श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शंभर वर्षापासून प्रलंबित असलेला आकारी पडीत शेतकरी जमिनीचा प्रश्न सोडवण्याकरिता तांत्रिक अडचण दूर करण्याकरिता राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने या निकालाची श्रेय त्यांनाही जाते असे प्रतिपादन ऍड. अजित काळे यांनी तालुक्यातील उंदीरगाव येथे केले.
नुकताच आकारिपडीत शेतकऱ्यांच्या जमिनी शेतकऱ्यांना परत देण्याबाबत न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला .हा खटला ऍड. काळे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने उच्च न्यायालयात चढविला. शेतकऱ्यांच्या लढ्याला यश मिळाले म्हणून उंदीरगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांचा नागरी सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना या वेळी ते बोलत होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ऍड.सर्जेराव घोडे होते. तर सूत्रसंचालन दिलीप गलांडे तर प्रास्तविक सुरेश ताके यांनी केले.
यावेळी बोलताना ऍड. काळे म्हणाले की १९१८ साली भंडारदरा धरणाची निर्मिती झाली. त्याच वेळी या परिसरातील जमिनी ब्रिटिश सरकारने ताब्यात घेतल्या. हरेगांव कारखाना चालू करण्याकरिता ऊसाची गरज लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जमिनी अल्प भाडे दरात ताब्यात घेण्यात आल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अकारिपडीत शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना परत देणे आवश्यक होते परंतु स्वातंत्र्यानंतरही आपल्या सरकारने वेळोवेळी तो करार वाढवून घेतला व शेतकऱ्याला संघर्ष करायला लावला.सिलिंग मर्यादा कायदा १९७५ साली अस्तित्वात आला.त्या कायद्याची आज खरोखर गरज आहे का ?, यावर मंथन होणे गरजेचे आहे. तीस वर्षापासून मी खूप केसेस चालवल्या परंतु शेतकऱ्यांची भावना या अकारिपडीत जमिनीशी निगडित असल्याने त्या केसमधील अनुभव हा माझ्यासाठी खूप काही शिकून गेलेला आहे . केसेस चा निकाल लागल्यानंतर मी कधीही श्रेयवाद केला नाही. या लढ्यामध्ये अनेकांनी सहकार्य केले .परंतु अंतिम टप्प्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तांत्रिक अडचण दूर करून न्यायालयीन प्रक्रिया सुलभ केल्याने यशाचा पहिला हार त्यांच्या गळ्यात टाकणं महत्त्वाचं आहे.
यावेळी स्वर्गीय कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या कन्या साधनाताई गायकवाड, अण्णा पाटील थोरात, भीम भाऊ बांद्रे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
आकारी पडीत शेतकऱ्यांचा लढा सुरू करणारे ब्राम्हणगांव वेताळ येथील स्व. बाळानाथ गाढे यांची कन्या देवकी भालेराव यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
सुरुवातीस ऍड. काळे यांची उंदीरगाव आऊटसाईड येथील शिव मारुती मंदिर पासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गुलालाची उधळण व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली .उंदीरगावांमध्ये जेसीपी द्वारे त्यांच्यावर फुले आणि गुलाल उधळण्यात आला. अनेक ठिकाणी मिरवणूक दरम्यान आकारपडीत शेतकऱ्यांच्या कुटुंबाकडून ऍड. काळे यांचे औक्षण करण्यात आले. उंदीरगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच गोलवड , उपसरपंच बाळासाहेब निपुंगे तसेच उंदीरगाव ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सोसायटी, दूध उत्पादक संघ, गावातील विविध संघटना व ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला. गावकऱ्यांनी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील ऍड.अजित काळे यांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
*वृत्त विशेष सहयोग
पत्रकार राजेंद्र देसाई- वडाळा महादेव
*संकलन*
समता न्यूज सर्व्हिसेस, श्रीरामपूर -९५६११७४१११

