जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
ज्या पक्षाच्या तिकिटावर आपण निवडून आलो, त्याच्याशी प्रतारणा कुठल्याही नेत्याने करू नये. पैशाचे व पदाचे आमिष दाखवून मतदार फोडण्याचे काम काही पुढारी करत राहिले आहेत. त्यांची शिकार आपण होणे म्हणजे मतदारांना फसवणे होय, असे उद्गार महाराष्ट्रातील एक थोर आणि आदरणीय नेते बाळासाहेब भारदे यांनी काढले होते. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी आपला पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, ती मात्र मतदारांशी प्रतारणा नव्हती. याचे कारण, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सेक्युलर राजकारण करण्याची भूमिका शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने घेतली होती. आणि म्हणून अजितदादांशी अत्यंत जवळचे संबंध असून देखील प्रशांत हे दादांबरोबर त्यांच्या पक्षात गेले नाहीत. भाजपशी तडजोड करणार नाही ही ठाम भूमिका त्यांनी घेतली. महापालिकेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने 'व्यवहारी' आणि 'लवचिक' भूमिका घेऊन अजितदादांच्या पक्षाबरोबर पालिका निवडणुका लढवल्या. हे तत्त्वदृष्ट्या चुकीचे आहे. कारण अजितदादांचा पक्ष हा भाजपबरोबर महायुतीत आहे. त्यामुळे आपण ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस यांच्यासोबत महाविकासमधूनच पुण्यातील पालिका निवडणूक लढवली पाहिजे, ही प्रशांत जगताप यांची भूमिका होती आणि ती रास्तच होती.
एकप्रकारे प्रशांत जगताप म्हणजेच पुण्याची राष्ट्रवादी काँग्रेस होती! अजितदादांचा गट राष्ट्रवादीच्या बाहेर गेल्यानंतरदेखील प्रशांत यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून अनेक आंदोलने केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या नावाचा दरारा आणि दबदबा निर्माण केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते हे सरंजामदार असून, सत्तेसोबत जाणे आणि मुळमुळीत भूमिका घेणे हे त्यांचे आद्य वैशिष्ट्य आहे. मग तो महायुतीतमध्ये गेलेला राष्ट्रवादी असो अथवा शरद पवारांचा पक्ष असो. पण पुण्यात प्रशांत जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कशी वाढवली होती, हे अजितदादांनाही माहिती होते आणि शरद पवार यांनादेखील. त्यांच्यासारखा मोहरा गमावल्यामुळे पुण्यात शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस जवळजवळ अस्तित्वहीन झालेली आहे.
१९५२ साली काँग्रेस पक्षातर्फे बाळासाहेब भारदे उमेदवार म्हणून उभे राहिले होते. निवडणूक अर्जात 'मी पक्षाचे आदेश मानीन अशा आशयाचे प्रतिज्ञाविधान असते. परंतु भारदे यांनी आपल्या अर्जात 'महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या धोरणांशी सुसंगत असे पक्षाचे आदेश मी मानीन' असे मी लिहिले होते. काँग्रेस श्रेष्ठींनी ते जादा शब्द गाळून दुसरा फॉर्म भरण्यास सांगितले. ते भारदेंनी मान्य केले नाही. परिस्थिती जाणून त्यांनी अखेर भारदेंनाच तिकीट दिले. ते विधानसभेत निवडून आले. मोरारजीभाई देसाई मुख्यमंत्री होते. विधानसभेत अर्थमंत्री जीवराज मेहता यांनी अर्थसंकल्पात शेतसाऱ्यावर वाढीव कर म्हणजे सरचार्जच लावला होता. त्या दिवशी संध्याकाळी काँग्रेसची सभा होती. जीवराजभाई अध्यक्ष होते. त्या सभेत भारदेंनी शेतसार्याविरुद्ध जोरदार भाषण केले. निवडणूक जाहीरनाम्याच्या घोषणांशी ही सारावाढ विरुद्ध आहे. कारण फैजपूर काँग्रेसने शेतकऱ्यांवरील बोजा कमी करावा, असा आपल्या ठरावात स्पष्ट आदेश दिला असताना, त्याविरुद्ध अचानकपणे मंत्रिमंडळाने ही सारावाढ केली आहे. ती काँग्रेसच्या धोरणाविरुद्ध आहे. तेव्हा या चर्चेला आम्ही पाठिंबा देणार नाही, असे मत भारदेंनी मांडले. बहुसंख्य पक्ष सदस्यांना त्यांचे भाषण एवढे आवडले की, त्या दिवशी नकळत का होईना, या विषयामुळे ते 'पुढारी' झाले..
हे सर्व आठवण्याचे कारण म्हणजे, एकप्रकारे प्रशांत जगताप हे भारदे यांच्या कुळातीलच नेते आहेत. म्हणजे आपल्या तत्त्वांशी तसेच पुरोगामी आणि सेक्युलर राजकारणाशी ते कधीही तडजोड करणार नाहीत. एकेकाळी जेधे- गाडगीळ यांची काँग्रेस म्हणून पुण्यात पक्षाचा दबदबा होता.
उल्हासदादा पवार यांच्यासारख्या नेत्यांना काँग्रेसची देशातील महाराष्ट्रातील आणि पुण्यातील परंपरा चांगलीच ठाऊक आहे. परंतु आज पुण्यातील काँग्रेस म्हणजे लिलिपुटियन्सची फौजच आहे. अनेक नेते भाजपला मॅनेज होत गेले आहेत. प्रशांत हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून राहिले. तत्त्वांशी तडजोड करण्याची वेळ येताच, त्यांनी पक्षाचाच त्याग केला. परंतु प्रशांत हे अत्यंत सुसंस्कृत नेते असल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर, त्या पक्षाबद्दल व त्याच्या नेत्यांबद्दल कोणताही वावगा शब्द उच्चारला नाही. आजही त्यांच्या मनात शरद पवार, दिवंगत अजितदादा यांच्याबद्दल आदरच आहे.
प्रशांत यावेळीही नगरसेवक म्हणून निवडून आले. परंतु त्यांनी काँग्रेसचे अनेक नगरसेवक स्वतःच्या ताकदीवर निवडून आणून दाखवले आहेत. २०२४ च्या निवडणुकीत प्रशांत हडपसर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शपकडून मैदानात उतरले होते. त्यावेळी चेतन तुपे यांना त्यांनी कडवी टक्कर दिली. पण त्यांचा अवघ्या ७००० मतांनी पराभव झाला. अजितदादांच्या गटात 'राशप'मधील एकेक नेता सहभागी होत असताना देखील, प्रशांत यांनी पवार साहेबांची साथ सोडली नाही. प्रशांत यांनी तरुण वयापासून पक्षातील सर्व जबाबदाऱ्या उचलल्या आहेत. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक,मारोतराव कन्नमवार, वसंतदादा पाटील अशा काँग्रेसच्या अनेक नेत्यांबद्दलची पुस्तके त्यांनी वाचली आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज,छ. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या विचारांचा त्यांच्यावर खोल प्रभाव आहे. पुणे शहराचे महापौर असताना त्यांच्या कामाचे कौतुक शरद पवार यांनीच नव्हे, तर अनेक पतील नेत्यांनी देखील केले होते. महापौर असताना, त्याचबरोबर नगरसेवक म्हणून काम करत असताना, पोकळ बडबड न करता प्रशांत जगताप यांनी विकासाची अनेक कामे केली, हे पुणेकरांना ठाऊक आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याची निवड झाली, तेव्हाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या सोहळ्याची चर्चा राज्य शासनाने प्रशांत यांच्याबरोबर महापौर म्हणून केली, परंतु कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत प्रशांत जगताप यांचे नावही नव्हते. अशावेळी या कृतीचा थेट निषेध करण्याचा निर्भयपणा प्रशांत त्यांनी दाखवला आणि मग मुख्यमंत्र्यांना आपली चूक कबूल करावी लागली. त्यांना दिलगिरी व्यक्त करावी लागली. व्यक्तिगत मान अपमान असा विषय न करता, प्रशांत यांनी पुण्याच्या महापौरपदाचा मान राखला गेलाच पाहिजे, अशी ठाम भूमिका घेतली.
भाजपचे नेते अथवा त्यांनी पाळलेले काही भंपक नेते शरद पवारांबद्दल अपमानास्पद शब्द वापरत असताना, राष्ट्रवादीमधील काहीच नेते त्याचा निषेध करण्यासाठी पुढे आले. त्यामध्ये प्रशांत जगताप यांचा उल्लेख करावा लागेल. आज काहीजण महायुतीत अधिकृतपणे सामील झाले आहेत. पण विरोधकांमधील काहीजण भाजपशी केंद्रात व राज्यात छुपी युती करून आहेत आणि ते भाजप विरोधात ठामपणे भूमिकाच घेत नाहीत, हे प्रशांत त्यांनाही जाणवत असणारच. गिरीश बापट यांच्यासारख्या भाजपच्या नेत्यांशी देखील प्रशांत यांनी सौहार्दाचे संबंध जपले आणि राजकीय सुसंस्कृतपणा म्हणजे काय असतो याचे दर्शन घडवले. मात्र कोठूनही आपल्या विरोधातील पक्षाशी संगनमत करणे हा त्यांचा स्वभाव नाही.
आज पुण्यातली काँग्रेस अक्षरशः लुळीपांगळी झाली असताना, प्रशांत जगताप यांच्यासारखा लढवय्या नेता पक्षाला लाभला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे प्रशांत यांच्यासारख्या तगड्या नेत्याला अधिक वाव देतील, अशी अपेक्षा आहे. पक्षातील ढुढ्ढाचार्यांना बाजूला ठेवून, केवळ प्रशांत आणि त्यांच्यासारख्या अन्य तरुण, अभ्यासू, तळमळीच्या आणि आक्रमक नेत्यांना काँग्रेसमध्ये वाव मिळाला पाहिजे.
आज प्रशांत हे पुण्यात माझ्या घरी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भाऊसाहेब आजबे यांच्या समवेत सदिच्छा भेट घेण्यासाठी आले होते.
त्यांच्याबरोबर विविध प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. प्रशांत जगताप हे केवळ पोपटपंची करणारे नेते नसून, रस्त्यावर लढणारे समर्पित कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्त्यांमुळेच काँग्रेसला नवी ऊर्जा मिळू शकेल, असे वाटते.

