*पाटपाण्याचा मोर्चा : अखेर श्रीरामपूर भागातील शेतीला पाणी मिळणार असल्याने,पाटबंधारे विभागाचे लेखी आश्वासनानंतर माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील मोर्चा स्थगित करण्यात आला असल्याची माहिती लोकसेवा विकास आघाडीचे हिंमतराव धुमाळ यांनी दिली
श्रीरामपूर प्रतिनिधी:
भंडारदरा धरणातून शेतीसाठी सुरु असलेले पाण्याचे आवर्तन पुरेशा दाबाने मिळणार असल्याने तसेच कोणीही पाटपाण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे पाटबंधारे विभागाच्या लेखी आश्वासन नंतर शुक्रवार (ता.२४) रोजीचा लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भंडारदरा धरणातून शेतीसाठी आवर्तन सुरु आहे. तथापि, धरणातून सोडण्यात आलेले पाणी श्रीरामपूर भागातील कालव्यांना पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध होत नाही. सबब मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांचे भरणे होवू शकणार नाही. त्यामुळे पाणी उपलब्ध असूनही उभी पिके करपण्याची दाट शक्यता असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत होता. ही बाब लक्षात घेवून श्रीरामपूर भागात प्रवरा डाव्या कालव्यांना तातडीने पुरेशा दाबाने पाणी सोडण्यात यावे; जेणेकरून उभ्या पिकांचे भरणे होईल, या मागणीचे लेखी निवेदन देऊन श्रीरामपूर येथील पाटबंधारे कार्यालयावर माजी आमदार श्री.मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
तथापि, वडाळा पाटबंधारे उपविभाग यांनी दि.२३ मे रोजी दिलेल्या लेखी पत्राद्वारे निळवंडे धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग हा वाढविण्यात आलेला असून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये ठरल्याप्रमाणे चालू विसर्गातून पुरेशा दाबाने नमुना क्र.७ द्वारे पाणी मागणी नोंदविलेली असूनही पाटपाण्यापासून वंचित राहिलेल्या पिकांना पाणी पुरवठा करण्यात येणार असून त्यापैकी कोणीही पाटपाण्यापासून वंचित राहणार नाही, असे लेखी आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. निवेदनातील मागणी मान्य झाल्याने लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे नेतृत्वाखालील मोर्चा स्थगित करण्यात आल्याची माहिती श्री.धुमाळ यांनी दिली.
*पत्रकार अफजल मेमन श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर - 9561174111

