shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आठवणीतील दिवाळी - - अरुणकुमार धुमाळ


      ( लेखक : अरुणकुमार बा. धुमाळ सर )
              
दिवाळी आली की, गावाकडे साजऱ्या होणाऱ्या दिवाळीची मला आवर्जून आठवण होते. मराठवाड्यातील, बीड जिल्ह्यातील, कडा- आष्टी या छोट्या खानी ग्रामीण भागात माझा जन्म झाला. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने पोरका झालो. माझ्या काका- काकूंनीच माझा सांभाळ केला. आमच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची होती. आम्ही दोघे सख्खे भाऊ, दोन चुलत भाऊ, दोन चुलत बहिणी, काका- काकू आणि एक सावत्र आत्या एवढे सारेजण एका लहान पत्र्याच्या घरात राहत होतो. काका शिवण काम करायचे. कालांतराने छोटेसे कापड दुकान सुरु केले.ग्रामीण भागात उधारीने कपडा घेणारे गि-हाईक  असायचे. वर्षाकाठी दिवाळी सणानिमित्त थोडीफार उधारी वसूल व्हायची. त्यातच आमची दिवाळी कशी- बशी साजरी व्हायची. त्याकाळी वर्षातून एकदाच नवीन कपडे, फटाके, मिठाई मिळत असल्याने त्याचे अप्रूक, आकर्षण वाटायचे. आम्ही मित्रमंडळी एकत्र येऊन घरच्या घरीच आकाश कंदील तयार करायचो. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची जमवाजमव करण्यासाठी अनेक ठिकाणी अगदी स्मशानातही जावे लागायचे. बाजारात विक्रीस येणाऱ्या पणत्यांचे प्रमाण अगदीच कमी असायचे. कुंभाराकडून पणत्या आणाव्या लागायच्या. त्याला दहा-वीस पणत्या मागितल्या की तो कुठेतरी आठ-दहा पणत्या द्यायचा. विनवणी करुन पणत्या आणायचो. त्यावर प्रक्रिया करुन त्यातून रोषणाई  करायचो. आर्थिक परिस्थितीमुळे फटाके घेऊ शकत नव्हतो. गावातील धनिकांना विनंती करुन फटाके आणावे लागायचे. मारवाडी गल्लीत राहत असल्यामुळे फराळाचे खायला मिळेल या आशेने मुद्दामहून न बोलवता, मी फराळ करायला काकांच्या बरोबर मारवाडी लोकांच्या घरी जायचो. आई- वडील नसणाऱ्या पोराला कोणीही अडवीत नसत.उलट भरपूर खाऊ घालायचे.
आमच्या गल्लीत मेहेर, काठेड इत्यादी मारवाडी समाजाची घरे होती. त्यांच्या मुलांशी दोस्ती करुन त्यांच्याकडील ज्यादा कपडे घरी आणून ते धुऊन काढायचो. तांब्यात विस्तव घालून त्याची इस्त्री करुन, तेच नवीन कपडे आहेत, असे समजून ते कपडे घालून आनंदाने दिवाळी साजरी करायचो. लहानपणापासून मला बेसन लाडू फार आवडतात. ती आवड अजूनही आहे. आमच्या घरात त्या लाडूचे प्रमाण फार कमी असायचे. घरातील मोठ्या माणसांची नजर चुकवून मी डब्यातून दोन चार लाडू चोरुन खिशात घालायचो व कमानीच्या कोपऱ्यात जाऊन ते खायचो. एवढे सर्व असूनही त्यातून आनंद,सुख,  समाधान मिळायचे.

१९६८ साली मी सोलापूरला आलो. महत्प्रयत्नाने जैन गुरुकुल मध्ये नोकरीस लागलो. चांगले वेतन मिळू लागल्यावर मला माझ्या बालपणच्या परिस्थितीची आठवण व्हायची. आता मी सेवानिवृत्त आहे. गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना यथाशक्ती मी मदत करीत असतो. त्यांना, फराळाचे साहित्य,पणत्या कपडे, उठणे, सुवासिक तेल,इ. वस्तू देण्याकडे माझा कल असतो. त्यामागे एकच हेतू हा की, मला लहानपणी जे सोसावे लागले ते समाजातील या गरिबांना सोसावे लागू नये.
 आज माझी स्थिती खूप चांगली आहे. संस्थेने मला नोकरी देऊन स्वावलंबी बनवले. त्यामुळे लहानपणी सोसलेल्या हाल-अपेष्टांचे आज मला काहीच वाटत नाही. मी व माझा परिवार खूप सुखी, समाधानी, आनंदी आहे. मोठा मुलगा मुंबई आकाशवाणीत नोकरी करतो. तो नव-नवीन मालिकांमधून, नाटकांमधून कामेही करतो. एक उत्तम अभिनेता, निवेदक, म्हणून त्याचा नाव लौकिक आहे धाकटा मुलगा संस्थेच्या हिराचंद नेमचंद वाणिज्य महाविद्यालयात, एम.बी.ए., विभागात कार्यरत आहे. दोन मुली दिल्या घरी सुखी आहेत. दरवर्षी आम्ही सर्वजण मिळून आनंदात दिवाळी साजरी करतो; पण गावाकडची दिवाळी आठवली की, आजही माझे डोळे पाणावतात.
         - - अरुणकुमार बा.धुमाळ, सोलापूर
   (९८ ९० ९० २९ २३ )
close