shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगरमध्ये २६ ते ३० जानेवारी दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन


अहमदनगर प्रतिनिधी:
आज भारताच्या लोकशाहीपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. राजकीय व  व्यावहारिक पातळीवर अनेक अंगाने भारतीय लोकशाहीला कमजोर करण्याचे काम सुरु आहे. देशपातळीवर राजकीय आणि धार्मिक अंगाने भांडवलदारी धर्मांध व्यवस्थेचे उदात्तीकरण सुरु आहे. अशावेळी धर्मांध हुकुमशाही व्यवस्थेला नाकारणारी व सर्वहारा वर्गाला समता, बंधुता आणि सामाजिक न्याय देण्यास कटिबद्ध असलेली लोकशाही टिकली पाहिजे व ती तळागाळात झिरपली पाहिजे हा हेतू समोर ठेऊन अहमदनगरमध्ये ता. २६ ते ३० जानेवारी २०२४ या दरम्यान लोकशाही उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लोकशाही उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत शिंदे यांनी दिली. 

हा लोकशाही उत्सव दरवर्षी  प्रजासत्ताक दिन ते महात्मा गांधी हौतात्म्यदिन या दरम्यान आयोजित करण्यात येतो, अशी माहिती समितीचे सचिव प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी दिली. ता. २६ जानेवारी २०२४ रोजी शांतिनिकेतन कॉलेज ऑफ फार्मसी, धोत्रे, ता. पारनेर येथे महान क्रांतिकारक शहीद अशफाकुल्ला खान आणि पंडित रामप्रसाद बिस्मिल यांच्या आठवणींवर आधारित सुधीर विद्यार्थी लिखित व मनीष मुनी दिग्दर्शित अशफाकराम हे एकपात्री नाटक  दाखविण्यात येणार आहे. ता. २७ जानेवारी रोजी रहेमत सुलतान हॉल, सर्जेपुरा, अहमदनगर येथे आबेदखान दुलेखान यांच्या सहकार्याने समतेच्या गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ता. २८ जानेवारी रोजी अहमदनगर शहरात विविध ठिकाणी शिवाजी नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली 'जागर लोकशाहीचा' या पथनाट्याचे सादरीकरण केले जाणार आहे. ता.२९ जानेवारी रोजी अहमदनगर आणि राहुरी येथे निरनिराळ्या ठिकाणी डॉ. प्रशांत शिंदे, आर्किटेक्ट अर्षद शेख, भैरवनाथ वाकळे, अशोक सब्बन हे लोकशाहीवर व्याख्याने देणार आहेत. ३० जानेवारी रोजी सायंकाळी चार वाजता सी.एस.आर.डी. अहमदनगरच्या ऑडोटोरियममध्ये डॉ. सुरेश पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ख्यातनाम छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्या 'तमाशा आणि वारी' या विषयावरील स्लाईड शो व संवादाच्या कार्यक्रमाने लोकशाही उत्सवाची सांगता होईल, अशी माहिती समितीच्या निमंत्रक सोनाली देवढे-शिंदे, संध्या मेढे, समृद्धी वाकळे यांनी दिली आहे.

पत्रकार अबीदखान - अहमदनगर
close