shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सनायझर्यचा सुर्य आयपीएल पटलावर चांगलाच तळपतोय


             सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक खेळीनंतर शहबाज अहमदच्या अर्धशतकाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने २० षटकांत सात गडी गमावून २६६ धावा केल्या.  प्रत्युत्तरात जॅक फ्रेझर मॅकगर्कच्या झंझावाती खेळीनंतरही दिल्लीचा संघ १९.१ षटकांत १९९ धावांत सर्वबाद होऊन ६७ धावांनी पराभूत झाला.  हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेडने ३२ चेंडूंत ११ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ८९ धावा केल्या, तर शाहबाजने २९ चेंडूंत दोन चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने ५९ धावा करून नाबाद परतला.  लक्ष्याचा पाठलाग करताना मॅकगर्कने १८ चेंडूंत पाच चौकार आणि सात षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. टि.नटराजनने हैदराबादसाठी शानदार गोलंदाजी करत १९ धावांत चार बळी घेतले.


            या विजयासह सनरायझर्स हैदराबादने केकेआरला मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान मिळविले तर दिल्ली एका स्थानाने घसरून सातव्या स्थानावर पोहोचली आहे. हैदराबादचे सात सामन्यांतून पाच विजय आणि दोन पराभवांसह दहा गुण आहेत. सध्या हैदराबादच्या पुढे फक्त राजस्थान रॉयल्स आहे. त्यांचे सात सामन्यात बारा गुण झाले आहेत.
            विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. केवळ २५ धावांवर दोन्ही सलामीवीर पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर बाद झाले.  प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या पृथ्वी शॉने संघाला चांगली सुरुवात देण्याचा प्रयत्न केला आणि चार चौकारही मारले, पण वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या झटपट खेळीचा तातडीने अंत केला. पृथ्वीची खेळी केवळ पाच चेंडूत १६ धावांची होती. त्यानंतर दुखापतीतून सावरून संघात परतलेला डेव्हीड वॉर्नर  (१) भुवनेश्वरचा बळी ठरला.

            स्वतःचा तिसराच आयपीएल सामना खेळणाऱ्या मॅकगर्कने झंझावाती खेळी करत दिल्लीची धुरा सांभाळली. शानदार फलंदाजी करत मात्र १५ चेंडूत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. मॅकगर्कने चालू आयपीएल  मधील सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा पराक्रम करताना ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांना मागे सोडले, या दोघांनीही याच हंगामात प्रत्येकी सोळा चेंडूत अर्धशतकं ठोकण्याचा कारनामा केला होता.

            मॅकगर्कला अभिषेक पोरेलचीही चांगली साथ लाभली. त्याने २२ चेंडूंत सात चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने ४२ धावा ठोकल्या. या दोघांनी  तिसऱ्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली.  पॉवरप्लेमध्ये तर त्यांनी स्फोटक फलंदाजी केली.  मॅकगर्कच्या तुफानी खेळीच्या जोरावर दिल्लीने अवघ्या ४० चेंडूंत शंभरी पार केली होती.  आयपीएलच्या इतिहासात कोणत्याही संघाने पॉवर प्लेमध्ये केलेली चौथी शतकी मजल होती. हे दोन्ही फलंदाज जेव्हा मैदानात उपस्थित होते तेव्हा दिल्लीचा संघ सहज लक्ष्य गाठेल असे वाटत होते, पण पॉवर प्ले संपल्यानंतर मयंक मार्कंडेने सातव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर क्लासेनच्या हातून मॅकगर्कचा डाव संपवला. त्याबरोबरच त्याची पोरेलसोबतची भागीदारी तुटली. त्यानंतर पोरेल लवकर बाद झाला. 

             टि.नटराजनने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. पॅट कमिन्सने नटराजनला १९ वे षटक टाकायला पाठवले आणि त्याने पहिल्याच चेंडूवर अक्षर पटेलला पॅव्हेलियनमध्ये धाडले. अक्षर आठ चेंडूत सहा धावा करून बाद झाला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर नटराजनने एनरिच नॉर्कियाला बोल्ड केले. पुढच्याच चेंडूवर कुलदीप यादवलाही नटराजनने पायचितच्या जाळ्यात पकडले. सामन्यात चार बळी घेणारा नटराजन हॅट्रीकच्या उंबरठ्यावर होता. मात्र ती त्याला साधता आली नाही.

             मॅकगर्क बाद झाल्यानंतर पंतने दिल्लीचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्य इतके मोठे होते आणि संघ सतत विकेट्स गमावत होता की पंत पूर्णपणे आपले हात उघडू शकला नाही.  पंतने ३५ चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४४ धावांची खेळी केली आणि शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो शेवटचा फलंदाज म्हणून बाद झाला. वास्तविक पंतने मॅकगर्क - पोरेलच्या मेहनतीवर पाणीच फेरले. ३५ चेंडूत त्याच्याकडून ७०-८० धावांची गरज होती. पण त्याच्यात नेहमीचा उत्साह दिसला नाही. त्यामुळे आवाक्यात दिसू पाहणारा विजय दिल्लीसाठी अखेर दूरच राहिला.

           तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना हेड आणि अभिषेक यांनी पॉवर प्लेमध्ये सव्वाशे धावांचा तुफानी नजराना हैद्राबादसाठी पेश करून आयपीएलच्या इतिहासातला महापराक्रम नोंदविला. हेड आणि अभिषेकने प्रत्येक गोलंदाजावर निशाणा साधला.  हेडने १६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले की, जे या मोसमातील संयुक्त सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. मात्र याच सामन्यात मॅकगर्कने तो विक्रम स्वतःच्या नावे केला. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबादसाठी पॉवरप्लेमध्ये हेड सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. हेडने पहिल्या सहा षटकातील २६ चेंडूत ८४ धावा केल्या. यापूर्वी हैद्राबादसाठी पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावावर होता. सन २०१९ मध्ये त्याने केकेआर विरुद्ध २५ चेंडूत ६२ धावा केल्या होत्या.

           पॉवरप्लेमध्ये हेड आणि अभिषेकची फलंदाजी पाहून असे वाटत होते की, हैदराबादचा संघ पुन्हा एकदा आपला विक्रम मोडेल आणि आयपीएलमधील सर्वोच्च धावसंख्या करेल. पण पॉवर प्ले संपताच कुलदिप यादवने अभिषेक शर्माला बाद करून ही भागीदारी तोडली. अभिषेक १२ चेंडूत ४६ धावा करून बाद झाला, तो बाद होताच हैदराबादचा डाव फसला आणि काही वेळातच संघाने चार विकेटस गमावल्या. त्यानंतर आलेल्या एडन मार्करामला कुलदिपने एका धावेवर बाद केले. हेड व हेनरिक क्लासेनने हळहळू डावाचे सुत्र हाती घेतले. हेड शतकाकडे वाटचाल करत होता आणि तो आयपीएलमधील सर्वात वेगवान शतक झळकावणार असे वाटत होते, मात्र कुलदिपच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हेड बाद झाला. त्याने मात्र ३२ चेंडूंत ११ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ८९ धावा कुटल्या. त्यानंतर क्लासेनला (८ चेंडू १५ धावा) बाद करून कुलदिपने स्वतःचा चौथा बळी मिळविला .

            कुलदिपच्या घातक गोलंदाजीमुळे दिल्लीच्या गोलंदाजांनी हैद्राबादच्या धावगतीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला, मात्र शाहबाज अहमदने अखेरच्या टप्प्यात स्फोटक खेळी केली आणि त्यांची धावसंख्या २६६ वर पोहोचली नेली. हैदराबाद आयपीएलच्या एकाच सत्रात तीन वेळा २५० हून अधिक धावा करणारा एकमेव संघ ठरला आहे. या आधी याच मोसमात हैद्राबादने मुंबई इंडियन्सविरुद्ध तीन गड्यांच्या मोबदल्यात २७७ धावा आणि आरसीबीविरुद्ध तीन विकेट्सवर २८७ धावा केल्या होत्या.  शाहबाज अहमदने अंतिम षटकांमध्ये झटपट धावा केल्या आणि आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले.

            स्पर्धेच्या सुरुवातीला हैद्राबादला कोणी फारसे विचारात घेतले नव्हते. परंतु एका चढ एक स्फोटक फलंदाजांच्या ताफ्यामुळे त्यांची फलंदाजी खतरनाक बनली आहे. शिवाय गोलंदाजही फलंदाजाच्या कष्टाचे चीज करत असल्याने अचानक ते टॉप फोरमध्ये पोहोचले आहे. आता त्यांचा कर्णधार पॅट कमिन्स डब्ल्यूटीसी, वनडे विश्वचषका पाठोपाठ आयपीएल ट्रॉफी उंचावून जगातला अजमितीचा सर्वोत्तम कर्णधार असल्याचे जगाला दाखवून देईल, असे चित्र सध्या तरी भासू लागले आहे.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो. नंबर -९०९६३७२०८२
close