shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये सहभाग घेऊन १०० टक्के ई-पीक पहाणी पुर्ण करावी - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
खरीप हंगाम २०२३ ची ई-पीक पाहणी करण्यासाठी दि.०८ ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत पीक पाहणी सप्ताह राबविण्यात येणार आहे. ग्रामस्तरावरील सर्व यंत्रणेच्या मदतीने शेतकऱ्यांनी ई- पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी. खरीप हंगामाची ई-पीक पाहणी १०० टक्के पुर्ण करण्यासाठी विविध घटकांनी तसेच सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीमध्ये सहभाग घेत पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

  ई-पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७/१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे. या ई-पीक पाहणी ॲपच्या माध्यमातून मागील रब्बी हंगामामध्ये जिल्हयातील शेतकऱ्यांनी १०० टक्के ई-पीक पाहणी करून आपल्या पीकाची नोंदणी करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत सुरु असलेल्या खरीप हंगामाची ई-पीक पाहणी देखील पुर्ण करावयाची आहे.
  खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.१९ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअर वर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. 
ई-पीक पहाणी शेतक-यादवारे स्वंय प्रमाणित मानण्यात येणार आहे. त्यापैकी किमान १० टक्के तपासणी तलाठी यांच्यामार्फत करण्यात येणार असून ४८ तासात खातेदारास स्वतः पीक पाहणी दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ई-पीक पाहणी अॅपद्वारे मिश्र पिकामध्ये मुख्य पिकासह तीन घटक पीके नोंदविण्याची सुविधाही देण्यात आलेली आहे. तसेच संपूर्ण गावाची पीक पाहणी पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ई-पीक पाहणी अँप मध्येच शेतक-यांकरिता मदत बटन देण्यात आलेले असून मदत कक्ष क्रमांक ०२२-२५ ७१२४१२ या दुरध्वनी क्रमांकावर देखील आपल्याला ई-पीक पाहणी बाबत काही अडचणी व शंका असल्यास संपर्क करुन आपल्या अडचणीचे निरसन करु शकतात.
सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी १ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधु-भगिनी, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, कोतवाल, स्वस्त धान्य दुकानदार, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, बचत गट प्रतिनिधी, सहकारी संस्थाचे अध्यक्ष व सचिव, अध्यक्ष- शेतकरी दुध उत्पादक संघ, पाणी फाउंडेशन गट, पोकरा प्रतिनिधी, ग्रामरोजगार सेवक, तांत्रीक सहाय्यक, बँक प्रतिनिधी, शाळा व कॉलेज विद्यार्थी, प्रगतशिल शेतकरी, सर्व ग्रामपंचायत समिती, मिडिया प्रतिनिधी, आपले सरकार सेवा केंद्र चालक यांनी देखील शासनाच्या महत्वाकांक्षी असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पात सहभाग घेवून शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्यासाठी प्रोत्साहीत करावे.
  खरीप हंगाम २०२३ मध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजना, पिक विमा, पिक कर्ज, शासकीय अनुदान ई. विविध योजनांचा लाभ घेण्यास मदत होणार असल्याने ई-पीक पहाणीमध्ये सहभाग घेऊन ती पूर्ण करावी, असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे. 


संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 
9561174111
close