क्रिकेट : बघ्यांची गर्दी, लुटारुना संधी
क्रिकेट हा खेळ असा आहे की असंख्य प्रेक्षक या खेळाचा आनंद लुटू शकतात. खेळ पाहताना बेभान होऊन जातात. अलीकडे हा खेळ जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी दूरदर्शनच्या माध्यमातून तो सहजगत्या आपण कुठेही पाहू शकतो. पूर्वी क्रिकेटची कॉमेंट्री फक्त रेडिओवर असायची व बरेचदा इंग्रजीत असायची. खेळाडू हा देशासाठी खेळत असे. आता जमाना बदलला. क्रिकेटचे व्यापारीकरण होऊन खेळाडूंचे लिलाव होऊ लागले व या लिलावाची सोनेरी शृंखला मानाचं पान ठरावं अशा पद्धतीने जनमानसात रुजविण्यात आली.
तसं पाहिलं तर इंग्रजांनी आपल्यावर सत्ता गाजविली आणि हा खेळ भारतीय जनतेवर लादला म्हणजे क्रिकेट हे भारतीयांसाठी गुलामीचे चिन्ह आहे.
हा खेळ चालू असताना सातत्याने जाणवते ते वेदनादायी चित्र म्हणजे, ज्यांना आपण देशाचे प्रतिनिधी म्हणून क्रिकेटच्या पडद्यावर पाहतो ते अनेक प्रकारच्या जाहिराती करण्यात स्वतःला धन्य समजतात. या जाहिरातीचा एकमेव हेतू पैसा कमावणे हाच असतो.
राष्ट्रीय म्हणून मिरविल्या जाणाऱ्या उपक्रमातील जाहिरातींचा सुळसुळाट तरुणाईला कुठे घेऊन जाणार आहे याचे तारतम्य सोडून हे सर्व घडत आहे.
मानाचे राष्ट्रीय पुरस्कार ज्यांना मिळालेले आहेत अशी मंडळीदेखील जाहिरातदारांचे बटीक होऊन जाहिराती करतात तेव्हा अशा सर्वोच्च पुरस्कारांचे अवमूल्यन होते. मनाला न पटणाऱ्या या गोष्टी आहेत. बघा तुम्हाला पटतंय का? आता आपल्याला बदलायलाच हवं!
देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, पुणे
मोबाईल क्रमांक : ९८८१३७३५८५

