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी आपली शैक्षणिक वाटचाल केली.
विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, राज्य पुरस्कार विजेता आदर्श शिक्षक, विद्यार्थी कल्याण मंडळाचा लोकप्रिय 'संचालक', विद्यापीठ अधिकार मंडळांचे ख्यातनाम सदस्य, गरीब व अनाथ मुलांचा आधार तसेच गुणवंत विद्यार्थी घडवू शकेल, अशा आदर्शवत महाविद्यालाची नवनिर्मिती करणारा 'प्राचार्य' असा त्यांचा प्रवास अनेकासाठी प्रेरणादायी आहे. आज सर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना पुढील नवे पर्व उत्तम आयुरारोग्य, आनंदी आणि समाधानाचे व्हावे, या मनःपूर्वक शुभेच्छा..!
Shirdi Express Live🎥#वृत्तसेवा करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

