अॕड. वर्षाताईंनी केलेलं काम हे देश पातळीवरील उल्लेखनीय:- संस्कृती विकास मोरे (मुख्य क्रीडा कार्यकारी अधिकारी)
प्रतिनिधी: सूर्यकांत होनप
सातारा: दि. १३/ अॕड. वर्षाताई देशपांडे यांनी राज्यस्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेस सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचा उपस्थित मान्यवरांकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी मुख क्रीडा कार्यकारी अधिकारी संस्कृती विकास मोरे यांच्या सोबत बुद्धिबळ खेळाचा आनंद लुटला.
अॕड. वर्षाताई देशपांडे यांच्या विषयी सांगावे तेवढे थोडेच. त्या गेल्या तब्बल 35 वर्षापासून महिला लहान मुली आणि बालकांच्या संदर्भाने होणाऱ्या हिंसेच्या संदर्भात सातत्याने रस्त्यावरती आणि कायदेशीर पद्धतीने लढत आहेत. मुलींची कमी होणारी संख्या हा देशासमोरील एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो रोखण्यासाठी वर्षाताईंनी केलेलं काम हे देश पातळीवरील उल्लेखनीय काम आहे. त्यांनी लिंग निदान करून मुलगी असल्यास ती काढून कचऱ्याच्या कुंडीत टाकणाऱ्या डॉक्टरांना रंगेहात स्टिंग ऑपरेशन करून पकडले आहे. असे त्यांनी सत्तरहून जास्त स्टिंग ऑपरेशन करून डॉक्टरांचा पर्दाफाश केला आहे. गेल्या तब्बल वीस वर्षापासून या विषयात ते संपूर्ण देशभर सर्व स्तरातील लोकांना अधिकाऱ्यांना माहिती देण्यासाठी जातात.
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार या तालुक्यातील ऊसतोड मजुरांसोबत त्या गेल्या बारा वर्षापासून काम करतात त्यांच्या मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्या प्रयत्न करतात. ऊसतोड कामासाठी हे कामगार पश्चिम महाराष्ट्रात आपले गाव सोडून सहा महिने येतात, अशावेळी मुलींना एकटे गावात कसं ठेवायचं म्हणून ते आपल्या सोबत घेऊन येतात किंवा त्यांचे बालविवाह लावतात अशा मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात वर्षाताईंनी आणले आणि आज त्या मुली वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या पायावरती कोण नोकरी तर कोण स्वतःचा व्यवसाय अशा पद्धतीने त्या स्वाभिमानाने जीवन जगत आहेत.
आपण सगळे ज्या छपराखाली राहतो म्हणजेच ज्या घरात राहतो ते घर कोणाचं असा प्रश्न केला तर, ते घर बाबांचं किंवा वडिलांचं असंच म्हणावं लागेल कारण, आईची जागा म्हणजेच त्या घरातल्या स्त्रीची जागा जी फक्त सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबणारी अशीच आहे म्हणून, वर्षाताईंनी गेल्या अनेक वर्षापासून घर दोघांचा असलं पाहिजे, पुरुषांबरोबर महिलेचेही नाव घरावरती आलं पाहिजे यासाठी सातत्याने त्या झटत आहेत. हजारो महिलांची नावं घराला पुरुषांसोबत त्यांनी लावलेली आहेत तसेच, जमिनीला म्हणजे सात बारा ला देखील महिलेचे नाव लागलं पाहिजे म्हणजेच घराला आणि जमिनीला स्त्रियांच नाव असेल तर त्यांच्यावरील होणारी हिंसा कमी होईल म्हणून त्या सातत्याने प्रयत्नशील आहेत.
तसेच अॕड. वर्षाताई देशपांडे यांना संयुक्त राष्ट्र संघ जनसंख्या 2025 या पुरस्काराने न्यूयॉर्क येथे 11 जुलै रोजी सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी केलेले मराठीतील भाषण मराठी भाषेमध्ये जगभरात गाजले.

