साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार नेहमीच समाजासाठी दिशादर्शक - महेंद्र रेडके.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती पडस्थळ येथे साजरी...
इंदापूर प्रतिनिधी: दि. १ ऑगस्ट २०२३ रोजी पडस्थळ (ता. इंदापूर) येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी मार्केट कमिटीचे माजी व्हा.चेअरमन पांडुरंग मारकड,राजेंद्र बोंगाणे, महेंद्र रेडके, गणेश गव्हाणे, चंद्रकांत बोंगाणे, ग्रामसेवक महेश यादव, ग्रामपंचायत कर्मचारी खंडेराव कोकरे व ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी आपल्या मनोगतामध्ये महेंद्र रेडके म्हणाले की ,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे १ जून १९२० रोजी झाला होता. जगप्रसिद्ध कादंबरी फकीरा, वारणेचा वाघ, चित्रा वैजयंता, माकडीचा माळ इत्यादी साहित्य निर्मिती त्यांनी केली. याच सोबत त्यांची प्रवास वर्णने व कथासंग्रह देखील उपलब्ध आहेत. १९६१ साली त्यांनी शिवचरित्रावरील पोवाडा रशियामध्ये सादर केला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी योगदान दिले. दीनदुबळ्या शोषितांच्या व्यथा त्यांनी जगासमोर मांडल्या. स्वतः अशिक्षित असून देखील त्यांनी जगा समोर एक आदर्श निर्माण केला. त्यांचे विचार नेहमीच समाजासाठी दिशादर्शक आहेत.
दीड दिवस शाळेत गेलेल्या अण्णा भाऊ साठे यांनी ३५ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्य, ११ पोवाडे, एक प्रवासवर्णन आणि शेकडो लावण्या, गाणी लिहिली आहेत. अशा लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.

