जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७.
नाशिक भागातले आणि विशेषतः सिन्नरमधील माझे मित्र मराठवाड्याला मागास म्हणायचे.आणि मागासपणाचे कारण अशिक्षितपणा हे सांगायचे. त्यांचं म्हणणंही बरोबर होते.पण अशोक खरातचे साम्राज्य सिन्नर तालुक्यातच आहे.त्याचा मठ आणि ईशान्यश्वर मंदिर सिन्नरमधील मीरगाव गावात आहे.
त्याने आपले बस्तान तिथं बसवले याचा अर्थ तिथं त्याचे भक्त आणि चेले त्याभागात मोठ्या प्रमाणावर असतील.अशोक खरातकडे बऱ्याच महिला प्रेग्नंट होण्यासाठी यायच्या.त्याच्याकडून प्रेग्नंट झाल्यानंतर गर्भसंस्कार घ्यायलाही पुन्हा तो त्यांना बोलवायचा.त्याच्या मंदिरात इतके काळेधंदे सर्रास चालायचे.त्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या वाटा बंद केल्या. आमच्या मराठवाड्याच्या वाट्याचे ४० लाख लीटर पाणी जयंत पाटिल जलसंपदा मंत्री असताना खरातची बाग फुलवायला देण्यात आले.
इतक्या सुशिक्षीत भागात अशोक खरात आपले बस्तान बसवू शकला याचा अर्थ शिक्षण आणि शहाणपण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इतका सुशिक्षीत भाग असताना खरात तिथे त्याच्या मठात, रस्त्याच्या कडेला असलेल्या ऑफिसात महिलांचे शोषण करायचा.
नाशिकसारख्या प्रगत जिल्ह्याची अशी गत असेल तर बाकीच्या जिल्ह्यातील परिस्थिती यापेक्षा वाईट असू शकते. खरातमुळे मोठ्या मोठ्या नेत्यांनी आपली बोटं कापून घेतल्याचे फोटो व्हायरल होत आहेत.सत्ताधारी आणि विरोधक अशा सगळ्यांसोबत खरातचे जिव्हाळ्याचे संबंध होते हे दिसून येत आहे.
कदाचीत खरातचे हे प्रकरण बाहेर आले नसते आणि तो जर म्हातारा होऊन मेला असता तर त्याच्या भक्तांनी त्याला ईश्वरी अवतार घोषीत करून तिथं ईशान्यश्वर मंदिरात खरातचे चमत्कार ऐकवले असते.महाराष्ट्रातील तालुकातालुक्यात असे खरात बस्तान बसवून उघडपणे काळेधंदे करत आहेत.पण जोपर्यंत मोठी खळबळ होत नाही तोपर्यंत अशा लोकांवर कारवाई होत नाही कारण यांच्या डोक्यावर स्थानिक नेत्यांचा हात असतो. याआधी आसाराम बापू होता आज खरात आहे उद्या कुणीतरी दुसरा असेल.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा आणि अघोरी मंत्रतंत्र विरोधी कायदा पारित केलेला असूनही यानुसार कारवाई झाल्याच्या बातम्या येत नाहीत.सरकारने या कायद्याची अंमलबजावणी कडक करायला हवी.प्रत्येक तक्रारीची दखल तातडीने घ्यायला हवी. नाहीतर महिला, बालके, गरीब आणि श्रीमंत असे सगळेच कुठल्या ना कुठल्या खरातचे बळी पडतच राहतील.
०००

