जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे (२०२३-२५) सध्याचे चक्र मनोरंजक ठरत आहे. भारतीय संघ सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर तर न्यूझिलंड तिसऱ्या स्थानावर आहे. त्याची फायनल पुढच्या वर्षी होणार आहे आणि ती गाठण्यासाठी सर्व संघ आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. भारताने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या आधीच्या दोन चक्रांमध्येही अंतिम फेरी गाठली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला विजेतेपदावर कब्जा करायची तिव्र इच्छा आहे. सध्या भारताची गुणांची टक्केवारी ६८.५२ आहे, तर ऑस्ट्रेलियाची गुणांची टक्केवारी ६२.५० आहे. न्युझिलंडची गुणांची टक्केवारी ५० आहे, तर इंग्लंड ४१.०७ गुणांच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.
श्रीलंका ४० गुणांच्या टक्केवारीसह पाचव्या, दक्षिण आफ्रिका ३८.८९ गुणांच्या टक्केवारीसह सहाव्या आणि बांगलादेश ३५ गुणांच्या टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे. बांगलादेश विरुद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान २२.२२ गुणांच्या टक्केवारीसह आठव्या स्थानावर आहे आणि वेस्ट इंडिज१८.५२ गुणांच्या टक्केवारीसह नवव्या स्थानावर आहे. या चक्रात भारताचे वर्चस्व केवळ त्यांच्या फलंदाजांमुळेच राहिले नाही तर गोलंदाजांनीही तितकाच चांगला खेळ केला आहे. या चक्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांचा विचार केला तर अव्वल सहामध्ये भारताचा फक्त एकच फलंदाज आहे, तर भारताच्या टॉप-६ गोलंदाजांमध्ये भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश आहे.
सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये इंग्लंडच्या जो रूटने सर्वाधिक धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने २५ डावांत ५१.२२ च्या सरासरीने ११२७ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. यानंतर दुसरे स्थान भारताच्या यशस्वी जयस्वालकडे आहे. त्याने सोळा डावात ६८.५३ च्या सरासरीने १०२८ धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके पैकी दोन द्विशतके) आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडचा जॅक क्रॉली २३ डावांत ४२.७८ च्या सरासरीने ९८४ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. क्रॉलीने एक शतक आणि सात अर्धशतके झळकावली आहेत. टॉप -६ फलंदाजांमध्ये इंग्लंडचे सर्वाधिक चार खेळाडू आहेत. त्याचबरोबर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा प्रत्येकी एक खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा चौथ्या, इंग्लंडचा बेन डकेट आणि बेन स्टोक्स अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहे.
त्याचबरोबर, सध्याच्या चक्रात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दोन भारतीय गोलंदाज आहेत. यामध्ये रविचंद्रन अश्विन व्यतिरिक्त जसप्रित प् बुमराहाचाही समावेश आहे. टॉप-६ मध्ये ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक चार खेळाडू आहेत, तर इंग्लंडचा एक खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड ५१ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. त्याचवेळी पॅट कमिन्स आणि मिचेल स्टार्क प्रत्येकी ४८ विकेट्ससह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. नॅथन लियॉन ४३ विकेट्ससह तिसऱ्या आणि अश्विन ४२ विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा ख्रिस वोक्स ३६ विकेट्ससह पाचव्या तर भारताचा बुमराह ३१ विकेट्ससह सहाव्या स्थानावर आहे.
आता हि स्पर्धा अंतिम टप्प्यात पोहोचत असून प्रत्येक संघ आपला जोर लावत असून फायनलमध्ये जाण्यासाठी जोर लावत आहे. भारताला मागील दोनही चरणात अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. या वेळेस भारत अंतिम फेरीची रेड लाईन पार करतो का हिच काय ती सध्या उत्सुकतेची बाब आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२

