shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयसीसी विजेतेपदाचा भारताचा दुष्काळ संपणार ?



          सन २०१३ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात इंग्लंडमध्येच झालेल्या चॅंपियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने यजमान इंग्लंडला लोळवून आपली शेवटची आयसीसी स्पर्धा जिंकली त्यानंतर तब्बल दहा वर्ष लोटली तरीही भारताला आपल्या खात्यात एकाही विजेतेपदाची भर टाकता आली नाही.
          या दरम्यान भारताने वनडे व टि२० चे अनेक निर्णायक सामने गमावले. यात कमी की काय म्हणून आयसीसीने सन २०१९ ते २१ या कालावधी कसोटी सामन्यांची " विश्वचषक अजिंक्यपद " स्पर्धा सुरू केली तिच्या अंतिम सामन्यातही न्युझिलंडने भारताला धुळ चारून आयसीसी विजेतेपदा पासून भारताला वंचित ठेवले.
          गुरूवार ७ जूनपासून इंग्लंडमधील ऐतिहासिक ओव्हल मैदानावर
 " कसोटी विश्व अजिंक्यपद " स्पर्धेच्या दुसऱ्या चरणाच्या अंतिम सामन्यात भारत पुन्हा एकदा धडक मारून आपले आयसीसीच्या स्पर्धांचे विजेतेपद मिळविण्यासाठी नशिब अजमावणार आहे.
          या वेळी भारतासमोर आव्हान आहे ते एकेकाळी क्रिकेट विश्वावर अधिराज्य गाजविणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे. ऑस्ट्रेलियाच्या जुन्या लौकीकाकडे बघितल्यास एखाद दुसरा अपवाद वगळल्यास आयसीसी स्पर्धात अंतिम फेरी गाठल्यास हमखास विजेतेपद मिळविले आहे. त्यामुळे भारताच्या स्वप्नांचा चक्काचूर होणार असल्याचे जुने रथी महारथी क्रिकेटपटू व क्रिकेट पंडित काही दबक्या आवाजात तर काही उघडपणे बोलत आहेत.
            अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारत व आस्ट्रेलिया या दोन देशांच्या मागील पाच वर्षात झालेल्या मालिकांवर एक नजर टाकली तर भारताचेच पारडे ऑस्ट्रेलियापेक्षा जड दिसते. सन २०१७ मध्ये भारताने भारतात कांगारूंना धुळ चारली होती, त्यानंतर सन २०१९ व सन २१ मध्ये भारताने कांगारूंना ऑस्ट्रेलियात जाऊन लोळविले आहे. शिवाय दोन महिन्यांपूर्वी भारतात झालेल्या मालिकेतही भारताने बाजी मारली असल्याने नैतिकदृष्टया भारताला या सामन्यात विजयाची संधी अधिक दिसते. परंतु आयसीसीच्या अंतिम सामन्यांचा इतिहास लक्षात घेतला तर भारताला भाव द्यायला जाणकार मंडळी तयार नाहीत.
            मागच्या अनेक सामन्यांच्या तुलनेत या वेळी भारताची फलंदाजी मजबूत दिसते. विशेष म्हणजे या वेळी भारताचे प्रमुख फलंदाज फॉर्मात दिसत असून ओव्हलच्या हिरव्या लुसलुशीत खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाच्या जलदगती माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांनी लौकीकाला साजेसा खेळ केला तर चमत्काराची आशा धरता येईल. त्यासाठी भयंकर फॉर्मात असलेल्या शुभमन गिल व कर्णधार रोहित शर्माच्या सलामी जोडीला मजबूत पायाभरणी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अनुभवी चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य राहाणे यांना आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजवावे लागेल.
           त्याचबरोबर जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज व उमेश यादवला आग ओकावी लागणार असून अनुभवी फिरकीपटू रविंद्र जडेजा व रविचंद्रन आश्विनला आपले कौशल्य पणास लावावे लागणार आहे. रिषभ पंतच्या गैरहजेरीत ईशान किशन की श्रीकर भरत यांच्या पैकी कोण एक जण स्थान मिळवितो हे बघणे रंजक ठरेल. सध्या तरी भरतच भारी भरेल असेच दिसते. तर खेळपट्टी बघून आश्विन व शार्दूल ठाकूर यांच्यावर निर्णय ठरेल. परंतु ऑस्ट्रेलियन संघात असलेल्या डावखुऱ्या फलंदाजांची संख्या व आश्विनचा त्यांच्यावर असलेला वचक बघता आश्विनच अंतिम अकरा जणांचा हिस्सा ठरू शकतो.
            निर्णायक सामन्यात संघ निवडीतच बाजी गमावणाऱ्या भारतीय संघ प्रबंधनाने यावेळी अतिप्रयोग न करता खेळपट्टी, वातावरण व खेळपट्टीचा अभ्यास करून संघाची निवड केल्यास दहा वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा टिम इंडियाचा दुष्काळ नक्कीच संपेल.
           चला तर, आपण भारतीय चमूस शुभेच्छा देताना विश्वविजेतेपदाची गदा भारतातच येईल अशी आशा करूया !

लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close