मराठी साहित्यात ललितगद्य लेखन अनेक दृष्टीने वाचकप्रिय आहे.त्यामध्ये विनोदी व्यक्तिचित्रे म्हणून पु. ल. देशपांडे यांची 'व्यक्ती आणि वल्ली 'प्रसिद्ध आहेत. माणसांना हसविणे ही तणावपूर्ण जगात आता काळाची गरज आहे. आचार्य प्र. के. अत्रे म्हणतात, "शब्दांच्या योजनेने हास्यरस निर्माण करणे याला विनोद म्हणतात. "पाश्चत्यकवी बायरन म्हणतात, "मला रडू फुटू नये म्हणून मी हसत असतो "जे. सी. ग्रेगरी 'The Nature of Laughter 'या ग्रन्थात म्हटले आहे की, "ज्यामध्ये हास्य आणि अश्रू एकत्र येतात तो विनोद सर्वोच्च प्रतीचा होय "विनोदाचे महत्व सांगताना ते लिहितात, "विनोदामुळे अपयशातून सुद्धा एक हसरी उत्फुल्लता मिळविता येते. माणसाच्या कटकट्या स्वभावातूनसुद्धा एक उत्साहवर्धक जोम प्राप्त करून घेता येतो, आणि प्रामुख्याने आपली गांभीर्याची भूमिका विनोद जेव्हा सोडत नाही, तेव्हा तो आपल्या उद्दिष्ठाच्या विफलतेतूनसुद्धा सहजासहजी आनंदाची निर्मिती करतो "प्रो. स्टीफन लिकाक हॆ लिहितात, "विनोदामध्ये एक प्रकारची कारक शक्ती आहे. जीवनाचा अर्थ उलगडून दाखविण्याची, त्यावर झगझगीत प्रकाश टाकण्याची क्षमता विनोदामध्ये असल्यामुळे माणसामाणसात विनोदाविषयीची समजशक्ती कशी निर्माण करता येईल हे महत्वाचे आहे ".
असेच महत्व, उद्दिष्ट्य घेऊन वाचकांसमोर प्रा. दिलीप सोनवणे यांची 'इरसाल नमुने 'उभी राहतात.
'इरसाल नमुने 'या प्रा. दिलीप सोनवणे यांच्या विनोदी पुस्तकात २० विनोदी व्यक्तिचित्रे साकार झाली आहेत.प्रा.सोनवणे हॆ शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते.त्यांचा बराचसा काळ ग्रामीण भागात गेला. ३० मे १९५९ रोजी अहमदनगर येथे जन्म झालेले प्रा. दिलीप सुखदेव सोनवणे यांनी एम. ए. इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र पदव्या प्राप्त केल्या. डी. एड.बी. एड. महाराष्ट्र राष्ट्रभाषा पंडित पदवी मिळविली. एक उच्चशिक्षित, ज्ञानसंपन्न असलेले प्रा. सोनवणेसर १९७९ ते २०१७ पर्यंत शिक्षण खात्यात अध्यपान करीत होते. अहमदनगर, खडकवासला, बालमटाकळी, पिंपरी, पेंढार, घारगांव येथे त्यांनी प्राध्यापक म्हणून सेवा केली. संचालक व व्हाईस चेअरमन म्हणून ते श्री रंगनाथ स्वामी सेवकांची पतसंस्था आळेफाटा ता. जुन्नर जि. पुणे येथे त्यांनी कार्य केले. ग्रामीण जीवनात आणि विविध भागात भेटलेली इरसाल नमुने त्यांनी अतिशय कसदारपणे आणि आत्मजिव्हाळ्याने पुस्तकात रेखाटली आहेत. प्रस्तावनेत डॉ.शिवाजी काळे लिहितात, "समाजप्रबोधन हा प्रा. सोनवणे यांचा आवडता प्रांत असावा. व्यक्तिचित्रण करतानाच समाजसुधारक बनून वाचकांचे प्रबोधन करण्याचा मोह प्रा. सोनवणे यांना होत असल्याचे अनेकदा जाणवते. निवडणुकीच्या राजकारणात लोकशाहीचे होणारे अवमूल्यन, खोट्या प्रतिष्ठेपायी प्रपंचाची होणारी हानी,व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे होणारी विटँबना, संतांच्या विचारांचे महत्व, अंधश्रद्धेने होणारी पिळवणूक, यावर संधी मिळेल तेव्हा त्यांनी भाष्य केलेले आढळते."
प्रा. दिलीप सोनवणे यांच्या 'इरसाल नमुने'मध्ये बारकुशेठ, भिक्षुकी व्यवसाय करणारे गणूभाऊ, बाबू घिसाडी ही अधोगतीतून प्रगती साधतात. खोट्या प्रतिष्ठेचे गवराव पाटील,कळीचे नारद असणारे चिमाआप्पा, दुसऱ्याला फसविणारे हिम्या देवलासी अशी अनेक इरसाल नमुने वाचकांना हसवता हसवता अंतर्मुख करतात. प्रा. सोनवणेसर लिहितात, "'इरसाल नमुने 'या पुस्तकातील सर्वच व्यक्तिचित्रे वेगवेगळ्या स्वभाव वैशिष्ठ्यांची आहेत. यातील काही समाजाला उपकारक तर काही अपायकारक असणारी ही पात्रे रेखाटण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही सारीच व्यक्तिचित्रे ग्रामीण भागातील आहेत."असे सांगून त्यांनी कुणावरही टीका करण्याच्या हेतूने ही व्यक्तिचित्रे रेखाटलेली नाहीत, हेही सांगितले आहे. साधी, सोपी भाषा आणि मनमोकळे लेखन असल्यामुळे ही इरसाल नमुने वाचकांना नक्कीच भावणारी आहेत.शांत, सोशिक,शिस्तबद्ध, संतवृतीच्या हातून असे विनोदी लेखन झाले.या अगोदर त्यांनी स्व. सुखदेव पांडुरंग सोनवणे वडिलांचे 'सुखसिंधू 'चरित्र लिहिले, नंतर 'माझी सिंधूमाय;आईचे चरित्र लिहिले, 'अभन्ग तुकोबाचे 'लिहिले आहेत.संगमनेरसारख्या कुंभार समाजातील एका ज्ञानतपस्वी प्राध्यापकाचे हॆ लेखन गौरवास्पद आहे. त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत. संगमनेर कुंभार समाजाने त्यांचे योग्य सत्कार करून दखल घेतली आहे, यातच त्यांचे मोठेपण आहे. श्रीरामपूर येथीलआसरा प्रकाशनच्या सौ.मोहिनी शिवाजी काळे यांनी सुंदर पुस्तक प्रकाशित केले आहे.छत्रपती संभाजीनगर येथील प्रा. अमित शिंदे यांचे अनुरुप मुखपृष्ठ लाभले आहे. अक्षरजुळणी, मुद्रितशोधन डॉ.शिवाजी काळे यांचे आहे. संगमनेर येथील श्री ऑफसेटमध्ये मुद्रण झालेले हे पुस्तक १२४ पृष्ठांचे आहे.०९ आगस्ट २०२३ रोजी प्रथम आवृत्ती असलेले हे पुस्तक प्रेमळ कुटुंबास अर्पण आहे त्यात सौ.छाया दिलीप सोनवणे, डॉ.आशिष दिलीप सोनवणे, डॉ.विशाखा आशिष सोनवणे, इंजिनिअर संकेत दिलीप सोनवणे, सौ.प्राजक्ता संकेत सोनवणे, कु. प्रिषा संकेत सोनवणे या जिव्हाळाच्या कुटुंबातील या व्यक्ती आहेत. त्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक वाटते. लेखकाला पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत.
परीक्षण: प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये
इंदिरानगर, श्रीरामपूर जि. अहमदनगर
भ्रमणसंवाद :9270087640
संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

