पुस्तक परीक्षण: डॉ.बाबुराव उपाध्ये
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील प्राथमिक शाळेतील सेवानिवृत्त शिक्षिका सौ. शशिकला शिवाजी कुंभार ह्यांनी 'जगायचं असतं 'हे प्रांजळ अनुभवाचं आत्मकथन मे २०१८ मध्ये प्रकाशित केले. १२ एप्रिल १९५६ रोजी जन्म झालेल्या शशिकलाताई कुंभार यांनी अतिशय प्रतिकूलस्थितीत शिक्षण घेतले.
आई जानकीबाई कुंभार आणि वडील मारुतराव कुंभार ह्यांच्या संस्कार व शिस्तीत त्यांचे बालपण गेले.वडील पोलीस खात्यात होते.त्यांची नोकरी धावपळीची, खूप शिस्तीची होती.शशिकलाताई कुंभार लिहितात,
"पुण्यभूमी दौन्ड येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील पोलीस खात्यात सेवेत होते. त्यामुळे त्यांच्या सारख्या बदल्या होत.त्यांनी प्रामाणिकपणे आपली नोकरी केली. माझी आई जानकीबाई भक्तिरसात अखंड भिजलेली असायची."
०१) शशिकलाताई कुंभार यांचे प्राथमिक शिक्षण दौन्डला झाले. पुणे शहरातील पाषाण भागातील गोरा कुंभार हायस्कुलला माध्यमिक शिक्षण झाले. फलटण येथे त्यांनी डी. एड.ची पदवी घेतली. महाबळेश्वर येथे प्रथम अध्यापन केले.
०२) शिक्षण,समाजक्षेत्रात त्यांना अनेक चांगले, वाईट अनुभव आले.संसार, नोकरी आणि समाजसेवेचे कार्य करताना त्यांना खूप कसरत करावी लागली. त्यातूनच या पुस्तकांची निर्मिती झाली, असल्याचे नमूद केले आहे,
०३) शशिकलाताई कुंभार ह्या लोकशिक्षका आहेत. महाबळेश्वर, अवकाळी येथे १९७६ मध्ये त्यांनी कस्तुरबा गांधी ट्र्स्ट सासवड मार्फत बालग्राम केंद्र येथे पदमभूषण डॉ. शोभनाताई रानडे यांच्यामुळे सेवेची व ज्ञानदानाची त्यांना संधी मिळाली. १९८० साली फलटण येथे भारत सेवक समाज-सर्व्हन्ट ऑफ इंडिया सोसायटी मार्फत समाजजागृती प्रकल्प, जागृत युवा नावाने प्रौढ शिक्षण, अनौपचारिक प्रकल्प संयोजन, पर्यवेक्षक म्हणून त्यांनी कार्य केले.१९८५ ते २०११ या काळात त्यांनी जि.प. शाळेत राजाळे, फलटण, तालुका कराड, बेलवडे बुद्रुक, तळबीड, कासार शिरंबे आदी ठिकाणी ज्ञानदान केले.
२०११ ते २०२३ या काळातील त्यांची समाजसेवा अधिक गतिशील झाली.गरीब, गरजू विद्यार्थी आणि अनेक महिलांसाठी त्यांचे कार्य सुरु आहे.डॉ. अनिल अवचट, डॉ. नरेंद्र दाभोलकर इत्यादींनी त्यांच्या कार्य आणि उपक्रमाला भेटी देऊन कौतुक केले. महानुभाव आश्रमातील मुलींना त्यांच्या इच्छेखातर त्यांचे योग्य स्थळी विवाह करून दिले, त्याबद्दल डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. लक्ष्मण माने, समाजसेविका डॉ. शोभनाताई रानडे, अशोक देशमाने, डॉ. बाबा आढाव, मॅक्सीनबाई बर्नसन असे अनेकांचे त्यांना समाजसेवेत मार्गदर्शन, सहकार्य लाभले.भोसरी येथील स्नेहवन आश्रम, जामखेड येथील निवारा आश्रम, नारायणपूर येथील आनंदग्राम,सावरगा येथील ज्ञानाई बालसंगोपन अनाथ आश्रम, कराड येथील आशाकिरण महिला वसतिगृह, पंढरपूर येथील प्रार्थना समाज संचलित वा. बा. नवरंग बालकाश्रम आदी ठिकाणी त्यांनी केलेले कार्य, योगदान प्रेरणादायी आहे.
शशिकलाताई कुंभार ह्यांनी 'जगायचं असतं 'ह्या आत्मकथनातून आपले कुटुंब, समाज, सेवाभावी माणसं आणि विविध अनुभवांची प्रामाणिकपणे मांडणी केली आहे.त्यांचे हे लेखन म्हणजे सहजस्फुर्त निर्मिती आहे. अशोक देशमाने 'प्रस्तावना'मध्ये लिहितात,
"शशिकलाताई म्हणजेच आई यांचे 'जगायचं असतं 'हे आत्मचरित्र वाचताना जी प्रेरणा मला मिळाळी ती श्रीज्ञानेश्वरी वाचण्याइतकीच पवित्र आहे. आईंनी आणि बाबांनी स्वतः खूप हालाखीतून दिवस काढले, संघर्ष हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता. परंतु त्यातही त्यांनी सामाजिक बांधीलकीचा कधी विसर पडू दिला नाही हे विशेष.त्यांच्या संस्काराच्या ठेवीमुळे आज त्यांची पुढची पिढीदेखील समाजासाठी कार्य करीत आहे
०४)
शशिकलाताई कुंभार यांचे माहेरचे नाव पाटसकर होय. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील जगन्नाथ पाटसकर हे त्यांचे मामा होते. म. गांधी चळवळीत ते होते.त्यांनी तुरुंगवास सोसला. १९६७ ते १९७२ या काळात ते दौन्डचे आमदार होते.समाजवादी विचारांचे ते देशभक्त म्हणून त्यांची कीर्ती आहे.त्यांनी प्रामाणिकपणे अनेक सेवाकार्य केले पण आजही त्यांना राहण्यास साधे घरही नाही, ही खंत लेखिकेने व्यक्त केलीआहे. शशिकलाताई कुंभार यांचे कुटुंब सतशील, धार्मिक,वारकरी विचारांचे आहे,२००२ मध्ये वडील वारल्यावर त्यांची आई एकाकी झाली, आजारी पडली तेव्हा आई म्हणाली, " शशी, तू मांसाहार करत नाहीस, मग माळ घाल आणि आषाढी, कार्तिकी वारी सुरु कर. मी आयुष्यभर वारी केली. तुझ्याशिवाय ही वारी कोणी मनापासून करणार नाही.
"आईचे म्हणणे मान्य करीत शशिकलाताई आजही पंढरीची वारी करीत आहेत. पती शिवाजी कुंभार हे शिक्षकच होते. मुलगा रामकृष्ण, मुलगी वृषाली, बहिणी उषा लक्ष्मण कुंभार, मंगल दत्तात्रय कुंभार व बेबी दत्तात्रय कुंभार ह्यांच्या आठवणी, प्रसंग येथे वाचण्यास मिळतात.ह्या पुस्तकात म. फुले, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे असे लेख परिशिष्टमध्ये समाविष्ट केले आहेत. १२८ पृष्ठांचे हे आत्मकथन वाचनीय, प्रेरणादायी आणि कुंभार समाजातील स्त्रीजीवनावर प्रकाश पाडणारे आहे. पुस्तकात अनेक छायाचित्रे आणि प्रसंगचित्रे असल्यामुळे त्यांचे अनुभव अधिक बोलके झालेले आहेत. प्रकाशक सौ. उषा अनिल शिंदे पुणे ह्यांनी पुस्तकरचना छानच केली. नावडकर बंधू, पुणे ह्यांनी बोलके मुखपृष्ठ काढले आहे. लेखिकेने 'बदलती मने'व इतर लेखन केले आहे, त्यांच्या प्रांजळ लेखनातून नवोदित महिला वर्गास आपले अनुभव लिहिण्याचौ प्रेरणा मिळेल, कुंभार समाजातील महिलांचे लेखन फारसे प्रकाशित आलेले नाही शशिकलाताई कुंभार यांचे आत्मचरित्र वाचून इतर महिला, युवतींनी लेखन करावे अशीच सदिच्छा आहे.
*संदर्भटीपा
०१) शशिकला शिवाजी शिंदे, 'जगायचं असतं ',
प्रकाशक, सौ. उषा अनिल शिंदे, उषा अनिल प्रकाशन, पुणे,
मे २०१८, पृष्ठ ०४
०२ ) तत्रैव,०५
03) अशोक देशमाने,
तत्रैव ०६,
०७ ) *परीक्षण :*
=डॉ.बाबुराव उपाध्ये, इंदिरानगर, श्रीरामपूर जि. अहमदनगर
भ्रमणसंवाद :9270087640
श*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111

