shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समन्यायी पाणी वाटप कायद्याचे पाप ज्यांनी केले त्या मंत्री विखे व आ.थोरात यांनी हा कायदा रद्द करुन दाखवावा; आयुष्यभर त्यांचेकडे पाणी भरु; माजी आ.मुरकुटे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
समन्यायी पाणी वाटप कायदा करण्याचे पाप ज्यांनी केले तेच सदर कायदा रद्द करावा अशी मागणी करीत आहेत. हा कायदा ज्यांनी केला त्या मंत्री राधाकृष्ण विखे व तत्कालीन मंत्री आ. थोरात यांनी सदरचा कायदा रद्द करुन दाखवावा. असे केल्यास आपण त्यांचेकडे आयुष्यभर पाणी भरु. या कायद्यातील तरतुदीनुसार जायकवाडीसाठी भंडारदरा व निळवंडे धरणातून ३.६ टी.एम.सी. पाणी सोडले जाणार आहे. भविष्यातील धोका लक्षात घेवून आपण आमदार असताना बिनकालव्याचे निळवंडे व्हावे, अशी मागणी केली होती. ती मान्य झाली असती तर आजचे संकट उद्भवले नसते. कार्यक्षेत्रात ऊस नसताना गाळप क्षमता वाढीस तसेच एकीकडे दारु निर्मितीला परवाना दिला जात नसताना दारु निर्मिती प्रकल्पाच्या क्षमता वाढीला परवानगी दिली जाते, हे शासनाचे धोरण चुकीचे असल्याचे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.

       तालुक्यातील अशोकनगर येथे अशोक कारखान्याच्या सन २०२३-२४ गळीत हंगामाचा शुभारंभ कारखान्याचे चेअरमन माजी आ.श्री.भानुदास मुरकुटे यांचे हस्ते व भारत राष्ट्र समिती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाला. याप्रसंगी श्री.मुरकुटे बोलत होते. कार्यक्रमास गंगापूरचे माजी आ.आण्णासाहेब माने, माजी आ.भाऊसाहेब कांबळे,  साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, हेमंत ओगले, कामगार नेते अविनाश आपटे, दिलीप नागरे, संजय छल्लारे, भाऊसाहेब मुळे, तेजस बोरावके, राजन चुग, मुख्तारभाई शहा, शेखर दुबैय्या, पुरुषोत्तम झंवर, बाळासाहेब खाबीया, प्रविण गुलाटी, संजय कासलीवाल, अशोक उपाध्ये, आशिष धनवटे, सुधीर वायखिंडे, रज्जाक पठाण, अनिल कुलकर्णी, सचिन बडधे, रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, ज्ञानदेव साळुंके, दिगंबर शिंदे, सोपानराव राऊत, सिध्दार्थ मुरकुटे, सौ.मंजुश्री मुरकुटे, सौ.सुनिताताई गायकवाड, अ‍ॅड.सुभाष चौधरी, श्रीमती जानकाबाई उंडे, भाऊसाहेब हाळनोर, नानासाहेब गव्हाणे, नाना पाटील, रमेश वारुळे आदी उपस्थित होते.
          यावेळी बोलताना श्री.मुरकुटे यांनी श्री.विखे व श्री.थोरात यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले. ते म्हणाले की, २००३ साली समन्यायी पाणी वाटपाचे विधेयक विधानसभेत तत्कालीन पाटबंधारे मंत्री अजित पवार यांनी तर विधानपरिषदेत तत्कालीन राज्यमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी मांडले. सदर कायदा सन २००५ साली संमत झाला. मधले दोन वर्ष यासंदर्भात तत्कालीन आमदारांनी कोणताही विरोध केला नाही. त्यामुळे हे सर्वजण समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या पापाचे धनी आहेत. ज्यांनी पाप केले तेच आता हा कायदा रद्द करावा, अशी मागणी करीत आहेत. आपण आमदार असतो तर हा कायदा होऊ दिला नसता, असे श्री.मुरकुटे म्हणाले. 
आता भंडरदरा व निळवंडे मिळून ३.६ टी.एम.सी. पाणी सोडले जाणार आहे. यामुळे आपल्या भागासाठी भंडारदर्‍याचे केवळ ९ टी.एम.सी. पाणी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे गोदावरी व प्रवरा नदीवरील को.प. बंधारे, टाकळीभान व मुठेवाडगाव टेलटँक तसेच ओढ्या-नाल्यावरील बंधारे, पाझर तलाव यासाठी निळवंडे धरणातील २ टी.एम.सी. पाणी आरक्षित करावे आणि असे ठराव गावोगावच्या लोकांनी करावे. आपण आमदार असताना हक्काच्या पाण्यासाठी चळवळी व आंदोलन केले. प्रसंगी तुरंगवास पत्करला. श्री.आण्णासाहेब म्हस्के मंत्री असताना प्रवरा डावा कालव्यातील आडवे बांध सुरुंग लावून उध्दस्त केले. पण आता आपण आमदार नसल्याने काही करता येत नाही. मंत्री विखे व आ.थोरात यांच्या कार्यक्षेत्रात गळीत क्षमते एवढा ऊस नसताना त्यांना गाळप क्षमता वाढीची परवानगी मिळते कशी, असा सवाल उपस्थित करुन श्री.मुरकुटे म्हणाले की, सत्तेच्या जोरावर श्री.विखे व श्री.थोरात हे इतर कारखान्यांचे लचके तोडतात, असा आरोप श्री.मुरकुटे यांनी केला. 
माजी आ.आण्णासाहेब माने म्हणाले की, आमचे मराठवाड्यात गैरव्यवस्थापनामुळे साखर कारखाने बंद पडले. याचा काय काय दुष्परिणाम होतात हे आम्ही भोगले आहे. हे बघता अशोक कारखाना प्रगतीपथावर आहे याचे समाधान वाटते. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने साखरेसह शेतमालाचे भाव नियंत्रित ठेवले जातील. कारखाना चालविणेसाठी अर्थकारण समजावे लागते. श्री.मुरकुटे यांचेकडे दूरदृष्टी आहे. तसेच त्यांचे नेतृत्व विकासाभिमुख असल्याचे ते म्हणाले. माजी आ.भाऊसाहेब कांबळे यांनी श्री.मुरकुटे यांनी अशोक कारखान्याला समर्थ नेतृत्व दिले. अनेक संस्था उध्वस्त होत असताना अशोक मात्र दिमाखात उभा आहे. एम.आय.डी.सी.ला श्री.मुरकुटे यांनी विरोध केला हा काहिंचा राजकीय अपप्रचार असल्याचे ते म्हणाले. 
प्रास्ताविकात साई संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर म्हणाले की, १९८७ साली कारखाना चालणार नाही अशी चर्चा होती. अशावेळी श्री.मुरकुटे यांनी जिद्दीने कारखाना चालवून स्थिरस्थावर केला. अल्कोहोल, इथेनॉल, वीज निर्मीती असे प्रकल्प उभारुन स्थावर मालमत्ता पाचशे कोटीपर्यंत नेली. श्रीरामपूरचे नेतृत्व दुबळे व्हावे असा काहिंनी प्रयत्न केला पण श्री.मुरकुटे यांनी न जुमानता संघर्ष करुन चोख उत्तर दिले. तालुक्याचा स्वाभिमान टिकविला, असे ते म्हणाले. यावेळी श्री.हेमंत उगले, श्री.अविनाश आपटे, श्री.अशोक थोरे यांची शुभेच्छापर भाषणे झाली.
प्रारंभी संचालक प्रफुल्ल दांगट व सौ.योगिता दांगट तसेच केनयार्ड सुपरवायजर भिकचंद मुठे व सौ.मिराबाई मुठे यांचे हस्ते गव्हाण पुजन करण्यात आले. संचालक हिम्मतराव धुमाळ यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सुचनेस संचालक ज्ञानेश्वर काळे यांनी अनुमोदन दिले, संचालक बाबासाहेब आदिक यांनी आभार मानले. याप्रसंगी सभासद, शेतकरी, महिला, हितचिंतक, व्यापारी, अधिकारी, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*यावेळी मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच श्रीरामपूर जिल्हा व्हावा असे दोन ठराव करण्यात आले. यावर बोलताना श्री.मुरकुटे यांनी आरक्षण देताना केंद्र व राज्य शासनाने आर्थिक निकषावर द्यावे म्हणजे त्याचा गरजवंतांना लाभ मिळेल. श्रीरामपूर जिल्हा व्हावा यासाठी प्रसंगी आंदोलन करु. तसेच जेवढे काही प्रयत्न करायचे ते करु असे आश्‍वासन श्री.मुरकुटे यांनी दिले. इतरांच्या कारखान्याचे वजनकाटे तपासले जातात. पण मंत्री श्री.विखे व आ.थोरात यांच्या कारखान्याचे वजनकाटे कोण तपासणार, असा सवाल त्यांनी केला.*
-------------------------------------------------------------
*पत्रकार इम्रान एस.शेख
*सहयोगी:स्वाभिमानी संपादक सेवा संघ 
*संकलन:
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर -
9561174111
close