सन २००३ मध्ये द. आफ्रिकेत झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेत मागील वीस वर्षात भारत न्युझिलंडला हरवू शकला नव्हता. त्या दरम्यान क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपात उपांत्य असो व अंतिम सामना या दोन संघांची गाठ पडली तर त्याचा निकाल अगोदरच गृहीत धरला जायचा व न्यूझिलंडच बाजी मारून जायचे. मात्र बावीस ऑक्टोबर रोजी देवभूमी म्हणून ओळखले जात असलेल्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथील जगातील सर्वात उंचावर असलेल्या स्टेडियममध्ये भारताच्या सातत्याने होणाऱ्या पराभवाचा तिढा सुटला व भारताने प्रभावी कामगिरी करत शानदार विजय मिळवून सध्या सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत पाच साखळी सामन्यानंतर गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून उपांत्य फेरीकडे कूच करण्यास सुरुवात केली.
बांगलादेशविरुद्ध पुण्यात झालेल्या सामन्यात प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या जायबंदी झाला होता त्यामुळे त्याच्या जागेवर निवडायच्या खेळाडूचा मोठा घोळ होता. हार्दिक एक पारंगत फलंदाज व एक निष्णात गोलंदाज म्हणून सरस कामगिरी करत होता. त्याच्या दुखापतीमुळे त्याच्या तोडीचा एकच खेळाडू उपलब्ध नसल्याने नाईलाजाने संघात दोन बदल करावे लागले. हार्दिकच्या जागेवर थेट सुर्यकुमार यादव संघात आला तर मागील अनेक दिवसांपासून एक अष्टपैलू म्हणून संघात असलेल्या शार्दूल ठाकूरला आश्चर्यकारकरित्या वगळून मोहम्मद शमी संघात आला. शार्दूलही दोन खेळाडूंचे काम एकटा करू शकतो हा निवड समितीचा आजवर असलेला विश्वास तुटल्याचे त्याच्या गच्छंतीवरून स्पष्ट होते.
परंतु मोहम्मद शमीने मागील चार सामन्यात त्याला बेंचवर बसवून वॉटरबॉयची भूमिका बजायला लावली होती याची सल हातात चेंडू मिळताच विली यंगची दांडी गुल करून मोकळी केली. मोहम्मद शमीने असा काही भन्नाट मारा केला की किवीज फलंदाज फलंदाजी करणेच विसरून गेले. मागील चार सामन्यात एकदाही सर्व बाद न झालेले न्युझिलंडचे फलंदाज शमीच्या तिखट माऱ्यापुढे हतबल दिसले. शमीने पाच फलंदाजांना बाद करताना सलग दुसऱ्या विश्वचषक स्पर्धेत एका सामन्यात पाच बळी घेण्याचा पराक्रम करताना पहिला भारतीय गोलंदाज बनण्याचा पराक्रम केला.
या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करणारा संघ विजयी होण्याची प्रथा रूढ होत असताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने पाचव्यांदा धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद सिराजने डेव्हॉन कॉनवे ला शुन्यावर बाद करून किवीजना सामन्यात पुढे काय होणार याचा जणू इशाराच दिला. त्यानंतर शमीनेही दुसरा धक्का देऊन न्युझिलंडला संकटात टाकले. मात्र त्यानंतर भारतीय वंशाच्या रचिन रविंद्र व डॅरेन मिचेलने भारतीय गोलंदाजांच्या तोंडचे पाणी पळवताना मधल्या तीस षटकात मैदानाची वतनदारीच मिळवली. या दरम्यान त्यांनी भारताच्या गोलंदाजांवर जोरदार हल्ला चढविला. यामध्ये या स्पर्धेत सर्वच सहभागी संघांच्या फलंदाजांत दहशत बसवलेल्या कुलदिप यादवला चांगलाच चोप दिला. याचा परिणाम भारतीय क्षेत्ररक्षणावरही झाला. तीन झेल भारतीय फलंदाजांनी सोडल्याने भारताची पिछेहाट झाल्याचे दिसत होते. रविंद्र जडेजा सारख्या नामवंत क्षेत्ररक्षकाकडून झेल सुटल्याने भारतीय गोटात भिती जाणवत होती. मिचेल व रचिनने एकशे एकोणासाठ धावांची भागीदारी केली. मिचेलने एकशे तीस व रचीनने पंच्याहत्तर धावा ठोकल्या. मात्र शेवटच्या दहा षटकात पुन्हा एकदा भारतीय गोलंदाज वरचढ ठरले. शमीच्या पंजाने भारताला आवाक्या बाहेरचे लक्ष मिळाले नाही.
रोहित शर्माच्या तडाखेबाज खेळामुळे भारताची सुरुवात चांगली होत आहे. मात्र तो चांगल्या सुरूवातीनंतर मोठी खेळी करण्यात कमी पडत असल्याने संघावर दबाव येतो. गिलच्या खेळात आजारपणातून उठल्यापासून नेहमीची तडफ़ दिसली नाही. श्रेयस अय्यर हा एका जबाबदार फलंदाज असला तरी बेजबाबदार फटका मारून बाद होण्याचा त्याचा कार्यक्रम सुरूच आहे. यावेळीही त्याने विनाकारण मोठा फटका मारण्याचा आततायीपणा करून संघाच्या अडचणीत भर घातली. श्रेयसला या घाण खोडीवर तातडीने तोडगा काढावा लागेल नाही तर निर्णायक सामन्यात भारताला हा सौदा महागात पडेल.
के एल राहुल यावेळी विजयी होऊन नाबाद परतू न शकल्याने व सुर्यकुमार यादव कोहलीशी ताळमेळ न जुळल्याने धावबाद झाला. या डबल धक्क्याने पराभवाची भिती चमकून गेली. मात्र कोहलीची सातत्यपूर्ण खेळी संघाच्या विजयाला आधार देत आहे. येथेही तेच झाले. मागच्या सामन्याप्रमाणे येथेही कोहलीला शतकाची संधी उपलब्ध झाली होती. परंतु षटकार मारून शतक व संघाचा विजय साधण्याच्या प्रयोगाची त्याला पुनरावृत्ती करता आली नाही. यावेळी शतकाच्या अट्टाहासापायी त्याने मिळू पाहणाऱ्या धावाही घेतल्या नाहीत व स्वतःही बाद झाला. त्याच्या हुकलेल्या शतकाचे दुःख सर्वांनाच झाले. मात्र त्याच्या या गोंधळात भारताचा विजयही हुकला असता. कारण भारताचे सर्व प्रमुख फलंदाज बाद झाले होते व एकटाच रविंद्र जडेजा मुख्य फलंदाज मैदानात होता. सुदैवाने जडेजाला नशिबाने साथ दिली म्हणून भारतावरचे विघ्न टळले. वैयक्तीक पराक्रमासाठी संघाचा विजयच धोक्यात आणण्याची कोहलीची सलग दुसऱ्या सामन्यात चुक झाली. याचा तो विचार करेलच परंतु एखाद्या चाणाक्ष विरोधी कर्णधाराने पलटवार केला तर भारताचे मोठे नुकसान होऊ शकते.
उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या भारत अगदी समिप आला असून हार्दिक पांड्याही तंदुरुस्त होऊन परतेल. शमीच्या आश्वासक कामगिरीमुळे संघाला आधार मिळाला. मात्र भारत निर्णयाक सामन्यात यापूर्वी झालेल्या चुका टाळेल का ? हा लाखमोलाचा प्रश्न प्रत्येकासमोर कायम राहिल जोपर्यंत टिम इंडिया १९ नोव्हेंबरला विश्वकरंडक उंचावत नाही तोपर्यंत.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

