प्रतिनिधी : संजय वायकर
अक्कलकोट : दि . ३० /
मंगरूळे प्रशालेतील शालेय पोषण आहारातील भ्रष्टाचाराच्या दंडाची रक्कम न भरल्याने मुख्याध्यापकासह तिघांचा पगार रोखण्यात आला आहे. येथील प्रतिष्ठित केएलई मंगरुळे प्रशालेत गेल्या दहा वर्षापासून सलग शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार सुरू होता.त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी शासन नियुक्त त्रीसदस्य समिती स्थापन करण्यात आली होती.समितीने कसून चौकशी करून दोन महिन्यापूर्वी अहवाल सादर केला त्यामध्ये चौदा लाख चौतीस हजाराचा भ्रष्टाचार सिद्ध झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर यांनी संबंधित शाळेचा विद्यमान सचिव,तत्कालीन मुख्याध्यापक आणि हिशोब लिहिणाऱ्या शिक्षकाकडून दंडाची रक्कम दोन दिवसात वसूल करण्याचे लेखी आदेश दिले होते. मात्र त्या घटनेस अनेक वेळा पत्र देऊन लेखी कारवाई करून देखील दंडाची रक्कम संस्थेने भरली नाही .
त्यानंतर विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना संपूर्ण शाळेचा पगार रोखण्यास सांगितले होते.पण तूर्तास फक्त तिघांचे पगार रोखण्याचे आदेश दिले.त्याप्रमाणे मंगरूळे प्रशालेचे विद्यमान मुख्याध्यापक नंदाजी कदम,भ्रष्टाचार केलेला तत्कालीन मुख्याध्यापक गिरीश पटेद आणि बनावट हिशोब लिहिणारा सहशिक्षक देवराज षटगार या तिघांचे ऑगस्ट_सप्टेंबर पासून पगार रोखण्याचे लेखी आदेश अक्कलकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी कुदशिया शेख आणि शालेय पोषण आहाराचे अधीक्षक हरीश गायकवाड यांनी काढल्याने माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी तिघांचा पगार रोखला.सलग दहा वर्षे चाललेला महाराष्ट्रातला हा सर्वात मोठा साखळी भ्रष्टाचार असून दंडाची रक्कम तीस लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे.या घटनेमुळे संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मंगरूळे प्रशाला अक्कलकोट येथे पंतप्रधान शालेय पोषण आहारात झालेला गैरप्रकार शासनाची जाणीवपूर्वक केलेली फसवणूक आहे.चौकशी समितीने दंड आकारणी केल्यानंतरही केएलई संस्था गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.तत्कालीन मुख्याध्यापक गिरीश पटेद हेच या भ्रष्टाचारास सर्वस्वी जबाबदार आहेत.सध्या या संस्थेतील तिघांचे पगार शासनाने बंद केले आहे. आठ दिवसात दंडाची रक्कम भरली गेली नाही तर संपूर्ण शाळेचा पगार रोखण्याची कारवाई करण्यात येईल. . .
- - - हरीश गायकवाड
अधीक्षक, पीएम पोषण आहार योजना पं.स, अक्कलकोट

