मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानांतर्गत जस्ट राईट फॉर चिल्ड्रन व आधार बहुउद्देशीय संस्थेच्या संयुक्त उपक्रमातून ग्रुप ग्रामपंचायत चिमणपुरी–पिंपळे येथे बालविवाह निर्मूलनासाठी जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील 100 दिवसीय बालविवाह मुक्त जळगाव अभियानाचा भाग म्हणून विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी कॅण्डल मार्च व प्रभात फेरी आयोजित करून समाजाला जागृतीचा संदेश दिला.
समाजात अद्याप सुमारे 40 टक्के बालविवाह होत असल्याने माता मृत्यू, बालमृत्यू, गर्भपात यांसारख्या गंभीर समस्या निर्माण होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या दुष्परिणामांवर मात करण्यासाठी बालविवाह थांबवणे अत्यावश्यक असल्याचा संदेश अभियानातून देण्यात आला.
पिंपळे येथील कै. सुकलाल आनंदा पाटील माध्यमिक विद्यालयात आधार बहुउद्देशीय संस्थेतर्फे “बालविवाह मुक्त भारत” ही शपथ घेण्यात आली. त्यानंतर शाळेमार्फत गावात कॅण्डल मार्च व प्रभात फेरी काढण्यात आली. समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी सागर कोळी यांच्या पथकाने सादर केलेल्या पथनाट्याद्वारे बालविवाहाचे दुष्परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले.
या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील, ग्रुप ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच वर्षा युवराज पाटील, उपसरपंच मीना पाटील, सदस्य जयश्री पाटील, मुख्याध्यापक सी. एन. पाटील, उपशिक्षक डी. बी. पाटील, सर्व शिक्षकवृंद, अंगणवाडी सेविका निर्मला बाई चौधरी तसेच मान्यवर उपस्थित होते.
---


