shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरसीबीने भंगविले चेन्नईचे प्ले ऑफचे स्वप्न


               आयपीएल २०२४ च्या  ६८ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने २७ धावांनी विजय मिळवत प्ले ऑफसाठी पात्रता मिळवली आहे.  यासह फाफ ड्यू फ्लेसिसचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा या मोसमातील चौथा संघ ठरला आहे.  आयपीएलच्या इतिहासात आरसीबी नवव्यांदा प्ले ऑफसाठी पात्र ठरले आहे.  यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद पात्र ठरले होते.  त्याचवेळी या पराभवाने सीएसकेचा प्रवास संपुष्टात आला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने वीस षटकांत पाच गडी गमावून २१८ धावा केल्या.  प्रत्युत्तरात चेन्नईला २० षटकांत ७ गडी गमावून १९१ धावाच करता आल्या.
                चौदा सामन्यांत सात विजय मिळवून आरसीबी गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांच्या खात्यात आता चौदा गुण असून निव्वळ धावगती + ०.४५९ इतकी असून सारखेच गुण असलेल्या सीएसकेपेक्षा सरस आहे.  कोलकाता १९ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.  दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे राजस्थान आणि हैदराबादचे संघ आहेत, ज्यांच्या खात्यात प्रत्येकी सोळा आणि पंधरा गुण आहेत.  रविवारी राजस्थान आणि हैदराबादचे संघ साखळी टप्प्यातील शेवटचे सामने खेळतील.  आता या दोघांमध्ये साखळीतील अव्वल स्थानासाठी लढत होणार आहे.

             सीएसकेला  १९ षटकांनंतर प्ले ऑफसाठी पात्र होण्यासाठी सतरा धावांची गरज होती तर सामना जिंकण्यासाठी ३५ धावांची.  कर्णधार फाफ  ड्यू फ्लेसिसने यश दयालवर विश्वास व्यक्त करत डावाच्या शेवटच्या षटकात चेंडू त्याच्याकडे सोपवला. पहिल्या चेंडूवर धोनीने फाइन लेगला जोरदार फटका मारून ११०  मीटरचा षटकार ठोकला.  पाच चेंडूत अकरा धावांची गरज असताना पुढच्याच चेंडूवर धोनी स्वप्नील सिंगच्या हाती झेल देऊन बाद झाला. त्याच्या नंतर शार्दुल ठाकूर फलंदाजीला आला पण तिसऱ्या चेंडूवर त्याला एकही धाव काढता आली नाही. शेवटी तीन चेंडूत अकरा धावांची गरज होती.  चौथ्या चेंडूवर शार्दुलने थर्ड मॅनच्या दिशेने शॉट खेळला आणि एक धाव घेतली.  प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी चेन्नईला  दोन चेंडूत दहा धावांची गरज होती.  जडेजा स्ट्राईकला होता,  दयालने  शेवटच्या षटकाचे दोन्ही चेंडू निर्धाव टाकले आणि मागच्या सत्रात अंतिम फेरीत अशीच परिस्थिनी असताना जडेजाने बाजी मारली होती. मात्र यावेळी जडेजाला एकही धाव करता आली नाही आणि बरोबरच चेन्नईचे या पर्वातील आव्हान संपुष्टात आले. यासह आरसीबीने हंगामातील सलग सहावा सामना जिंकला आणि स्पर्धेच्या सुरुवातीला झालेल्या खराब सुरुवातीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली व चक्क स्वप्नवत प्ले ऑफ फेरी गाठली.

              विजयासाठीच्या २१९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात धक्कादायक झाली. डावाच्या मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूवर कर्णधार ऋतुराज गायकवाडला शुन्यावरच बाद केले.  त्यानंतर तिसऱ्या षटकात यश दयालने डॅररेल मिचेलला केवळ चार धावांवर माघारी धाडलं.  यानंतर रचिन रविंद्र आणि अजिंक्य राहाणे यांनी चेन्नईच्या डावाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली. त्या दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ६६ धावांची भागीदारी झाली असता लॉकी फर्ग्युसनने   संघाच्या ८५  धावांवर भारतीय फलंदाज राहाणेला बाद केले.  राहाणेने २२  चेंडूत ३३ धावा काढल्या.  न्युझिलंडचा स्टार क्रिकेटर रचिन रविंद्रने  अर्धशतक झळकविले. त्याची ६१ धावांची धमाकेदार खेळी ३७ चेंडूत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने सजली होती. शिवम दुबेला सात धावांवर  कॅमेरून ग्रीनने आपला बळी बनवले.  याशिवाय मिचेल सँटनर तीन धावा करून बाद झाला.  १२९ धावांवर चेन्नईने सहावी विकेट गमावली तेंव्हा महेंद्रसिंग धोनी आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला.  सोळाव्या षटकात फलंदाजीला आलेल्या धोनीने रविंद्र जडेजा सोबत ६१ धावांची भागीदारी केली.  दोघांनी केवळ २७ चेंडूंचा सामना केला.  मात्र १९ व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर यश दयालने चेन्नईला सर्वात मोठा धक्का दिला.  त्याने धोनीला स्वप्नील सिंगकरवी झेलबाद केले.  माजी कर्णधाराने आरसीबीविरुद्ध १३ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २५ धावा काढल्या.  तर जडेजा ४२ धावा करून नाबाद राहिला आणि शार्दुल ठाकूर एक धाव घेऊन नाबाद राहिला.  आरसीबीकडून यश दयालने दोन तर मॅक्सवेल, सिराज, फर्ग्युसन आणि ग्रीन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

           तत्पूर्वी नाणेफेक विरोधात गेल्यानंतर  प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या आरसीबीने संधीचा अचूक लाभ उठवत चांगली सुरुवात केली.  पावसाने प्रभावित झालेल्या या सामन्यात पॉवर प्लेच्या पहिल्या तीन षटकांमध्ये विराट कोहली आणि फाफ ड्युफ्लेसिस यांच्यात ३१ धावांची भागीदारी झाली.  यानंतर शेवटच्या तीन षटकात केवळ अकरा धावा निघाल्या.  मात्र, पॉवर प्लेनंतर कोहली आणि ड्यु फ्लेसिस यांनी तुफान खेळी करत पहिल्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. दहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सँटनरने किंग कोहलीला झेलबाद केले.  तो २९ चेंडूत ४७ धावा करून परतला.  यादरम्यान त्याच्या बॅटमधून तीन चौकार आणि चार षटकार आले.  संघाला दुसरा धक्का कर्णधार फाफ ड्युफ्लेसिसच्या रूपाने बसला. त्याने ३५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.  शेवटी ३९ चेंडूत ५४ धावा करून तो धावबाद झाला.  त्यानंतर रजत पाटीदार आणि कॅमेरून ग्रीन यांनी मोर्चा सांभाळत ७१ धावांची भागीदारी केली. ती शार्दुल ठाकूरने अठराव्या षटकात फोडली.  त्याने रजत पाटीदारला  डॅरिल मिचेलकरवी झेलबाद केले.  पाटीदारने या सामन्यात २३ चेंडूंचा सामना केला आणि दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या.  यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला दिनेश कार्तिक १४ धावा करून  तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर धोनीच्या हाती झेल देऊन बाद झाला.  ग्लेन मॅक्सवेलने केवळ पाच चेंडूंचा सामना करत सोळा धावा ठोकल्या.  या दरम्यान त्याने दोन चौकार आणि एक षटकार फटकावला. कॅमेरॉन ग्रीन ३८ आणि महिपाल लोमरर खाते न उघडता नाबाद परतले.  चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने दोन तर तुषार देशपांडे आणि मिचेल सँटनरने प्रत्येकी एक बळी घेतला.

               बहुप्रतिक्षित आरसीबी - चेन्नई यांच्यातील लढत प्रेक्षकांना रंगतदार खेळाचा आनंद देऊन गेली. घरच्या मैदानावर आरसीबीने आपला गड राखत प्ले ऑफमध्ये स्थानही मिळवले. ते चौथ्या क्रमांकावर राहून एलिमिनेटर खेळतील. मात्र राजस्थान व हैद्राबाद यांच्यापैकी दुसऱ्या स्थानी कोण असेल हे रविवारी समजेल. यापूर्वीच केकेआर अव्वल स्थानी राहाणार हे निश्चित झाले आहे.


लेखक -.
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
मो.नं. -९०९६३७२०८२
close