"संत तेची देव ...देव तेची संत"
हा संतविचार सदगुणांच्या अनुषंगाने मौलिक आहे.१३ वे शतक हे महाराष्ट्रातील संतत्व आणि समत्व विचारांची प्रेरणाजाणीव आहे. महाराष्ट्र ही संतांची, वीरांची भूमी आहे. महानुभाव आणि वारकरी विचारांची ती पवित्र गंगोत्री आहे. अहिंसा हाच खरा धर्म मानणारी ही विचारधारा आहे. जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी परमेश्वराचे अस्तित्व आहे. याच विचारांचे संतमेळ्यातील वयोवृद्ध, सर्वांचे काका असलेले श्रीसंत गोरा कुंभार यांचा जन्म तेर गावी इ.स.१२६७ साली झाला तर त्यांनी वयाच्या ५० व्या वर्षी म्हणजे इ.स.१३१७ मध्ये समाधी घेतली.५० वर्षाचे जीवन लाभलेले श्रीसंत गोरा कुंभार यांचे जीवनचरित्र वाचनीय आहे. कुंभार काम करीत त्यांनी विठ्ठलभक्तीच्या माध्यमातून केलेले समाजप्रबोधन दिशादर्शक आहे. त्यांचे जीवनचिंतन आणि भक्तीमाहात्म्य प्रेरणादायी आहे.
" अंतरीचे गुज बोलू ऐसे काही ।
वर्ण व्यक्त नाही शब्द शून्य ॥
जय जय झनकूट,जय जय झनकूट ।
अनुहात जंगट नाद गर्जे ॥
परतल्या श्रृति म्हणती नेती नेती ।
त्याही नादा अंती स्थिर राहे ॥
म्हणे गोरा कुंभार सत्रावीचे नीर ।
सेवा निरंतर नामदेवा ॥"
भक्ती ही शुद्ध अंतरंगात निर्माण होते. मनात अनेक गोष्टी असतात. त्या सर्वच व्यक्त करता येत नाहीत. भक्ती म्हणजे झपाटून एकरूप होणे, ते खरे अद्वैत होय. झपूर्झा सारखी स्थिती होणे, सर्व विसरून परमेश्वर रुप होणे म्हणजे खरी भक्ती होय.
"काया वाचा मन एकविध करी ।
एक देह धरी नित्य सुख ॥"
काया, वाचा, मनाने ज्या त्या कार्याशी एकरूप झाले पाहिजे तर खर्या सुखाची, समाधानाची प्रचिती येते.
" स्थूल होते ते सूक्ष्म पै झाले ।
मन हे बुडाले महासुखी ॥"
आपले अस्तित्व त्या त्या क्षणांशी एकरूप झाले की महासुखाची प्रचिती येते.
" कासयास बहू घालशील माळ ।
तुज येणे वीण काय काज "॥
भौतिक सुख म्हणजे वरवरचे आवरण आहे, आत्मसुखाची प्रचिती आली पाहिजे. मन शुद्ध असेल तर सर्व जग निर्मळ दिसते. गळ्यात माळ म्हणजे शुद्ध, सात्विक राहणे होय.
श्रीसंत गोरा कुंभार यांच्या२३ अभंगातून जीवनाचे तत्वज्ञान पाझरले आहे. संत हे भक्तच होते, एवढेच नव्हे तर ते विचारवंत, समाजप्रबोधक, साहित्यिक आणि समाजसेवक होते. त्यांना या अर्थाने समजून घेतले तरच मोठेपण कळू शकेल. संत पूजेकरिता नव्हे तर शुद्ध आचरणासाठी आहेत. हे खरे संत पूजन होय. संत हे त्याग आणि संस्कृतीचे आदर्श आहेत. ज्या हाताने वाईट कर्म झाले, ते हात विठ्ठल भक्तीत कसे वापरणार? म्हणूनच त्या हातानाच निकर्म केले, हात गहाण टाकणे ही भावस्थिती म्हणजे मनःस्ताप सतत जाणवू देणे होय. संत नामदेवानी थोट्या स्थितीचे असलेल्या गोरोबांना आज्ञा केली
" वरती करा कर दोन्ही ।
पताकांचे अनुसंधानी ॥
सर्व हस्त करिती वरी ।
गोरा लाजला अंतरी ॥
नामा म्हणे गोरोबांशी
वरती करणे हस्ताशी ॥
गोरा थोटा वरती स्वीकारी ।
हस्त फुटले वरचेवरी " ॥
ही संत आज्ञा संत परीक्षक गोरोबांना महत्वाची वाटली. संत हे संत सहवासात एकरूप होत असत. सज्जन माणसे एकमेकांना मान देतात. हाच आदर्श येथे आहे. संत गोरोबांचे जीवन आणि तत्वज्ञान समजून घेतले की संतांचे मोठेपण कळते. श्रीसंत गोरा कुंभार यांची पुण्यतिथी म्हणजे पुण्यस्मरण होय. ज्यांनी समर्पित भक्ती आणि निर्मळ जीवनाला आदर्श दिला. समाजप्रबोधन केले, अशा गोरोबांचे सर्व अभंग भारतीय संस्कृतीचे तत्वज्ञान आहे, त्याप्रमाणे आचारण करणे हेच खरे संतपूजन होय, तेच आपण करूया! जय गोरोबा! जय संतजन !!
*डॉ.बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर
भ्रमणसंवाद: *९२७००८७६४०*
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - ९५६११७४१११

