परिक्षेला १०१५५ उमेदवार प्रवेशित, परिक्षेकामी ९३१ अधिकारी - कर्मचाऱ्यांची नियुक्ती
अहमदनगर जिमाका वृत्तसेवा:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही रविवार, २५ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्ह्यातील २८ उपकेंद्रावर घेण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजता या दोन सत्रात ही परीक्षा पार पडणार आहे. परिक्षेला १०१५५ उमेदवार बसलेले आहेत. परिक्षेकामी समन्वय व भरारीपथकासह ९३१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा परीक्षा केंद्रप्रमुख राजेंद्रकुमार पाटील यांनी दिली आहे.
परिक्षेसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी -०७, भरारीपथक अधिकारी-०२, वर्ग १ दर्जाचे अधिकारी उपकेंद्रप्रमुख – २८ तसेच सहाय्यक – ५६, पर्यवेक्षक – १०५, समवेक्षक – ४६३, समन्वय अधिकारी व भरारी पथक यांचे सहायक – ०९, लिपिक -०९, केअर टेकर (शाळेचे) -२८, बेलमन – २८, शिपाई – ५३, पाणीवाटप कर्मचारी – १०४, वाहनचालक -३९ असे एकूण ९३१ अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
परीक्षेस बसलेल्या उमेदवारांना सकाळी ८.३० वाजता परिक्षा कक्षात प्रवेश देण्यात येणार आहे. उत्तरे लिहीण्यासाठी फक्त काळया शाईचे बॉल पॉईंटपेन वापरणे आवश्यक असून मोबाईल, कॅलक्युलेटर, डिजीटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, इ. सारखी दूरसंचार साधने परीक्षा केंद्राच्या परीसरात आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करणेत आलेली आहे. या सूचनेचे उल्लघंन करणा-या उमेदवारास या परीक्षेस तसेच त्यापुढील आयोगाच्या इतर सर्व परीक्षांसाठी कायमस्वरुपी प्रतिरोधीत करण्यात येणार आहे.
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्रांच्या १०० मीटर परीसरातील एसटीडी बुथ, फॅक्स, झेरॉक्स, दुकाने बंद ठेवणेकामी परीक्षेच्या दिवशी सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपावेतो परीक्षा क्षेत्रामध्ये सीआरपीसी १९७३ चे कलम १४४ (३) लागू करणेत आलेले आहे. प्रस्तुत परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्वतःच आयोगाच्या वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन घ्यावयाची आहेत. दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयामधून देण्यात येणार नाहीत. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.असे आवाहन ही श्री.पाटील यांनी केले आहे.
*संकलन
समता न्यूज सर्व्हिसेस श्रीरामपूर -९५६११७४१११