shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

घ्या समजून राजे हो....पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडलेल्या प्रकाराचा अन्वयार्थ



*ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नुकताच जो प्रकार घडला त्याचे वर्णन भयंकर असेच करावे लागेल. सहाजिकच संपूर्ण राज्यभर त्या प्रकाराच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. एखाद्या रुग्णाला गंभीर अवस्थेत असतानाही जोवर अग्रीम रक्कम भरत नाही, तोवर उपचार सुरू करण्याचे नाकारणे हे माणुसकीचा खून करण्यासारखेच वर्तन म्हणावे लागेल. त्यामुळेच हा सर्वच प्रकार निंदनीय असाच म्हणता येईल. 

एका महिला रुग्णेला ती गंभीर अवस्थेत उपचारासाठी आली असता या रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने आधी १० लाख रुपये भरा, तरच आम्ही उपचार सुरू करतो, अशी मागणी केली. रुग्णेच्या नातेवाईकांनी अडीच लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली. सदर महिलेचा पती हा एका आमदाराचा स्वीय सहाय्यक आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री कार्यालयातूनही दूरध्वनी गेल्याची माहिती आहे. तरीही या रुग्णालयाच्या मुद्दाम प्रशासनाने दहा लाख रुपये भरा अशी मागणी केली. तोवर त्यांनी सदर महिलेवर उपचारच सुरू केले
 नाहीत. परिणामी ती महिला दगावली. आता रुग्णालय प्रशासन सारवासारव करण्याचा प्रयत्न करते आहे. 

सदर रुग्णालय हे मंगेशकर परिवाराने उभारलेले रुग्णालय आहे. ज्यावेळी हे रुग्णालय उभारले त्यावेळी जनसामान्यांची सेवा हे ध्येय ठेवून उभारत असल्याचे सांगितले होते. त्यामुळेच शासनाकडून सवलतीच्या दरात भूखंड देखील मिळवला होता. शासनाकडून इतरही पर्याय सवलती त्यांनी मिळवल्या आहेत असे बोलले जाते.तरीही असा उद्दामपणा हा संतापजनकच म्हणावा लागेल. 

या निमित्ताने अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मुळात आपल्या संस्कृतीत "नारायणो वैद्यो हरी" असे म्हटले आहे. म्हणजेच वैद्य हा नारायण अर्थात परमेश्वर स्वरूप मानला गेला आहे. परिणामी डॉक्टर या जमातीवर जनसामान्यांची एखाद्या देवावर असावी तशी अनन्यसाधारण श्रद्धा राहिलेली आहे. मात्र गेल्या पन्नास वर्षात डॉक्टरांचे जे काही वर्तन दिसते आहे. त्यामुळे आता हा डॉक्टर नारायण नसून कसाई तर झाला नाही ना अशी शंका निर्माण होते आहे. 

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती. त्या डॉक्टरला कुटुंबातील आजी-आजोबांपासून तर लहान मुलांपर्यंत सर्वांची प्रकृती कशी आहे याची माहिती असायची. तशी ते औषधेही द्यायचे. माणूस पाहून डॉक्टर औषध द्यायचे. प्रसंगी अंगाला हात लावून टेंपरेचर किती आहे ते बघायचे. कधी घसा बघायचे तर कधी डोळे आणि शेवटी नाडी बघायचे आणि ते निदान करायचे. मात्र हे निदान अचूक असायचे. आता मात्र पद्धती बदलल्या आहेत. प्रत्येक आजारासाठी वेगवेगळे डॉक्टर तयार झाले आहेत. त्यांच्याकडे गेल्यावर ते समोर आलेला बकरा कसा कापता येईल हाच विचार करतात की काय अशी शंका येते. पहिल्या डॉक्टरची तपासण्याची फीच हजारात असते. त्यानंतर तो डॉक्टर दुनियाभऱ्याच्या तपासण्या करायला सांगतो. त्यात रुग्णाचे काही हजार खर्च होतात. शेवटी मग तो निदान करतो आणि तुम्हाला दुसऱ्या विषयाच्या तज्ञाकडे रेफर करतो. म्हणजे पुन्हा तेच चक्र फिरवले जाते. एकूणच आजारी पडला की तो रुग्ण आर्थिकदृष्ट्या देखील आजारी झालेला दिसतो. 

अर्थात या सर्व डॉक्टर्स आणि तपासणी करणाऱ्या प्रयोगशाळा यांच्याकडे आधी रोख रक्कम भरावी लागते. तरच पाऊल पुढे पडते. अनेकदा कारण नसताना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले जाते. कारण नसतानाच  चार-आठ दिवस ठेवूनही घेतले जाते. तिथेही त्याचे काही हजारात बिल होते. शेवटी हातात काहीच पडत नाही. परिणामी त्या रुग्णाचा आणि एकूणच जनसामान्यांचा डॉक्टर वरील विश्वास उडतो आहे. त्यात जर पेशंटला अजून काही गंभीर आजार होणे किंवा त्यात तो दगावणे असे प्रकार घडले तर मग जनमत क्षुब्ध होते, आणि त्यात डॉक्टरचा दवाखाना किंवा हॉस्पिटलची तोडफोड करणे किंवा जाळून टाकणे असेही प्रकार घडतात. मागे ठाण्यात शिवसेना नेते आनंद दिघे एका हॉस्पिटलमध्ये असतानाच त्यांचे निधन झाले. तेव्हा संतप्त शिवसैनिकांनी ते हॉस्पिटलच जाळून टाकले होते अशी माहिती आहे. 

कित्येकदा तर चुकीचे निदान करून त्या रुग्णाला अक्षरशः लुटले जाते. तिथे डॉक्टर्स, पॅथॉलॉजी लेबॉरेटरीचे संचालक आणि तज्ञ डॉक्टर्स या सर्वांचे आपापसात कमिशन ठरलेले असते म्हणजेच साटेलोटे असते असेही बोलले जाते. काही दिवसांपूर्वीच असाच एक जबरदस्त किस्सा कानावर आला. सुमारे आठ महिन्यांपूर्वी एका ज्येष्ठ नागरिक असलेल्या व्यक्तीला चिकनगुनिया झाल्यामुळे पश्चिम नागपूरातील एका खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले.

तिथल्या डॉक्टरने रुग्ण दाखल होताच त्याच्या रक्ताची तपासणी करवली, आणि दुसऱ्याच दिवशी सकाळी रुग्णाला कोविड आहे असा रिपोर्ट देऊन ताबडतोब नागपुरातल्याच एका महागड्या रुग्णालयात परस्पर भरती करून टाकले. तिथे रुग्ण जाताच तिथल्या डॉक्टरांनी पुन्हा लाखभर रुपये भरायला सांगितले आणि रुग्णाला आयसीयूमध्ये भरती करून टाकले .तो रुग्ण ओरडत होता की कोविड भारतातून हद्दपार झाला आहे. तरीही तिथले डॉक्टर ऐकायला तयार नव्हते. शेवटी दोन दिवसांनी पुन्हा रक्त तपासणी केली, तेव्हा कोविड झालेलाच नसल्याचे लक्षात आले. तरीही त्या महागड्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सदर रुग्णाला  १५ दिवस आयसीयू मध्ये ठेवून घेतले आणि साडेचार लाखाचे बिल ठोकले. सदर रुग्ण आधीचच मधुमेही होता. त्याला स्नायू कमजोर पडण्याचा आजारही होता. त्यासाठी तो आधीचीच औषधे घेत होता. मात्र त्या हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णाने माहिती दिल्यानंतर देखील ती औषधे बंद करून टाकली. परिणामी घरी आल्यावर काही दिवसांनी त्या रुग्णाच्या सर्व स्नायू ढिल्या पडल्या आणि रुग्णाला  कड पलटणे आणि अन्न गिळणेही कठीण झाले होते. अर्थात सुदैवाने दुसऱ्या डॉक्टरांनी घरी येऊन तपासले त्यावेळी त्या रुग्णाचे नेमके निदान केले आणि औषधोपचाराने तो रुग्ण आज बऱ्यापैकी सुधारला आहे. यात या रुग्णाचे जवळजवळ सहा महिने अंथरुणावरच गेले आहेत. या सर्व प्रकारात आधी ज्या खाजगी इस्पितळात या रुग्णाला भरती केले होते. त्याचे आणि या महागड्या रुग्णालयाचे काही आर्थिक हितसंबंध तर गुंतलेले नव्हते ना अशी शंका घेण्यास निश्चितच वाव आहे. 

पूर्वी फॅमिली डॉक्टर हे प्रत्येक रुग्णाच्या जरूर पडल्यास घरी जाऊन त्याची तपासणी करत असत. आज हे तज्ञ डॉक्टर, अर्थात काही सन्माननीय अपवाद वगळता, सहसा कोणाच्या घरी जायलाही तयार होत नाहीत. पेशंटला आमच्याकडे घेऊन या म्हणतात. कित्येकदा पेशंट गाडीत बसण्याच्याही परिस्थितीत नसतो. मग त्याला ॲम्बुलन्समधूनच न्यावे लागते. त्यासाठी ॲम्ब्युलन्सचे भाडेही अवास्तव घेतले जाते तिथेही डॉक्टरांच्या ठराविकच ॲम्बुलन्स असतात असे बोलले जाते. म्हणजे तिथेही आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

वस्तूतः सर्वसामान्य व्यावसायिक आणि डॉक्टर यांच्यामध्ये डॉक्टरांकडे एकूणच व्यवस्थेचे झुकते माप असते. माझ्या माहितीनुसार बँका किंवा वित्तीय संस्था या डॉक्टरांना हॉस्पिटल उभारणीसाठी कर्ज देताना विशेष सहिष्णतेचे धोरण अवलंबतात. तिथे कर्जावरील व्याजाचा दरही कमी असतो अशी माझी माहिती आहे. शासन त्यांना जागा देतानाही सवलतीचे धोरण अवलंबते. मात्र काही अपवाद वगळता रुग्णांना लुटता कसे येईल हेच हे डॉक्टर कायम बघत असतात. कित्येकदा अनेक सामाजिक संस्था रुग्णसेवेसाठी हॉस्पिटल्स उभारतात. तिथेही असे लुटालुटी चे प्रकार सुरू असलेले दिसून येते.

जेव्हापासून इन्शुरन्स कंपन्यांनी मेडिक्लेम हे प्रकार सुरू केले, तेव्हापासून अनेक गैरवैद्यकीय कंपन्यांनी आपल्या हॉस्पिटल्सची साखळी उभी केलेली आहे. तिथे ते रुग्णालयात पेशंटला ऍडमिट करतात आणि त्याच्या मेडिक्लेमचा वापर करून त्याला पुरते हलाल करतात. कित्येकदा मेडिक्लेमपेक्षा बरीच मोठी रक्कम त्याला भरावी लागते. इथे या व्यावसायिक कंपन्या फक्त आपला नफा बघत असतात. त्यांना रुग्णसेवेशी काहीही देणे घेणे नसते. तिथे ते उच्चशिक्षित डॉक्टरांच्या सेवा त्यांना नोकरीला ठेवून त्यांच्यावर ठराविक रुग्ण दर महिन्याला आणलेच पाहिजे आणि ठराविक व्यवसाय दिलाच पाहिजे असेही बंधन घालतात. हे टारगेट पूर्ण केले नाही तर त्या डॉक्टरांना कामावरूनही काढले जाते. तिथे मग रुग्ण पुरता लुटला जातो. मात्र कोणालाही त्याचे देणे घेणे नसते. आज हे प्रकार सर्वत्र सर्रास चाललेले दिसून येत आहेत. 

अशावेळी ज्याला परवडत नाही तो रुग्ण सरकारी रुग्णालयात जातो. मात्र तिथे अवस्था तर अतिशय भयानक असल्याचे आढळून येते. त्यामुळे अनेकदा गोरगरीब रुग्ण नको ते हॉस्पिटल आणि नको ते डॉक्टर म्हणत एक तर जडीबुटी वाले किंवा साधू भोंदू यांच्याकडे जातात. अन्यथा ते हाल सोसातच मरण पत्करतात. आजच्या एकविसाव्या शतकात प्रगत समाजात हे कितपत योग्य आहे? 

या संदर्भात मी काही डॉक्टर मित्रांशी चर्चा केली. त्यावेळी मला वेगवेगळी उत्तरे मिळाली. एका काळात डॉक्टर होणे काही फार महाग नव्हते. सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा देखील आयुष्यातील पाच सहा वर्ष खर्च करून डॉक्टर होऊ शकत असे. त्यासाठी फारसा खर्च लागत नसे. डॉक्टर झाल्यानंतर तो कुठेतरी एक खोली पाहून लगेच आपली प्रॅक्टिस सुरू करू शकत असे. त्या साठी त्याला फार गुंतवणूक करावी लागत नसे. त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालये शासकीयच होती. त्यामुळे तिथे खर्च फार येत नव्हता. नंतर सहज फारसा खर्च सुरू न करता प्रॅक्टिस सुरू करता येत असे.

आज मात्र परिस्थिती बदललेली आहे. साधारणपणे १९८५ नंतर महाराष्ट्रात खाजगी वैद्यकीय महाविद्यालये सुरू झाली. अनेक राजकारणी व्यक्तींनी व्यवसाय म्हणून महाविद्यालये सुरू केलीत. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यामागे लाखो रुपयांमध्ये कॅपिटेशन फी घेणे सुरू केले. त्यात त्या सर्वांनीच आपले उखळ पांढरे करून घेतले. आजही परिस्थिती काही फार वेगळी नाही. परिणामी मुलाला डॉक्टर करायचे असेल तर मायबापांना आयुष्यभराची मिळकत खर्ची घालावी लागते. अर्थात नुसते एमबीबीएसची पदवी घेऊन चालत नाही. पुढे त्याला कोणत्यातरी विषयात स्पेशलायझेशन करावे लागते. त्यासाठी पुन्हा काही लाख खर्च होतात, आणि मग तो मुलगा डॉक्टर म्हणून समाजापुढे जायला सज्ज होतो. काही काळ कुठेतरी दुसऱ्या डॉक्टर कडे नोकरी केल्यावर तो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतो. त्यावेळी त्याला पुन्हा लाखातच गुंतवणूक करावी लागते. विशेष म्हणजे हे सर्व करता करता त्याने आयुष्याची तिशी ओलांडलेली असते. अशावेळी आजवर डॉक्टर होण्यासाठी आणि नंतर हॉस्पिटल उभे करण्यासाठी लागलेला खर्च भरून काढायचा असेल, आणि त्याचबरोबर स्वतःची कौटुंबिक आणि सामाजिक प्रतिष्ठा जपत घर चालवायचे असेल, तर अशा प्रकारे पेशंट कडून भरगच्च फी घ्यावीच लागते, असे काही डॉक्टर मित्र खाजगीत सांगतात. 

सुमारे ६०-६५ वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. इथे नागपुरातील गेल्या पिढीतील एका प्रसिद्ध बालरोगतज्ञाचा अनुभव अतिशय बोलका आहे. हे बालरोगतज्ञ आधी एमबीबीएस झाले आणि नंतर ते बालरोग हा विषय घेऊन एम.डी. सुद्धा झाले. त्यावेळी एम.डी. होईपर्यंत फारसा खर्च लागत नव्हता. एमडी झाल्यावर काही कामाने ते मेडिकल कॉलेजमध्ये गेले होते. येताना बस स्टॉप वर बसची वाट पाहत उभे होते. तेव्हा त्यांच्या बाजूने एक कार येऊन थांबली. त्या कारमधून नागपूरातील एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ उतरल्या. या स्त्रीरोगतज्ञ आणि हे नव्याने तयार झालेले बालरोगतज्ञ यांच्यात कौटुंबिक संबंधही होते. त्यामुळे या डॉक्टर उतरल्या आणि या नव्या डॉक्टरला विचारले, की तू कुठे जातो आहेस? त्याने घरी निघालो असे म्हणताच त्याला कारमध्ये बसवून घेतले आणि घरी घेऊन निघाल्या. रस्त्यात त्यांनी विचारले, तुझा पुढे काय विचार आहे? त्यावेळी त्याने अजून काही ठरलेच नाही, असे उत्तर दिले. तेव्हा या स्त्रीरोगतज्ञांनी या डॉक्टरला सरळ ऑफर दिली. माझे सुसज्ज नर्सिंग आणि मॅटरनिटी होम आहे. तिथे तुला एक खोली देते आणि एक टेबल तसेच तीन खुर्च्या देते. उद्यापासून तू तिथे ये आणि बालरोगतज्ञ म्हणून प्रॅक्टिस सुरू कर. तुला फक्त पाटी रंगवून घेण्याचा खर्च लागेल. तुझी प्रॅक्टिस सुरू झाली की मगच तुझ्याकडून भाडे काय घ्यायचे ते मी ठरवेल. तोवर तुझ्याकडे माझ्याकडे येणारे पेशंट्सही रेफर करीन. या नव्या डॉक्टरने हा प्रस्ताव त्वरित स्वीकारला आणि दुसऱ्या दिवशीपासून त्याची प्रॅक्टिस सुरू झाली. पुढे जाऊन हा डॉक्टर मध्य भारतातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ म्हणून गाजला. आज या डॉक्टरांचे वय ८५ वर्ष इतके आहे. त्यांनी प्रॅक्टिसमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र त्यांचा हा अनुभव परिस्थिती कशी आणि किती बदलली हे स्पष्ट करणारा आहे. 

आज पुण्याच्या दीनानाथ रुग्णालयात जो प्रकार घडला त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. व्यावसायिक किंवा धर्मदाय संस्थांना रुग्णालय सुरू करताना जेव्हा परवानगी दिली जाते, तेव्हा त्यांना एका विशिष्ट टक्केवारीत गरीब रुग्णांनाही उपचार देणे बंधनकारक असते. तशी नोंद त्यांना ठेवावी लागते आणि धर्मदाय आयुक्तांना त्याचा अहवालही द्यावा लागतो. या नियमांमध्येही आता सरकारला बदल करावे लागणार आहेत. गोरगरिबांना सुलभ पद्धतीने उपचार कसे मिळतील अशी व्यवस्था शासनाला उभी करावी लागणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम गरीब कुटुंबातील सर्वसामान्य माणसालाही आपल्या मुलांना सहज डॉक्टर करता येईल अशी शिक्षण व्यवस्था उभी करावी लागणार आहे. त्याचबरोबर शासकीय स्तरावर सर्वत्र उपचार कसा उपलब्ध होईल ही व्यवस्था उभारणे हे देखील आवश्यक ठरणार आहे. यासाठी पुन्हा एकदा धर्मादाय संस्थांनाही सोबत घ्यावे लागेल, आणि सक्षम अशी रुग्णसेवा करणारी व्यवस्था उभारावी लागेल. त्यातही च्या धर्मादाय संस्था किंवा व्यावसायिक संस्था सुद्धा अशा प्रकारे लूट करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना सरळ करावे लागेल. मंगेशकर कुटुंबानेही रुग्णसेवा करण्यासाठीच हे हॉस्पिटल उभारले होते.  त्यासाठी त्यांनी शासकीय सवलती देखील घेतल्या असणारच. मात्र आज तिथे व्यावसायिकरण झालेले आहे. असे प्रकार सरकारला कटाक्षाने रोखावे लागतील. तरच सर्वसामान्य तळागाळातल्या माणसालाही चांगल्यात चांगले सर्व मिळू शकेल आणि भविष्यात सर्वांसाठी निरामय आयुष्य उपलब्ध होऊ शकेल हे नक्की.

आणखी एक मुद्दा मला इथे मांडावासा वाटतो. आहे मंगेशकर कुटुंब हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील प्रख्यात कुटुंब म्हणून ओळखले जाते. त्यांच्या परिवारातील व्यक्तींच्या पुढाकाराने आणि त्यांच्या नावावरच हे रुग्णालय सुरू आहे. माझ्या माहितीप्रमाणे बहुदा व्यवस्थापन आहे त्यांच्या कुटुंबाचेच आहे. नसल्यास त्यांनी ते कुणाला चालवायला दिले आहे का? हे देखील हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. त्यांनी त्यांना पैसा कमावणे हे ध्येय कधीच नव्हते. मात्र त्यांच्या पुढाकाराने, त्यांच्या नावावर चालणाऱ्या या रुग्णालयात असे गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी त्यांनी घ्यायला हवी होती. आजतरी त्यांनी ती काळजी घेतलेली नाही असे दिसते. त्यामुळे या प्रकाराबद्दल मंगेशकर कुटुंबानेही महाराष्ट्राची माफी मागायला हवी. 

माझ्या मते तरी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात नुकत्याच घडलेल्या प्रकाराचा हाच अन्वयार्थ आहे.

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे?
 त्यासाठी आधी समजून तर घ्या राजेहो..
close