अजीजभाई शेख / राहाता:
संपूर्ण जगाला श्रद्धा आणि सबुरीचा संदेश देणाऱ्या श्री साईंच्या साईबाबा संस्थान शिर्डी मध्ये नोकरीच्या माध्यमातून सलग ४३ वर्ष प्रामाणिकपणे सेवा करुन जगातून येणाऱ्या साई भक्तांची सेवा करत असताना सुरुवातीच्या काळात माफक अशा पगारावर नोकरी करून प्रामाणिकपणा जिद्द सचोटी व कष्टाळू स्वभावामुळे सलग ४३ वर्ष काम करुन सेवानिवृत्त होत असताना अनेक अनुभवाची शिदोरी घेऊन वाटचाल करणारे हे कर्मचारी साईबाबा संस्थान मध्ये काम करत असलेल्या कामगारांचे प्रेरणास्त्रोत ठरतील असा विश्वास सेवानिवृत्त झालेल्या मारुती एकनाथ फुंदे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात पत्रकार विश्वास आरोटे यांनी शिर्डी येथे बोलताना आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी राहुल फुंदे, सुनीता फुंदे, लक्ष्मण झाडे, आदित्य झाडे, राहुल घुगे, दत्तात्रय घुगे आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पत्रकार विश्वास आरोटे म्हणाले की, आज समाजात नोकरी निमित्ताने अनेक समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलत आहे, एकाच ठिकाणी किंवा एका संस्थेत सलग इतके वर्ष काम करणारी मंडळी दुर्मिळ होत असताना दिसत आहे, श्री. फुंदे यांची जन्मभूमी जरी बीड जिल्ह्यातील आष्टी असली तरी नौकरी निमित्ताने शिर्डीत येऊन तथा कर्मभूमी शिर्डी मानून श्री साईबाबा संस्थान मध्ये नोकरी करत सलग ४३ वर्ष चांगल्या प्रकारची सेवा देऊन सेवानिवृत्त होत असताना त्यांच्या पाठीशी असलेला मोठा अनुभव त्यांनी भविष्यात श्री साईबाबा संस्थानच्या प्रगतीसाठी द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सेवानिवृत्ती निमित्त श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे , साई एम्पलाॅईज सहकारी सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार,राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमित शेळके, राष्ट्रवादीचे राहाता तालुका अध्यक्ष संदीप सोनवणे,संजय फुलसुंदर,डॉ.विश्वास आरोटे, छत्रपती आरोटे, सोनेरी आरोटे यांच्या हस्ते त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत त्यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
नोकरीच्या निमित्ताने सुखदुःखाच्या आठवणी सांगताना मी जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा कै. नंदाबाई फुंदे हिने दिलेले पाठबळ व वडील स्व. एकनाथ आणी मातोश्री स्व.ममताबाई यांनी दिलेली प्रामाणिकपणाची शिकवण, चांगले संस्कार यामुळे आपण श्री साईबाबा संस्थान मध्ये इतके वर्ष प्रामाणिकपणे काम करू शकलो, काम करत असताना शिर्डी ग्रामस्थांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले, त्या सहकार्यामुळेच आपली शिर्डी ही कर्मभूमी ठरली असे गौरवोद्गार त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मिडिया सर्व्हिसेस,
श्रीरामपूर - 9561174111