shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आठवणी लोकभवन पोस्ट ऑफिसच्या उमेश काशीकर यांचे मनोगत !!

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.

अनेक वर्षे लोकभवनाचे स्वतंत्र पोस्ट ऑफिस नव्हते. हँगिंग गार्डनसमोर असलेले 'मलबार हिल पोस्ट ऑफिस' हेच राजभवनासाठी पोस्ट ऑफिस होते. 

वाळकेश्वर - मलबार हिल परिसराचा पिनकोड 'गव्हर्मेंट हाऊस' असताना ४००००६ हाच होता. 

राजभवनाचे सेवेतील मेसेंजर त्याकाळात सायकलीने साधारण  एक किलोमीटर अंतरावर असलेल्या मलबार हिल पोस्ट ऑफिसला डाक नेऊन द्यायला जात असत. (त्याकाळात राजभवनाची प्रसिद्धी पत्रके देखील पोहोचवायला हे मेसेंजर वृत्तपत्रांच्या कार्यालयात सायकलीने जात !!) 

साधारण १९५०च्या दशकात राजभवनातच एक छोटेखानी पोस्ट ऑफिस तयार करण्याचे ठरले. 

येथील पोस्ट विभागातील माहिती पुस्तिकेनुसार दिनांक २ डिसेंबर १९५७ रोजी राजभवनातील पोस्ट ऑफिस सुरु झाले. 

या परिसरातील व्हीआयपी - म्हणजे राज्यपालांसह राजभवन परिसरातील साधारण २५०० कर्मचारी व नागरिकांना सेवा देण्यासाठी हे ऑफिस सुरु करण्यात आले असे नमूद करण्यात आले. 

राजभवनातर्फे पोस्ट ऑफिसला साधारण ४०९ वर्गफूट जागा मोफत उपलब्ध करून देण्यात आली. 

राजभवनात पोस्ट ऑफिस तयार झाल्यामुळे पोस्ट विभागाला पदे निर्माण करावी लागली. 

त्यात सब पोस्ट मास्तर,पोस्टमन, सेवक आदी पदे तयार केली गेली. त्यांना देखील परिसरात निवासस्थाने देण्यात आली. 

कालांतराने नवे पिनकोड देण्यात आले.  त्यावेळी राजभवन परिसरासाठी असलेल्या येथील पोस्ट ऑफिसला देखील ४०००३५ असा स्वतंत्र पिनकोड देण्यात आला. 
 
राज्यपालांना उद्देशून लिहिलेली पत्रे, अंतर्देशीय पत्रे, रजिस्टर्ड पत्र, स्पीड पोस्ट, पोस्टेज स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्प, पार्सल, मनी ऑर्डर आदी सुविधा परिसरातच आल्या. पुढे पोस्टल बँकिंग आदी सुविधा या पोस्ट ऑफिसमार्फत सुरु झाल्या.  

मधल्या काळात डाक विभागाने लाल पोस्ट बॉक्स शिवाय स्थानिक पत्रांसाठी निळे व महानगरातील पत्रांसाठी हिरवे पोस्ट बॉक्सेस देखील येथे आणून बसवले होते. 

परंतु पुढे मागे त्यात एक - दोन - तर कधी एकही नाही - असे पत्र येऊन पडायला लागले.  त्यामुळे पोस्ट विभागाने निळे - हिरवे पोस्ट बॉक्सेस काढून नेले. पत्र न्यायला व आणून द्यायला मात्र दररोज जीपीओ येथून पोस्टाची लाल गाडी येऊ लागली व आजही येते.  

येथील पोस्ट ऑफिसमधील संदूक, वजने - मापे, वजन करायची मशीन गतकाळातील आठवणी जागवतात. येथील हसतमुख पोस्टमन करंजे (आता ते हयात नाहीत) व पुढे आलेले सेवानिवृत्त पोस्टमन श्रीकृष्ण पावसकर सर्व परिसरातील लोकांकरिता जिव्हाळ्याचे लोक होऊन गेले.  

गेल्या पंचेवीस वर्षात संपर्क क्रांतीमुळे इमेल, व्हाट्सअप वगैरे सुविधा आल्या. पोस्टाचे देखील कालानुरूप आधुनिकीकरण झाले.  इ - कॉमर्स, पार्सल, पोस्टल बँकिंग, इन्शुरन्स आदी गोष्टींमुळे पोस्ट ऑफिस नव्या रूपात लोकांच्या जीवनाशी जुळलेले आहे. वजन मोजण्याची मशीन आता डिजिटल झाली आहे. 

लोकभवन पाहण्यास येणारे लोक येथील पोस्ट ऑफिसमधून 'राजभवन पोस्ट ऑफिस मुंबई ४०००३५'  स्टॅम्प मारून आठवणीसाठी पत्र, अंतर्देशीय पत्र घेऊन जातात. काही दिवसांनी हा स्टॅम्प देखील 'लोकभवन पोस्ट ऑफिस' असा दिसू लागेल.   

लोकभवन  परिसरातील मोरांना आजही निवांतता हवी असते तेंव्हा ते या पोस्ट ऑफिस उघडण्यापूर्वी येथील रेलिंगवर किंवा चक्क लाल पोस्ट बॉक्सवर विसाव्याला येतात.
close