श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील डी डी काचोळे माध्यमिक विद्यालयाने आषाढी एकादशीचे औचित्य साधून वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन केले. विद्यालयाचे मा. मुख्याध्यापक सुनील साळवे, पर्यवेक्षक बाळासाहेब रासकर व ज्येष्ठ शिक्षक संतोष सोनवणे यांच्या शुभहस्ते वृक्ष व ग्रंथ यांचे पूजन करून दिंडीची सुरुवात झाली. या दिंडीचे प्रमुख आकर्षण म्हणजे पालखीमध्ये वृक्षाची रोपे व ग्रंथ ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ, मृदुंगाच्या गजरात वृक्ष व ग्रंथ यांचे महत्त्व दिंडीद्वारे श्रीरामपूरकरापर्यंत पोहोचवले. काही विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषाही केलेली होती.
विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. सुनील साळवे यांनी उपक्रमाबद्दल बोलताना उद्गार काढले की दिंडीची वारकरी सांप्रदायाची परंपरा खूप वर्षापासून चालत आली असून पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी आता या नवीन पिढीवर आहे. या पिढीला वृक्षाचे महत्त्व कळावे तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी, ग्रंथांचे महत्त्व लक्षात यावे या दृष्टीने ही ग्रंथदिंडी व वृक्षदिंडी आयोजित करण्यात आली. दिंडीमध्ये विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व शाळेचे हितचिंतक या सर्वांनी सहभाग घेतला. श्रीरामपूरमध्ये दिंडीचे ठीक ठिकाणी पूजनही करण्यात आले. दिंडी विद्यालयात आल्यानंतर विद्यालयामध्ये नयन मनोहर असा आकर्षक रिंगण सोहळा पार पडला. यामध्ये विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका धरला, मुली फुगड्या खेळल्या. अशाप्रकारे विद्यालयाने एक पर्यावरण व ग्रंथ यांचे प्रती समाज प्रबोधन करणारी दिंडी आयोजित करून श्रीरामपूरमध्ये एक वेगळा उपक्रम राबवला.
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -9561174111

