आशिया चषकाच्या यजमान पदाचा तोडगा हायब्रीड स्वरूपात निघाल्या नंतर भारताचं पाकिस्तानमध्ये न खेळण्याचं धोरण खरं ठरलं. त्याचबरोबर साखळीत एकाच गटात असणाऱ्या दोन कट्टर प्रतिस्पर्धी भारत व पाक यांच्यातील सामना यजमान पाकला आपल्या धर्तीवर खेळून मानसिक लाभ घ्यायचं स्वप्न हवेतच विरलं. पण श्रीलंकेतील पालीकल्ले येथील झालेल्या सामन्यत पर्जन्य राजाने या दोन देशातील शक्तीमान संघ कोण हे गुलदस्यातच ठेवलं.
त्यानंतर दोन दिवसांनी त्याच मैदानावर भारताची 'मस्ट विन ' लढत नवख्या नेपाळशी झाली. पण नेपाळने आपण नवखे असलो तरी त्याची कोणतीही कमतरता प्रत्यक्ष मैदानात दिसू दिली नाही. उलट त्यांच्या सलामीवीरांनी नावाजलेल्या फलंदाजांप्रमाणे शानदार सलामी देत मोठया नावाच्या भारतीय गोलंदाजांच्या तोंडचे पाणीच पळविले. नेपाळी फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना इज्जतीत झोडून फलकावर सन्मानजनक धावा लावल्या. तेंव्हा काही जणांनी त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा ठेवली. मात्र वरूण राजा व नियतीला कदाचित ते मान्य नसावे.
पाकविरूध्दच्या सामन्याप्रमाणेच या वेळी मध्यंतरानंतर पावसाने मैदानाचा ताबा घेतला मात्र सहसंयोजक श्रीलंकेच्या मैदान कर्मचाऱ्यांनी पावसाच्या थेंबालाही मैदानावर पडू न देता सुंदर काम करून मैदान सामन्यासाठी सुखरूप ठेवले.
अखेर पावसाने विश्राम घेतल्यानंतर डकवर्थ - लुईस -स्टर्न या नियमाने भारताला लक्ष कमी करून दिले. त्यानंतर पाक विरूध्द शेळपट ठरलेले भारताचे सलामीवीर रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी सर्कसीतील शिकवलेल्या वाघाप्रमाणे अननुभवी नेपाळी गोलंदाजांवर जोरदार हल्ला करून ठरवून दिलेल्या लक्षाचा मर्यादेत राहून वेध घेतला व सुपर चार गटात प्रवेश मिळविला.
अ-गटातून पाकिस्तान व भारत यांनी तर ब- गटातून श्रीलंका व बांगलादेश यांनी सुपर फोर साठी आपले स्थान पक्के केले. या स्पर्धेत सहा संघ खेळत असले तरी स्पर्धेच्या सुरुवाती पासूनच भारत व पाकच्या सामन्याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. सुपर फोर मध्ये हे चार संघ आपसात प्रत्येकाशी लढणार असून यातील पहिल्या दोन क्रमांकाच्या संघात सतरा सप्टेंबरला अंतिम लढत होईल व आशियाई क्रिकेटचा बादशहा ठरेल आणि याच विजेते पदाचा लाभ या संघाला पुढच्या महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात खेळताना आत्मविश्वास वाढण्यास होईल.
भारताची पाक सोबतची लढत दहा सप्टेंबरला होणार असून या सामन्यासाठी दोन्ही संघ मोठया तयारीने उतरतील यात कुठलाही वाद नसेल. परंतु पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा काकणभर का होईना सदृढ मानसिकतेने मैदानात उतरेल. त्याचं कारण म्हणजे मागील काही सामन्यांपासून पाकच्या वेगवान गोलंदाजांनी खास करून शाहिन शहा आफ्रिदीने भारताच्या टॉप ऑर्डरची उडविलेली दाणादाण होय. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यातही पाकच्या गोलंदाजांनी भारताची फजिती केली. भारताचं नशिब उज्वल म्हणून की काय ऐन वेळेला सुदैवाने संधी मिळालेला ईशान किशन चांगला खेळला व त्याला पांड्याची साथ मिळाली तसेच पाक कर्णधार बाबर आझम मधल्या टप्प्यात गोलंदाजीत योग्य ते बदल करू शकला नाही. म्हणून समाधान कारक धावसंख्या फलकावर लागली. परंतु नंतर पावसात पूर्ण खेळ वाहून गेल्याने भारताची लाज राखली. त्यामुळे पुढील सुपर फोर गटात भारताने आपल्या फलंदाजांच्या कामगिरीवर योग्य ते लक्ष दिलं नाही तर अंतिम फेरीत खेळण्याचे स्वप्न स्वप्नच राहील.
पाकचं आव्हान अवघड असलं तरी गतविजेता श्रीलंका व पाक पेक्षाही भारताशी खुनशीपणे खेळणाऱ्या बांगलादेशला कमी लेखणं भारताला महागात जाऊ शकतं. त्यामुळे कागदोपत्री बलवान भासणाऱ्या भारतीय फलंदाजांना जागं होऊन खेळावं लागेल व बाहेरच्या कुणाचीही लुडबुड न आवडणाऱ्या कर्णधार रोहितला आपले नेतृत्वगुण पाजाळावे लागतील. येथे जर ते शक्य झालं नाही तर विश्वचषकात ते जराही आवाक्यातलं नसेल. स्वतःला बलवान व दुसऱ्याला कमजोर समजण्याची चुक इंडियन टिम मॅनेजमेंटला या पूर्वी अनेकदा भोवली आहे. तेंव्हा येथून पुढे तरी जिंकण्यासाठी योग्य ते प्रामाणिक प्रयत्न करणे व अंतर्गत राजकारण थांबविणे या बाबींवरच भारताचं भवितव्य अवलंबून असेल. त्यासाठी सर्व चमूचा मोठा कस लागणार हे त्रिकलाबादीतील सत्य आहे.
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

