तेरावी विश्वचषक स्पर्धा अर्ध्यावरच आली असतानाच उपांत्य फेरीत खेळणारे चार संघ कोणते असणार याचे संकेत मिळू लागले आहेत. अशातच काही आशावादी संघ आपले प्रयत्न करत आहेत. तर काही संघ आपल्या प्रयत्नांना कष्टाची जोड देत आपले सुपर फोर सिट पक्के करण्यासाठी प्रयत्नांची पराकष्टा करत आहेत. तर दुर्भाग्याच्या फेऱ्यात अडकणारे संघही येथे उपस्थित आहेत. शनिवारी स्पर्धेत दोन सामने खेळले गेले. त्यातील प्रत्येक जण आपल्या अस्तिव टिकविण्यासाठी झुंजत होते.
यातील पहिला सामना दिवसा खेळविला गेला तो दोन कट्टर प्रतिस्पर्धी व सख्खे शेजारी न्यूझिलंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात धर्मशाळा येथे. तर दुसरा बांगलादेश व नेदरलॅंड यांच्यात कोलकातामध्ये. न्यूझिलंडचा संघ पहिले चार सामने जिंकून भक्कम स्थितीत होता, मात्र भारताबरोबर धर्मशाळा येथेच त्यांचा अपेक्षाभंग झाल्याने त्यांची गुणतालिकेत घसरण होऊ लागली, तरी ते पहिल्या चार संघात टिकून आहेत. तर ऑस्ट्रेलियाने सुरूवातीचे दोन सामने गमावल्यानंतर गियर बदलून चौथ्या स्थानी झेप मारली. हा सामना जिंकणारा संघ आपले आसन आणखी पक्के करणार होता. मात्र या दोन संघात एक घमासान लढाई झाली त्यात ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर बाजी मारून विजय मिळविला असला तर गुणतालिकेत कोणताही बदल झाला नाही.
फलंदाजांना पोषक असलेल्या धर्मशाळा येथील मैदानावर न्युझिलंडने नाणेफेकीचा कौल मिळवून कांगारूंना प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. दुखापतीनंतर संघात परतलेल्या ट्रेव्हिसे हेडने डेव्हीड वॉर्नरसह झंझावाती सुरुवात करून वीस षटकातच पावणे दोनशे धावांची सलामी दिली. त्यामध्ये हेडने शतक ठोकून विश्वचषकात झोकात शतकी आगमन केले. त्यावेळी न्यूझिलंडचा निर्णय चुकला असेच वाटत होते. मात्र त्यानंतर मुळचा यष्टीरक्षक असलेल्या ग्लेन फिलिप्सने आपल्या ऑफस्पिनवर तीन कांगारू फलंदाज बाद करून सामन्यात रंगत भरली. तरी शेवटी कर्णधार पॅट कमिन्सने इतर फलंदाजांना सोबत घेऊन संघाला तिनशे अठ्ठयाऐंशी धावांपर्यंत पोहोचविले. तेंव्हा ऑस्ट्रेलिया एकतर्फी सामना खिशात घालेल असे वाटत होते. परंतु सहजासहजी हार मानतील ते किवीज कसले ? यंग - कॉनवे जोडीने मजबूत व दमदार पायाभरणी केली. रचिन रविंद्र या न्युझिलंडच्या तरण्याबांड खेळाडूने संघाची धुरा एकहाती आपल्या खांद्यावर घेऊन विजयाकडे कूच केली. त्याला जिमी निशमने शानदार साथ दिली. विजय नजरेच्या टप्प्यात असताना या स्पर्धेत वैयक्तिक दुसरे शतक ठोकणारा रचिन षटकार मारताना बाद झाला तरी निशमने आपले प्रयत्न सुरूच ठेवले. शेवटी दोन धावा घेण्याच्या प्रयत्नात निशम बाद झाला व शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज असताना अंतिम फलंदाज लॉकी फर्ग्युसन मोठा फटका मारण्यात कमी पडला व न्युझिलंडची कडाक्याची झुंज पाच धावांनी धारातिर्थि पडली.
या दोन संघात नेहमी अटितटीच्या लढती होतात. मात्र विश्वचषक स्पर्धेत कांगारूची बाजू अनेकदा सरस ठरली आहे. विश्वचषक स्पर्धेत न्यूझिलंडला चांगले खेळूनही नशिबाने कायम दगा दिला नाही. सन १९९२ च्या विश्वचषकात शेवटपर्यंत अव्वल राहूनही उपांत्य फेरीत पाकिस्तानने हरविले. सन २०१५ च्या अंतिम फेरीतही याच कांगारुं बरोबरच विजय कक्षेत असताना हातून निसटला. तर सन २०१९ ची इंग्लंड विरूद्धची अंतिम फेरी क्रिकेटच्या कोणत्याही अंतिम सामन्यात झाली नसेल इतकी थरारक होती. मुळ सामना व दोन सुपर ओव्हर टाय झाले आणि नियमांच्या कागदी घोडयाचा लाभ इंग्लंडला झाला. न्युझिलंडच्या मागे दुर्भाग्याचा फेरा कायम लागलेला असतो तो धर्मशाळेतही सुटला नाही. आता राहिलेल्या तीन सामन्यात त्यांना आपली पोझिशन सशक्त करण्याची संधी आहे.
कांगारु - किवीज सामन्यात ७७१ धावा निघाल्या. यात फलंदाजांनी हात धुवून घेतले मात्र गोलंदाजांचे मरण झाले. शेवटी क्षेत्ररक्षणात निर्णायक क्षणी धावा वाचविचारे कांगारू यशस्वी झाले. खेळपट्ट्या बनविताना केवळ फलंदाजांचाच विचार केला तर गोलंदाज बनण्यास नवे खेळाडू तयार होतील का ? याचा संबंधितांनी विचार करण्याची यापेक्षा योग्य वेळ दुसरी असूच शकत नाही.
शनिवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात उपांत्य फेरीच्या आशा धुसर झालेल्या बांगलादेश व नेदरलँड यांच्यात सामना झाला. कसोटी दर्जा असलेला बांगलादेश आपल्या देशा शेजारील कोलकाता शहरात खेळत असल्याने वातावरण, मुबलक स्वदेशी प्रेक्षक व अनुभवाच्या बळावर पात्रता फेरीतून आलेल्या डच संघास सहज लोळवतील असे वाटत होते. परंतु येथे वेगळेच चित्र दिसले. गुणतालिकेत अग्रणी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा डोस पाजणाऱ्या नेदरलँडने सर्वांगसुंदर खेळ करून बांगलादेशींना पूर्ण निष्प्रभ करून एक दिमाखदार विजय साकारला.
प्रथम फलंदाजी करताना हॉलंडने सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत कर्णधार स्कॉट एडवर्डसच्या दमदार खेळाच्या बळावर दोनशे एकोणतीस धावा फलकावर लावल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशची फलंदाजी पुरती कोलमडली. हॉलंडने ८७ धावांनी विजय मिळवून बांगलादेशला गुणतालिकेत आपल्यापेक्षा खाली ढकलले. आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठया संघांसोबत फारसे खेळण्याचा अनुभव नसूनही नेदरलॅंडने आपला ठसा उमटविला. कसोटी खेळणारे व बलाढ्य दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशला धुळ चारून आपल्या उज्वल भविष्याचा जणू त्यांनी इशाराच दिला.
बांगलादेश, पाकिस्तान व गतविजेता इंग्लंड यांनी लौकिकाच्या विपरीत खेळ केल्याने त्यांची प्रतिमा खराब करून घेतलीच मात्र स्पर्धेच्या रंगाचाही भंग केला. याचा फटका त्यांना गुणतालिकेत जर नऊ व दहा क्रमांकावर राहिल्यास पुढील विश्वचषकासाठी पात्रता फेरी खेळून यावे लागेल.
लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
ग्लोबल वर्कींग कमिटी मेंबर ऑफ डब्ल्यूसीपीए.
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

