विद्यमान राज्य शासनाला एक पूर्ण झाले आहे. या गेल्या एक वर्षात प्रशासन पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करण्यावर भर देत महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने अनेक जनहिताचे निर्णय घेतले आहेत. राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने वर्षभरामध्ये सर्वसामान्य माणुस हा केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या विकासात भर टाकणारी अनेक विकास कामे जिल्ह्यात करण्यात आली. शासनाच्या लोकाभिमुख निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरु आहे. याबाबत थोडक्यात घेतलेला हा आढावा. …
दुष्काळी व जिरायती भागांसाठी जीवनदायी निळवंडे धरण अकोले तालुक्यातील प्रवरा नदीवर निळवंडे धरण प्रकल्प साकारण्यात आला आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठा 236 दक्षलक्ष घनमीटर, 8.32 टीएमसी एवढा आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरण जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम सुफलाम करणारा प्रकल्प ठरणार आहे. डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 68878 हेक्टर (1 लाख 70 हजार 200 एकर) शेतजमिन ओलिताखाली येणार आहे. सिन्नर तालुक्यातील 6 गावांमधील 2 हजार 612 हेक्टर शेतजमीन वगळता अहमदनगर जिल्ह्यातील 66 हजार 266 हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. 8 मार्च 2023 रोजी 5 हजार 177 कोटी रूपयांची पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता या प्रकल्पास मिळाली आहे. बहुउद्देशीय निळवंडे धरण प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायती भागांसाठी जीवनदायी ठरणार आहे.
*वाळू धोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीत जिल्हा अग्रेसर*
राज्यात वाळूचे अनधिकृतपणे होणारे उत्खनन रोखून अवैध वाळु वाहतुकीला आळा बसविण्यासाठी व सर्वसामान्य व्यक्तीला स्वस्त दरामध्ये वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारातुन राज्य शासनाने वाळू धोरण जाहीर केले आहे. नवीन वाळू धोरणाची सर्वात प्रथम अहमदनगर जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली. राज्यातील पहिला शासन नियंत्रित वाळू डेपो श्रीरामपूर तालुक्यातील मौजे नायगांव येथे कार्यान्वित करण्यात आला. जिल्ह्यातील वाळू डेपोच्या माध्यमातून नागरिकांना 600 रुपये प्रती ब्रास याप्रमाणे वाळू उपलब्ध करून देण्यात येत आहे.
*पशुधन विकासाला चालना*
राज्यातील भटक्या जमाती धनगर व तत्सम प्रवर्गाच्या कुटुंबातील सदस्यांच्या संयुक्त दायित्व गटास मेंढी व शेळी पालनासाठी नियमित रोजगार उपलब्ध व्हावा, यादृष्टीने राष्ट्रीय सहकार विकास निगममार्फत कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य देण्याची योजना शासनाने मंजूर केली आहे. ही योजना महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महासंघामार्फत राबविण्यात येणार असून या महासंघाचे मुख्यालय अहमदनगर येथे सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यात पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मान्यता देण्यात आली असून त्यासाठी जागाही उपलब्ध करून देण्यात येत आहे. मेंढी विकास प्रकल्प व राज्यस्तरीय लोकर प्रक्रिया केंद्राची स्थापना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे करण्यात येणार आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी जागेची निवडही करण्यात येत आहे.
*महाराष्ट्राची भाग्यरेखा बदणारा हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग*
समृध्दी महामार्गाची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी २९.४० किलोमीटर असून कोपरगाव इंटरचेंज पासून शिर्डी १० किलोमीटर आहे. अहमदनगर मुख्यालयाचे अंतर ११० किलोमीटर आहे. समृध्दी महामार्गालगत जिल्ह्यात २ कृषी समृध्दी केंद्र उभारण्यात येणार आहेत. यामुळे शिर्डी व अहमदनगर परिसरातील कृषी, उद्योग व व्यवसायाला चालना मिळून रोजगार वाढणार आहे. समृध्दी महामार्गामुळे शिर्डीत देशविदेशातून येणाऱ्या भाविकांची संख्या ही वाढणार आहे. शिर्डी व परिसराच्या विकासाला गती मिळणार आहे.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले होते तर शिर्डी ते भरवीर (ता. इगतपुरी) या ८० किलोमीटर लांबीच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच कोकमठाण येथील शिर्डी इंटरचेंज येथे झाले.
*राष्ट्रीय पशुधन महाएक्पोतुन तंत्रज्ञानाचा प्रसारास चालना*
भारतातील सर्वात मोठया अशा राष्ट्रीय पशुधन महाएक्सपोचे 24 ते 26 मार्च या कालावधीत शिर्डी येथे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यासह परराज्यातील 87 प्रजातीचे पशुधन या महाएक्सपोमध्ये दाखल झाले होते. विविध प्रकारच्या 400 हून अधिक स्टॉलची या महाएक्स्पोत उभारणी करण्यात आली होती. महाएक्सपो प्रदर्शनास सुमारे 8 लाख पशुपालकांनी भेट दिली. नवनवीन तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यास या महाएक्स्पोतुन मोठ्या प्रमाणात चालना मिळाली.
गत एक वर्षात शासनाने घेतलेल्या विविध निर्णयांची जिल्ह्यात यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली आहे. या योजनांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकाला न्याय देण्याबरोबरच आर्थिकदृष्टया मागास व दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठीही शासन प्रयत्नशिल आहे. राज्याचे महसुल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगर जिल्हयाचा विकास हेच ध्येय मानून त्यादृष्टीकोनातून वाटचाल सुरु आहे.
डॉ.रवींद्र ठाकुर
जिल्हा माहिती अधिकारी, अहमदनगर
--------------------------------------
संकलन:
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174112

