shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मीनाताई जगधने यांनी घेतला रयतच्या गुणवत्तेचा ध्यास


श्रीरामपूर रयत संकुलाच्या वतीने ताईंचा सत्कार

 श्रीरामपूर / प्रतिनिधी:
शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ या वर्षात राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातील ४०४ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले तर सारथी शिष्यवृत्तीसाठी १०१२ विद्यार्थी पात्र ठरलेले आहेत. ही आत्तापर्यंतची सर्वोच्च संख्या आहे. एन एम एम एस पात्र विद्यार्थ्यांनी एकूण १ कोटी ९३ लाख ९२ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळवली तर सारथी शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांनी एकूण ३ कोटी ८८ लाख ६० हजार ८०० रुपये अशी एकूण ५ कोटी ८२ लाख ५२ हजार ८०० रुपये एवढी शिष्यवृत्ती उत्तर विभागीय विद्यार्थ्यांनी शासकीय तिजोरीतून सन्मानाने मिळवली आहे. या यशामागे रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या व श्रीरामपूर रयत संकुलाच्या चेअरमन मीनाताई जगधने यांचे मोलाचे मार्गदर्शन, दूरदृष्टी व अविरत परिश्रम आहे ताईंनी रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्तेसाठी घेतलेल्या ध्यासामुळेच रयत शिक्षण संस्थेतील उत्तर विभाग या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यशाचे उत्तुंग शिखर गाठू शकला. असे प्रतिपादन स्वामी सहजानंद भारती शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मुकुंद पोंधे यांनी केले.

        रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाने विशेष गुणवत्ता धारण केल्याबद्दल श्रीरामपूर रयत संकुलाच्या वतीने मीनाताई जगधने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी डॉ. पोंधे बोलत होते ते पुढे म्हणाले की गुणवत्तेचा ध्यास घेणाऱ्या ताई पूर्वी गुणवत्तेत मागे असणारा उत्तर विभाग त्यांच्या प्रयत्नामुळेच प्रथम स्थानावर आलेला आहे ही अभिमानाची बाब आहे. गुणवत्तेसाठी ताईच्या प्रयत्नाने उत्तर विभागातील उत्कृष्ट तज्ञ शिक्षकांची एक टीम तयार करून स्वतंत्र गुणवत्ता कक्ष स्थापन केला व त्यावर माजी सहाय्यक विभागीय अधिकारी काकासाहेब वाळुंजकर यांची विभाग प्रमुख म्हणून नियुक्ती केली. विषय शिक्षकांसाठी उद्बोधन वर्ग, विविध प्रकाशनाच्या व बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवून घेणे, सराव वर्ग, विद्यार्थी - पालक समुपदेशन, पालक सभा, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाईन मार्गदर्शन  वर्ग, नाविन्यपूर्ण संकल्पना वापरून शिक्षक व मुख्याध्यापक यांना प्रेरणा देण्याचे कार्य ताई सातत्याने करत असतात. उत्तर विभागातील विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत बक्षिसे प्राप्त करतात, स्पर्धा परीक्षा गुणवत्ता यादीत चमकतात, लाखो करोडो रुपयांची शिष्यवृत्ती मिळवतात यामागे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांप्रती त्यांची असलेली तळमळ आहे.कर्मवीर भाऊराव पाटील  यांचे कार्य व विचारावर असणारी निष्ठा यामुळे आजही वयाच्या ८२ व्या वर्षी तरुणांना लाजवेल असा त्यांच्या कामातील उत्साह दिसून येतो. त्यांच्यासाठी वय केवळ एक आकडा आहे. मीनाताई स्वतः नाविन्याचा शोध घेऊन प्रत्यक्षात त्या कामात सहभागी होऊन त्याची अंमलबजावणी करतात. ताईंनी श्रीरामपुरात रयत संकुलात विज्ञान व तंत्रज्ञान याच्या साह्याने गुणात्मक व भौतिक विकास केला. विद्यार्थ्यांच्या समस्या, शिक्षकांच्या अडचणी, पालकांचे प्रश्न सोडवण्यात त्या अहोरात्र तत्पर असतात. उत्तर विभागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश व विभागाला संस्थेत प्रथम स्थानावर मिळालेले मानांकन यात श्रीरामपूर रयत संकुलाच्या अध्यक्षा मीनाताई जगधने यांचे नेतृत्व, कुशल प्रशासन व व्यवस्थापन महत्त्वाचे असल्याचे डॉ. मुकुंद पोंधे यांनी शेवटी म्हटले. 

        यावेळी जनरल बॉडी सदस्य प्रकाश पाटील निकम, बापूसाहेब पठारे, डॉक्टर रवींद्र जगधने, प्रा. शंकरराव पुंड, प्राचार्य डॉ. प्रवीण बडदे, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर, मुख्याध्यापक सुनील साळवे,  प्रा. नान्नर, प्रा. करवर, प्रा. शिंदे, प्रा. पाटोळे, प्रा. भोये, प्रा. गागरे आदी मान्यवर उपस्थित होते.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस 
 श्रीरामपूर - 9561174111
close